Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 11
June 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ जून
२०१९ दुपारी १.०० वा.
****
कोट्यवधी रुपयांचा
हवाई घोटाळा आणि काळा पैसा वैध करण्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ
नेते प्रफुल्ल पटेल आज सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीत अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झाले.
पटेल यांची कालही या प्रकरणी चौकशी झाली होती. पटेल यांच्या कार्यकाळात आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना झुकतं माप
दिल्यानं, एअर इंडिया या भारतीय हवाई वाहतुक कंपनीला झालेल्या नुकसानाबद्दल तसंच एकशे
अकरा विमानं खरेदीसंदर्भात ही चौकशी सुरू आहे. या चौकशीत अंमलबजावणी संचालनालयाला सहकार्य
करून, हवाई वाहतुक क्षेत्रातले बारकावे समजावून देण्यात आपल्याला आनंदच असल्याचं, पटेल
यांनी यापूर्वी म्हटलं आहे. २००४ ते २०११ या दरम्यान पटेल हे केंद्रात संयुक्त
पुरोगामी आघाडी सरकारमध्ये नागरी हवाई वाहतुक मंत्री होते
****
हार्ले डेव्हिसन या अमेरिकी मोटरसायकवर भारताकडून
वसूल केलं जात असलेलं ५० टक्के आयात शुल्क स्वीकारार्ह नसल्याचं, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. भारताकडून याआधी या मोटरसायकलवर शंभर टक्के आयात
शुल्क आकारलं जात होतं, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले चांगले मित्र आहेत, त्यांच्याशी
यासंदर्भात बोलल्यावर त्यांनी, हे आयात शुल्क शंभर टक्क्यांवरून पन्नास टक्के केलं.
मात्र ते पूर्णपणे रद्द करावं, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
****
खुल्या संवर्गासाठी जाहीर दहा टक्के आरक्षणासाठी
लागू असलेली आठ लाख रुपये वार्षिक उत्पन्नाची मर्यादा बारा लाखांपर्यंत वाढवावी, अशी
मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते काल कोल्हापूर
इथे पत्रकारांशी बोलत होते. राज्य मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात विविध महामंडळांमध्ये
आरपीआय आठवले गटाला योग्य स्थान मिळावं, अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली.
****
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा एकविसावा
वर्धापन दिन काल नाशिक इथं साजरा झाला. मॅगसेसे पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ मानसोपचार
तज्ज्ञ डॉक्टर भरत वाटवानी यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात, ज्येष्ठ वैद्य
सुभाष रानडे आणि भालचंद्र कुलकर्णी यांना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
एक्केचाळीस गुणवंत विद्यार्थ्यांना यावेळी सुवर्णपदकं प्रदान करण्यात आली.
****
राज्याच्या दुष्काळी भागातला पाणी प्रश्न सोडवण्याच्या
मागणीसाठी सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातल्या शेहेचाळीस गावातल्या शेतकऱ्यांची
पायी दिंडी ७०० किलोमीटर प्रवास करत मुंबईत मंत्रालयाकडे निघाली आहे. दरवर्षीच्या दुष्काळावर
कायमस्वरुपी उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी असंख्य शेतकरी या दिंडी सहभागी झाले आहेत.
****
नवीन लोकायुक्त कायदा बनवण्यासंदर्भात आज पहिली बैठक
पुण्यात होत आहे. या बैठकीत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे राज्याच्या मुख्य
सचिवांशी चर्चा करणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर बाजार समितीचे सभापती
काकासाहेब पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. चौदा संचालकांनी चार जून रोजी
त्यांच्यावर दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर उद्या मतदान होणार होतं, मात्र त्यापूर्वीच
त्यांनी राजीनामा दिला आहे.
****
देशातल्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले
यांच्या सातारा जिल्ह्यातल्या मौजे नायगाव या जन्मगावाला 'ब' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी
ही माहिती दिली. याबाबतचा शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. या गावाला दरवर्षी पाच
लाखापेक्षा अधिक पर्यटक भेट देतात.
हे लक्षात घेवून 'क' वर्गात असणाऱ्या या
पर्यटनस्थळाला आता 'ब' वर्ग देण्यात आल्याचं
रावल यांनी सांगितलं.
****
जम्मू काश्मीरमध्ये आज सकाळी झालेल्या चकमकीत दोन
दहशतवादी ठार झाले. शोपियान जिल्ह्यात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा
दलांनी आज पहाटे शोधमोहीम सुरू केली, या दरम्यान दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला
उत्तर देताना, हे दोघे दहशतवादी मारले गेल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भुवनेश्वर इथं सुरु असलेल्या, आंतरराष्ट्रीय हॉकी
महासंघाच्या स्पर्धेत भारतानं उझबेकिस्तानवर १०-० असा सहज विजय मिळवला. या विजयाबरोबर
भारतानं उपांत्य फेरीतलं स्थान पक्क केलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment