Tuesday, 11 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 11.06.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 11 June 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ जून २०१९ सायंकाळी ६.००
****
स्थानिक नागरी संस्थांच्या क्षेत्रात वीज वितरण प्रणालीच्या, विद्युत पायाभूत सुविधांवर कर आकारला जाणार नाही, राज्य मंत्रिमंडळानं आज झालेल्या बैठकीत, या संबंधीच्या अधिनियमांत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला. जलसंपदा विभागांतर्गत धरणांच्या परिसरातली विश्रामगृहं तसंच रिक्त वसाहतींचा विकास आणि व्यवस्थापन, पीपीपी अर्थात सार्वजनिक-खाजगी सहभाग तत्त्वावर खाजगी यंत्रणांकडून करण्यासाठीच्या धोरणालाही राज्यमंत्रिमंडळानं आजच्या बैठकीत  मान्यता दिली.
जळगाव जिल्ह्यातल्या साने गुरूजी सहकारी उपसा जल सिंचन योजनेची दुरूस्ती, पंढरपूर मंदीर अधिनियमात सुधारणा, नागपूर इथं रामदेवबाबा विद्यापीठ तसंच पुणे इथं बालाजी विद्यापीठ या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांची स्थापना, आदी निर्णयांना मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.
****
विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते धंनजय मुंडे यांच्याविरोधात सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. अंबेजोगाई तालुक्यात पुस गावातली सरकारी जमीन बेलखंडी मठाला इनाम दिली होती. मुंडे यांनी पदाचा गैरवापर करुन ही जमीन जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतल्याचा आरोप करत राजाभाऊ फड यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. दरम्यान ही जमीन कोणाचीही फसवणूक करुन खरेदी खत करुन घेतलेली नाही, राजकीय सूडबुद्धीनं न्यायालयाची दिशाभूल करुन आपल्या विरुद्ध खोटे आरोप केल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे. या आदेशाविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वर्तवली आहे. ते आज मुंबईत मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. येत्या १७ तारखेपासून हे अधिवेशन सुरू होणार आहे. शिवसेना तसंच भाजपच्या कोट्यातली काही मंत्रिपदं रिक्त आहेत, ती या विस्ताराच्या माध्यमातून भरली जाण्याची शक्यता असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी कोल्हापूर इथल्या विशेष तपास पथकानं, डॉ नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातला आरोपी शरद कळसकर याला अटक करुन आज कोल्हापूर न्यायालयासमोर हजर केलं, न्यायमूर्ती एस एस राऊळ यांनी कळसकर याला येत्या १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा निर्णय दिला. पानसरे यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या पिस्तुलाची विल्हेवाट लावल्याचा, कळसकर याच्यावर आरोप आहे.
****
धुळे जिल्ह्याला ३३ कोटी वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत यंदाच्या पावसाळ्यात ६५ लाख ७६ हजार रोपांच्या लागवडीचं उद्दिष्ट देण्यात आलं असून आतापर्यंत वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग आणि कृषी विभागानं ८४ लाख रोपं तयार केली आहेत.
****
औरंगाबाद इथल्या मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेनं, तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आज परभणी इथं एक कार्यशाळा घेण्यात आली. तंबाखू सेवनाची संख्यात्मक वाढ, त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम यासह विविध विषयांवर तज्ज्ञांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केलं.
****
दोन हजार चोवीस पर्यंत देशातल्या प्रत्येक नागरिकाला शुद्ध पेयजल पुरवण्याचं उद्दीष्ट सरकारनं निर्धारित केलं आहे. जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी आज दिल्लीत ही माहिती दिली. सुमारे चौदा कोटी घरं अद्याप शुद्ध पेयजल पुरवठ्यापासून वंचित आहेत, या सर्व घरांना शुद्ध पाणी पुरवण्यासाठी सरकार एक आराखडा तयार करत असल्याचं शेखावत यांनी सांगितलं. पाण्याची मागणी आणि पुरवठा यातली तफावत दूर करण्यासाठी जलसंधारणावरही लक्ष केंद्रीत केलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.
****
कैलास मानसरोवर यात्रेला आजपासून सुरुवात झाली. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी नवी दिल्लीत भाविकांच्या पहिल्या जथ्याला निरोप दिला. उत्तराखंड मधल्या लिपुलेह मार्गानं ६० भाविकांच्या १८ तुकड्या, तर सिक्कीम मधल्या नथुला पास मार्गानं ५० भाविकांच्या १० तुकड्या कैलास मानसरोवर यात्रेला जाणार आहेत.
****
भारतीय क्रिकेट संघाचा सलामीचा फलंदाज शिखर धवन हा अंगठ्याच्या दुखापतीमुळे सुमारे दोन आठवडे खेळू शकणार नाही. येत्या गुरुवारी न्यूझीलंडविरुद्ध तसंच येत्या रविवारी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यात धवन सहभागी होऊ शकणार नाही.
****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...