Wednesday, 12 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 12.06.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 12 June 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ जून २०१ सकाळी ७.१० मि.
****

v राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मंजूर केलेल्या १२ हजार ५२२ कोटी रूपयांचं त्वरीत वितरण करण्याची राज्य सरकारची केंद्र सरकारकडे मागणी 
v विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धंनजय मुंडे यांच्याविरोधात सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
v महापालिकांच्या हद्दीत वीज वितरण व्यवस्थेंतर्गत करण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांच्या कामांना मालमत्ता कर न आकारण्याच्या राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय

v विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यातला सामना रद्द; आज पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत
****

 राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी केंद्र शासनानं राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मंजूर केलेल्या १२ हजार ५२२ कोटी रूपयांचं त्वरीत वितरण करण्याची मागणी पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केली. काल नवी दिल्ली इथं केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्यावतीनं जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली देशातल्या सर्व राज्यांच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्र्यांची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. गेल्या तीन वर्षांपासून राज्याला दुष्काळाची झळ पोहचत असून यावर्षी राज्यातल्या ५० टक्के भागात दुष्काळाची परिस्थिती आहे, त्यामुळे हा निधी त्वरित वितरीत करणं गरजेचं असल्याचं सांगून मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी १० हजार ५०० कोटी रूपयांचे विशेष सहाय्य देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
****

 येत्या १२ तासांमध्ये गोवा आणि मुंबईच्या किनारपट्टीवायू चक्रीवादळ धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागानुसार त्याचा वेग ताशी ८० ते ९० किलोमीटर आहे. पुढील दोन दिवसात ते गुजराकडं सरकण्याची चिन्ह असून सौराष्ट्रापर्यंत पोहचेल तेव्हा त्याचा वेग ११० ते १३५ किलोमीटर प्रती तास एवढा होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 

 दरम्यान, संभाव्य वायू चक्रीवादळापासून नागरिकांचं कोणतेही नुकसान होणार नाही, याची  पूर्णपणे काळजी घेण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल केंद्रीय मंत्र्यांसह हवामान विभागाशी संबंधित संस्थांच्या अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. याशिवाय वीज, टेलिफोन, आरोग्य तसंच पिण्याचं पाणी या सर्व गरजेच्या सेवांची उणीव भासणार नाही यासाठी योग्य ती काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
****

 विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धंनजय मुंडे यांच्या विरोधात सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यात पुस गावातली सरकारी जमीन बेलखंडी मठाला इनाम दिली होती. मुंडे यांनी पदाचा गैरवापर करुन ही जमीन जगमित्र सहकारी साखर कारखान्यासाठी विकत घेतल्याचा आरोप करत राजाभाऊ फड यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.
 दरम्यान ही जमीन कोणाचीही फसवणूक करुन खरेदी खत करुन घेतलेली नाही, राजकीय सूडबुद्धीनं न्यायालयाची दिशाभूल करुन आपल्या विरुद्ध खोटे आरोप केल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे. या आदेशा विरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****

 राज्य महानगरपालिका अधिनियमांमध्ये सुधारणा करून महापालिकांच्या क्षेत्रात वीज वितरण व्यवस्थेंतर्गत करण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांच्या कामांना मालमत्ता कर न आकारण्याच्या निर्णयाला काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राज्यातल्या नागरी स्वराज्य संस्थांच्या हद्दीत वीज वितरण व्यवस्थेंतर्गत करण्यात येणारी भूमिगत केबल टाकणं, ट्रान्सफॉर्मर तसंच विजेचे खांब उभारणं या मूलभूत कामांसाठी कर आकारणी केली जात होती, मात्र समान धोरणाच्या नियमानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

 जलसंपदा विभागांतर्गत धरणांच्या परिसरातली विश्रामगृहं तसंच रिक्त वसाहतींचा विकास आणि व्यवस्थापन, पीपीपी अर्थात सार्वजनिक-खाजगी सहभाग तत्त्वावर खाजगी यंत्रणांकडून करण्यासाठीच्या धोरणालाही राज्यमंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत मान्यता दिली.

 जळगाव जिल्ह्यातल्या साने गुरूजी सहकारी उपसा जल सिंचन योजनेची दुरूस्ती, पंढरपूर मंदीर अधिनियमात सुधारणा, नागपूर इथं रामदेवबाबा विद्यापीठ तसंच पुणे इथं बालाजी विद्यापीठ या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांची स्थापना, आदी निर्णयांना मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली.
****

 राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वर्तवली आहे. ते काल मुंबईत मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. येत्या १७ तारखेपासून हे अधिवेशन सुरू होणार आहे. शिवसेना तसंच भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातली काही मंत्रिपदं रिक्त आहेत, ती या विस्ताराच्या माध्यमातून भरली जाण्याची शक्यता असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****

 राज्यातल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना मानधनाच्या पन्नास टक्के रक्कम सेवानिवृत्तीनंतर दरमहा निवृत्तीवेतन म्हणून देण्यास शासन सकारात्मक असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी काल सांगितलं. राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या शिष्टमंडळासोबत मुंबईत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. केंद्र सरकारनं जाहीर केलेली मानधन वाढ अंगणवाडी सेविकांना लवकरात लवकर मिळावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचंही त्या म्हणाल्या.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 औरंगाबाद जिल्ह्यात समुपदेशन, सक्षमा- जेंडर रिसोर्स सेंटर, वनस्टॉप क्रायसेस केंदं तात्काळ कार्यान्वित करावीत तसंच महिलांच्या कायद्याबाबत मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसिद्धी करावी अशी सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी केली आहे. औरंगाबाद इथं जिल्ह्यातली कायदा आणि सुव्यवस्था तसंच महिलांविषयीच्या तक्रारींचा काल त्यांनी आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. बाल कल्याण विभागाला जिल्ह्यातल्या शाळांमधल्या स्वच्छता गृहांचं सर्वेक्षण करून १५ दिवसात अहवाल सादर करण्यास त्यांनी यावेळी सांगितलं. महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत जनसुनावणीही काल घेण्यात आली. या सुनावणीत ४० तक्रारींवर निर्णय घेऊन सर्व प्रकरणं पुढच्या कारवाईसाठी संबंधितांकडे पाठवण्यात आली.    
****

 परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा इथं काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असलेला १९ लाख ६४ हजार ७६० रूपयांचा तर अंबाजोगाई इथं काल  ३ लाख ३६ हजार रूपयांचा गुटखा काल अन्न आणि औषधी प्रशासनानं जप्त केला. राज्यात बंदी असलेला गुटखा छुप्या मार्गानं शहरात येत असल्याची माहिती अन्न आणि औषधी प्रशासनाला मिळाली होती, त्याआधारे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत वाहनासह चालकाला ताब्यात घेऊन गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 
****

 इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल बांगला देश आणि श्रीलंका यांच्यातला सामना पावसामुळं रद्द करण्यात आला. या दोन्ही संघांना प्रत्येकी १ - १ गुण देण्यात आला आहे. या स्पर्धेत आज पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होणार आहे. सलग दोन दिवस पावसामुळं विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतले सामने रद्द झाले.
****

 राज्यातली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं, दंत महाविद्यालयं आणि संलग्नित रूग्णालयातल्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या खाजगीकरणाच्या धोरणाविरोधात राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेसह विविध संघटनांनी पुकारलेला संप काल मागे घेण्यात आला. आरोग्य खात्याचे प्रधान सचिव संजय मुखर्जी यांनी तीन महिन्याच्या आत याबाबत ठोस निर्णय घेणार असल्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर हा संप स्थगित करण्यात आल्याची माहिती, राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सुरेश आहेरकर यांनी दिली.
****

 परभणी तालुक्यातल्या बोबडे टाकळी इथं पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बनावट पावत्या देवून फसवणाऱ्याविरूद्ध कारवाई करण्याची मागणी शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्याकडे काल एका निवेदनाद्वारे केली आहे. स्थानिक ग्रामपंचायतीच्या संग्राम कक्षाकडे शेतकऱ्यांनी पिक विम्याचे पैसे भरले होते, मात्र या कक्षानं हे पैसे आणि शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज संबंधित पिक विमा कंपनीकडे पाठवले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळू शकले नाहीत, त्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला. पिंगळी, कोथळा, जोड परळी, सावंगी खुर्द आणि साडेगावमधल्या शेतकऱ्यांच्या बाबतीतही अशीच घटना घडली असल्याचं आमदार पाटील यांनी निवेदनात म्हटलं आहे.
****

 बुलडाणा जिल्ह्यात खामगाव तालुक्यात दुर्गाशक्ती फूड प्रॉडक्ट या फॅक्टरीमध्ये वेल्डींग करताना स्फोट होऊन तीन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. मृत्यूंचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 परभणी महानगरपालिका आयुक्त रमेश पवार यांनी काल पालिकेच्या सर्व विभागांची मान्सूनपूर्व आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभागात नोडल अधिकारी म्हणून शहर अभियंता वसीम पठाण यांची नियुक्ती केली. आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारणे, शहरातल्या धोकादायक इमारतींची तपासणी, रस्त्यांची दुरूस्ती, नालेसफाई अशा अनेक मुद्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 23 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...