आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१२ जून २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
येत्या १२ तासांमध्ये गोवा आणि मुंबईच्या किनारपट्टीस वायू चक्रीवादळ धडकण्याची शक्यता वर्तवण्यात
आली आहे. भारतीय हवामान विभागानुसार त्याचा वेग ताशी ८० ते ९०
किलोमीटर आहे. पुढील दोन दिवसात ते गुजरातकडं सरकण्याची चिन्ह असून सौराष्ट्रापर्यंत पोहचेल तेव्हा त्याचा वेग ११० ते
१३५ किलोमीटर प्रती तास एवढा होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
या वादळाचा परिणाम जाणवू लागला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणसह समुद्र किनाऱ्यावर
अक्राळविक्राळ लाटा आदळत असल्याच आमच्या वार्ताहरांनं कळवलं आहे.
दरम्यान,
संभाव्य वायू चक्रीवादळापासून नागरिकांचं कोणतेही
नुकसान होणार नाही, याची पूर्णपणे काळजी घेण्याच्या
सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल केंद्रीय
मंत्र्यांसह हवामान विभागाशी संबंधित संस्थांच्या अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
याशिवाय वीज, टेलिफोन, आरोग्य
तसंच पिण्याचं पाणी या सर्व गरजेच्या सेवांची उणीव भासणार नाही यासाठी योग्य ती काळजी
घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
****
साहीत्य क्षेत्रातल्या योगदानाबद्दल देण्यात
येणारा सर्वोच्च सन्मान ज्ञानपीठ पुरस्काराचं आज दिल्ली इथं वितरण होणार आहे. वर्ष
२०१८ या वर्षाचा हा पुरस्कार इंग्रजी भाषेचे प्रसिध्द लेखक अमिताव घोष यांना जाहीर
झाला होता. माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात
येणार आहे.
****
जम्मू काश्मीरच्या बारामूल्ला जिल्यातल्या सोपोर
इथं सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. सुरक्षारक्षकांना
सोपोर इथल्या वाडूरा पायीन इथं दहशतवादी लपून बसल्याची माहीती मिळाली होती, शोध मोहीम
करत असतांना ही चकमक उडाली, ठार झालेला दहशतवाद्याची ओळख अद्याप पटली नसल्याचं सुरक्षा
सूत्रांकडून कळवण्यात आलं आहे.
****
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत
यांची राज्यसभेचा नेता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते अरूण जेटली यांची जागा ते
घेतील, गेहलोत हे मध्यप्रदेश मधून राज्यसभेचे सदस्य
आहेत.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यात असलेल्या
शारा या गावात शेतात काम करणाऱ्या महिलेच्या अंगावर वीज पडून तिचा मृत्यू झाला आहे.
काल सांयकाळी शेतात कचरा वेचत असताना ही घटना घडली.
*****
***
No comments:
Post a Comment