Wednesday, 12 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 12.06.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 12 June  2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ जून २०१९ दुपारी .०० वा.
****

 केंद्रीय मंत्रिमंडळाची आज नवी दिल्लीत पहिली बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात होत असलेल्या या बैठकीत, सरकारच्या कृती कार्यक्रमाचा आराखडा निश्चित होण्याची शक्यता आहे.
****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्याच्या अखेरच्या रविवारी, येत्या ३० तारखेला सकाळी ११ वाजता आकाशवाणीच्या ‘मन की बात’या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ५४ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या कल्पना कळवाव्यात असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. त्यासाठी 1800-11-7800 या टोल फ्री क्रमांकावरुन किंवा ‘मायगव्ह ओपन फोरमद्वारेही’लोक आपले विचार कळवू शकतील.
****

 पाकिस्ताननं आपल्या भूमीवर हशतवादाला पायाभूत सुविधा देणं थांबवल्याशिवाय, भारत आणि पाकिस्तान यांच्यातली चर्चा निरर्थक असल्याचं, पाकिस्तानचे अमेरीकेतले माजी राजदूत हुसेन हक्कानी यांनी म्हटलं आहे. ते वॉशिंग्टन इथं पत्रकारांशी बोलत होते. उद्या आणि परवा किर्गिझिस्तान इथं होत असलेल्या, शांघाय सहकारी चर्चेच्या पार्श्वभूमीवर हक्कानी यांचं हे विधान महत्त्वाचं ठरत आहे. दहशतवाद आणि चर्चा या दोन गोष्टी एकत्र होऊ शकत नाहीत, ही भूमिका आहे, या भूमिकेचंचं हक्कानी यांनी समर्थन केलं आहे.
****

 खाजगी व्यापाऱ्यांसाठी तूरडाळ निर्यातीची मर्यादा चार लाख टनापर्यंत वाढवायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. ही मर्यादा ऑक्टोबरपर्यंत असून, खुल्या बाजारातून दोन लाख टन मसूर खरेदी करण्याचे निर्देश सरकारनं नाफेडला दिले आहेत. अन्नमंत्री रामविलास पासवान यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. मोसमी पाऊस लांबल्यानं उत्पादन घटण्याची शक्यता असल्यानं तूर डाळीची उपलब्धता वाढवणं आणि दरवाढ रोखणं हा यामागचा हेतू असल्याचं पासवान यांनी बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं.
****

 आंतरराष्ट्रीय बालकामगार प्रतिबंधक दिवस आज पाळण्यात येत आहे. बालमजूरीची समस्या सोडवण्यासाठी, विविध आस्थापनांचे मालक, कामगार संघटना आणि कोट्यावधी लोक एकत्र येऊन, मुलांना मदत करतात. 'मुलांनी शेतात काम करण्यावजी आपलं स्वप्न साकार करण्यासाठी काम करावं' ही या वर्षाची आजच्या दिवसाची संकल्पना आहे. बालमजूरी नष्ट करण्याच्या उद्देशानं आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेकडून २००२ पासून हा दिवस पाळला जातो.
****

 राज्यातल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना मानधनाच्या पन्नास टक्के रक्कम सेवानिवृत्ती नंतर दरमहा निवृत्ती वेतन म्हणून देण्यास, शासन सकारात्मक असल्याचं, महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे. राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या शिष्टमंडळासोबत काल मुंबईत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. केंद्र सरकारनं जाहीर केलेली मानधन वाढ अंगणवाडी सेविकांना लवकरात लवकर मिळावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचंही त्या म्हणाल्या.
****

 यवतमाळ जिल्ह्यातल्या कळंब पंचायत समितीसमोर आज पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत, नादुरुस्त ट्रकच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना, नागपुरकडे जाणाऱ्या दुसऱ्या भरधाव ट्रकनं नादुरुस्त ट्रकला धडक दिल्यानं हा अपघात घडला.
****

 नाशिकहून तीर्थयात्रेला निघालेल्या भाविकांच्या बसला मध्यप्रदेशात चित्रकूट इथं अपघात झाला. या अपघातात निफाड इथले चार भाविक मरण पावले, तर अनेक भाविक गंभीर जखमी झाले. काल रात्री विदिशा गावाजवळ हा अपघात झाला, अपघातातल्या जखमींना विदिशा इथल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतची क्रिकेट विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. शिखर धवनला झालेल्या दुखापतीमुळे त्याच्या स्पर्धेतल्या सहभागाबाबत अनिश्चितता निर्माण झाल्यानं, पंत याची निवड करण्यात आली आहे. भारतीय संघाच्या उद्या होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी तो इंग्लंडला भारतीय संघात दाखल होईल.

 दरम्यान, आज ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघात सामना होणार असून, आजच्या तसंच उद्याच्या या सामन्यावरही पावसाचं सावट असल्याचा अंदाज, स्थानिक हवामान विभागानं वर्तवला आहे.
****

 अरबी समुद्रात निर्माण झालेलं वायू हे चक्रीवादळ अधिक तीव्र झालं आहे. उद्या पहाटे हे चक्रीवादळ गुजराथमध्ये वेरावळ आणि दीवच्या किनारपट्टीला धडकेल, असा अंदाज आहे. या वादळामुळे सौराष्ट्र, दक्षिण गुजरात, दीव-दमण आणि दादरा नगर-हवेली इथं जोरदार पावसाची शक्यता आहे. संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, सैन्यदल, तटरक्षक दल आणि सीमासुरक्षा दल यांची बचाव पथकं सज्ज असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
*****
***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 23.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 23 June 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रप...