Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 June
2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ जून २०१९ सकाळी ७.१० मि.
****
** जलयुक्त शिवार योजनेसह जलसंधारणाची इतर कामं नियोजनबध्द पूर्ण
करून दुष्काळाचा डाग कायमचा पुसणार - मुख्यमंत्र्यांची ग्वाही
** पीक कर्ज वाटपासंदर्भात सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी दर सोमवारी बॅंकांच्या
प्रमुख अधिकऱ्यांसोबत बैठक घेण्याचे मुख्य सचिवांचे निर्देश
** शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा
काळ्या फिती लावून काम करण्याचा इशारा
आणि
** विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कालचा भारत - न्यूझीलंड सामना पावसामुळे
रद्द
****
राज्याच्या दुष्काळी भागात जलयुक्त शिवार योजनेसह जलसंधारणाची
इतर कामं नियोजनबध्द पूर्ण करून दुष्काळाचा डाग कायमचा पुसणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते काल सातारा जिल्ह्यात कराड इथं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या
अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर, शेतकरी मेळाव्यात बोलत होते. कृत्रीम बुद्धीमत्तेसारख्या
आधुनिक तंत्रज्ञानाचा शेती क्षेत्रात वापर करण्यासाठी ठोस पावलं उचलली आहेत, याच तंत्रज्ञानावर
आधारित डिजीटल पध्दतीचा, कीड नियंत्रणासाठी राज्याच्या सहा जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर
वापर सुरु असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
राज्य विधीमंडळाचं येत्या सोमवारपासून सुरू होत असलेलं
पावसाळी अधिवेशन विविध विषयांवरून वादळी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुष्काळ
निवारण-शेतकरी कर्जमाफी योजना आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष सरकारला कोंडीत
पकडण्याचा प्रयत्न करेल, असा अंदाज पीटीआयच्या वृत्तात वर्तवला आहे. गेल्या पाच वर्षांत
फडणवीस सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पांबाबत श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी विरोधी
पक्ष करणार असल्याचं, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहम्मद आरीफ नसीम खान यांनी सांगितल्याचं,
पीटीआयचं वृत्त आहे.
भाजप शिवसेना युती सरकारच्या कार्यकाळातलं हे अखेरचं अधिवेशन
असेल, या अधिवेशनात अठरा तारखेला पुरवणी अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. फेब्रुवारी महिन्यात
अर्थसंकल्पीय अधिवेशनात झालेल्या, राज्यपालांच्या
अभिभाषणावर चर्चाही या अधिवेशनात होणार आहे.
****
शेतकऱ्यांना पीक कर्ज वेळेवर मिळावं यासाठी दर सोमवारी
जिल्हाधिकाऱ्यांनी बॅंकांच्या प्रमुख अधिकऱ्यांची बैठक घेऊन अडचणींवर मार्ग काढावा,
असे निर्देश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले आहेत. मेहता यांनी काल राज्यातले सर्व
विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका
आयुक्त यांच्याशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. प्रधानमंत्री
शेतकरी सन्मान योजनेसाठी राज्यातल्या पात्र शेतकऱ्यांची माहिती ३० जून पर्यंत केंद्र
शासनाच्या पोर्टलवर अपलोड करावी, असं मेहता यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्य शासन अकरावी प्रवेशासंदर्भात विद्यार्थ्यांचं नुकसान
होऊ देणार नाही अशी ग्वाही, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे. अकरावी प्रवेश
प्रक्रिया नियमित वेळापत्रकानुसारच सुरु करण्यात येत असून या प्रक्रियेला कोणताही विलंब
झालेला नसल्याची माहिती त्यांनी दिली. अकरावी प्रवेशासाठी काही नामांकित महाविद्यालयांमधील
जागा वाढवता येऊ शकतील का याबाबत बैठक घेण्यात येणार असल्याचं तावडे यांनी सांगितलं.
दरम्यान, दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षा येत्या १७ जुलैपासून सुरू होणार आहे.
****
शाळा सुरु झाल्याच्या पहिल्या दिवशी राज्यातले सर्व मुख्याध्यापक,
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणार असल्याचा इशारा, शिक्षक
मतदार संघाचे आमदार विक्रम काळे यांनी दिला आहे. ते काल लातूर इथं, शिक्षक मेळाव्यात
बोलत होते. मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या या पाच
नोव्हेंबर २००५ पूर्वी झाल्या असून, त्यांना टप्प्याटप्प्यानं अनुदान देण्यात आल्यानं,
निवृत्ती वेतन लागू नाही. हा या सर्वांवर अन्याय असल्याचं काळे म्हणाले.
****
कर्मचारी राज्य विमा योजना अधिनियमाअंतर्गत कर्मचारी आणि
नियोक्त्यांचा अंशदान दर कमी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. हा दर साडे सहा टक्क्यांवरुन
चार टक्के केला जाणार आहे. येत्या एक जुलैपासून हे नवीन दर लागू होतील. या निर्णयाचा
साडे तीन कोटीपेक्षा अधिक कर्मचारी अणि पावणे तेरा लाखाहून अधिक नियोक्त्यांना लाभ
होणार आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून
प्रसारित केलं जात आहे.
****
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा
सामना पावसामुळे रद्द झाला. सामना सुरु होण्याच्या आधीपासूनच सुरू असलेला पाऊस न थांबल्यानं
सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही संघांना एक - एक गुण देण्यात आला.
या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत पावसामुळे रद्द झालेला हा चौथा सामना होता. गुणतालिकेत
न्युझीलंड सात गुणांसह पहिल्या तर पाच गुणांसह भारत तिसऱ्या स्थानावर आहे.
****
२१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात
येतो. ‘हृदयासाठी योग’ ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी
हे झारखंडमधल्या रांची इथं योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. आंतरराष्ट्रीय योग
दिनाचा राज्यस्तरीय कार्यक्रम यंदा नांदेडमध्ये होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात योगसत्राचं संचालन स्वामी रामदेव
बाबा करणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
राज्यातल्या सर्व २८८ तालुक्यांमधल्या तालुका क्रीडा संकुलामध्ये
योग दिवस साजरा करण्यात येणार असून प्रत्येक तालुक्यांमध्ये किमान पाच हजार विद्यार्थी
सहभागी होणार असल्याचं शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी काल मुंबईत
वार्ताहर परिषदेत सांगितलं.
****
रेल्वे तिकीटांच्या काळाबाजार प्रकरणी रेल्वे पोलिसांनी
काल रात्री अकोला इथल्या राधे एजन्सीवर छापा टाकला. या छाप्यात अनेक आक्षेपार्ह दस्तावेजांसह
देशभरातल्या आरक्षित तिकिटांचा मोठा साठा जप्त केला असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे. आज पहाटेपर्यंत ही कारवाई सुरू होती
****
औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत काल नवनिर्वाचित
खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा ठराव आणि शहराचा पाणी प्रश्न यावरून गोंधळ
झाला. सभागृहाची शिस्त भंग केल्या प्रकरणी एमआयएम पक्षाच्या काही नगरसेवकांना निलंबित
करण्यात आलं असून नेहमी गोंधळ घालणाऱ्या २० नगरसेवकांच्या कायम निलंबनाचा प्रस्ताव
राज्य शासनाकडे पाठवणार असल्याचं महापौर नंदकुमार घोडेले यांनी वार्ताहरांशी बोलतांना
सांगितलं.
****
बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी एक रोहीत्र
ही योजना आजपासून सुरु करण्यात येत आहे. परळी तालुक्यातल्या पांगरी आणि घाटनांदूर इथं
पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज या योजनेला सुरुवात होत आहे. १७५ कोटी रुपये
किंमतीच्या योजनेची अंमलबजावणी राज्य वीज वितरण कंपनीच्या उच्चदाब वितरण प्रणाली अंतर्गत
होणार आहे.
****
नांदेड जिल्ह्यात यावर्षी ७ लाख ८२ हजार हेक्टरहून अधिक
जमिनीवर खरीप पेरणीचं नियोजन पूर्ण झालं असल्याची माहिती जिल्हा कृषी विभागानं दिली
आहे. यासाठी १० लाख १५ हजार क्विंटल कापसाचं तर ९७ हजार १२७ क्विंटल इतर पिकांचं बियाणं
उपलब्ध करून देण्यात आलं आहे. शासनाच्यावतीनं यंदा अडीच लाख मेट्रीक टनहून अधिक रासायनिक
खतांचं नियोजन करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या कृषी विभागानं बोगस बियाणं
आणि खतांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथकांची स्थापना केली असल्याचं प्रशासनाच्यावतीनं
सांगण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment