Saturday, 15 June 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 15.06.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१५ जून  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 राज्यातील समाज बांधव सर्व सण आनंदानं शांततेत साजरे करतात, त्यामुळं राज्याच्या प्रगतीत वाढ झाली असून राज्यात इतर राज्यांच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय गुंतवणूक वाढली असल्याची माहिती  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते काल मुंबई पोलीस आयुक्तालयाच्यावतीनं आझाद मैदान येथील पोलीस क्लबमध्ये आयोजित ईद मिलन कार्यक्रमात बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शासन पुढील पाच वर्षांत अल्पसंख्याक समाजाला सर्वतोपरी मदत करुन मुख्य प्रवाहात आणणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. पोलीस विभाग मुंबईसह राज्यातील कायदा सुव्यवस्थेचं काम चांगल्या प्रकारे करत असून गेल्या पाच वर्षातील पोलीस दलाचं काम उत्कृष्ट आहे. यापुढंही ते असंच काम करतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीमध्ये निती आयोगाच्या नियामक मंडळाची पाचवी बैठक होणार आहे. नव्या सरकारच्या स्थापनेनंतरची ही पहिलीच बैठक आहे. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्र शासीत प्रदेशाच्या उप राज्यपालांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आलं आहे.
****

 झारखंडच्या सेराइकेला-खरसवन इथं माओवाद्यांच्या हल्लयात पाच पोलीस शहीद झाले आहेत. दोन सहायक फौजदार आणि तीन जमादारांचा शहीद झालेल्यांत समावेश आहे. त्याचं पथक काल तिरुलदीह पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर होतं, त्यावेळी त्यांच्यावर हा घातक हल्ला झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. दहा ते बारा माओवाद्यांनी दुचाकीवर येऊन पोलिसांच्या या पथकाला घेरून गोळीबार केला, त्यात ते शहीद झाले. माओवाद्यांनी पोलिसांची शस्त्रास्र पळवून नेल्याचं पीटीआयचं वृत्त आहे.
****

 सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ इथं एक कोटी 64 हजार रुपये किंमतीची माती चोरल्या प्रकरणी २३ जणांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सतरा वीट भट्टी चालक आणि सहा शेतकऱ्यांविरुद्ध या प्रकरणी परवान्यापेक्षा दहापट अधिक माती उपसा केल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी आल्या होत्या त्यावरून मिरज तहसीलदारांनी पोलिसांत गुन्हे नोंदवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 18.06.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 18 June 2026 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत...