Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 15
June 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ जून
२०१९ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी राष्ट्रपती भवनात
होणाऱ्या नीती आयोगाच्या नियामक मंडळाच्या
पाचव्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. निवडून आलेल्या नव्या सरकारच्या नियामक मंडळाची
ही पहिली बैठक आहे. पावसाच्या पाण्याची साठवणूक, दुष्काळी परिस्थिती आणि त्यावरच्या
उपाययोजना, जिल्ह्यांचे महत्त्वांकाक्षी कार्यक्रम, कृषी क्षेत्रातल्या सुधारणा आणि
नक्षलवादी जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करताना त्यांच्या सुरक्षितेशी संबंधित मुद्दे
याविषयांवर आजच्या बैठकीत चर्चा होईल. नीती आयोगाच्या नियामक मंडळामधे पंतप्रधान, सर्व
राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल तसंच इतर विशेष आमंत्रित
सदस्यांचा समावेश आहे.
दरम्यान, निती आयोगाच्या
बैठकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस मुख्यमंत्र्यांची काल भोपाळमध्ये बैठक झाली. मध्यप्रदेशचे
मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत राजस्थानचे मुख्यमंत्री
अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बाघेला आणि पाँडेचरीचे मुख्यमंत्री नारायणसामी
सहभागी झाले. प्रामुख्यानं निती आयोगाच्या
बैठकीत मांडण्याच्या मुद्दांवर या बैठकीत चर्चा झाली. सोबतच लोकसभा निवडणुकीत काँग्रेस
पक्षाचा झालेला पराभव आणि राहुल गांधी यांनी देऊ केलेला पक्षाध्यक्षपदाचा राजिनामा
यावरही या बैठकीत चर्चा झाली.
****
भारतानं ८७ नागरिकांना
वीजा द्यायला नकार दिल्याबद्दल पाकिस्तानाकडे तीव्र विरोध नोंदवला आहे. हे भाविक गुरू
अर्जुन देव यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित यात्रेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला
जाऊ इच्छित होते. भारतानं आपल्या नागरिकांच्या धार्मिक भावना आणि श्रद्धेचा अपमान करणाऱ्या
पाकिस्तानच्या निर्णयावर चिंता व्यक्त केल्याची माहिती सरकारी सुत्रांनी दिली आहे.
कोणत्याही प्रतिबंधांशिवाय या भाविकांना तातडीनं विजा दिला जावा, असं परराष्ट्र मंत्रालयानं
पाकिस्तानला म्हटलं आहे.
****
झारखंडच्या सेराइकेला-खरसवन
इथं माओवाद्यांच्या हल्लयात पाच पोलीस शहीद झाले आहेत. दोन सहायक फौजदार आणि तीन जमादारांचा
शहीद झालेल्यांत समावेश आहे. त्याचं पथक काल तिरुलदीह पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर
होतं, त्यावेळी त्यांच्यावर हा घातक हल्ला झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी
दिली आहे. दहा ते बारा माओवाद्यांनी दुचाकीवर येऊन पोलिसांच्या या पथकाला घेरून गोळीबार
केला, त्यात ते शहीद झाले. माओवाद्यांनी पोलिसांची शस्त्रास्र पळवून नेल्याचं पीटीआयचं
वृत्त आहे.
****
सिंचन सुविधांमुळे शेतकऱ्यांच्या
उन्नतीचा मार्ग प्रशस्त होतो, त्यामुळेच तेलंगणा राज्यातील काळेश्वरम सारख्या प्रकल्पांची आणि
त्यासाठी राज्यांच्या परस्पर सहकार्याची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी म्हटलं आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी काल मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. तेलंगणा राज्यातील या प्रकल्पाचं उद्घाटन मुख्यमंत्री
फडणवीस यांच्या हस्ते २१ जून रोजी होणार आहे. राज्यातही सिंचन
सुविधांच्या बळकटीकरणावर भर देण्यात आला असून त्याचसाठी मराठवाडा एकात्मिक पाणीपुरवठा
योजनेसारख्या महत्त्वाकांक्षी योजनेला वेग देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमुद
केलं.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख
उद्धव ठाकरे यांची काल भेट घेऊन प्रस्तावित मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा केली.
तत्कालीन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन, आरोग्यमत्री दीपक सावंत यांचा राजीनामा
आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांची लोकसभा सदस्य म्हणून झालेली निवड
या कारणांमुळे रिक्त झालेल्या जागा भरण्यासाठी मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे.
****
आज जागतिक ज्येष्ठ नागरिक गैरवर्तणूक निषेध जागरुकता
दिवस आहे. ज्येष्ठ नागरिकांना सहन कराव्या लागणाऱ्या गैरवर्तणुकीविरोधात आवाज उठवण्यासाठी
दरवर्षी पंधरा जूनला हा दिवस पाळण्यात येतो. ज्येष्ठ नागरिकांचा अपमान आणि त्यांच्या
प्रती गैरवर्तणूक थांबविण्यासाठी काम करत असलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या विनंतीवरून
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनं डिसेंबर २०११ मधे या दिवसाला अधिकृत मान्यता दिली.
ज्येष्ठ नागरिकांना सहन कराव्या लागणाऱ्या गैरवर्तणुकीमधे शारिरिक, मानसिक आणि आर्थिक
दृष्ट्या केलेल्या गैरवर्तनाचा समावेश आहे.
****
सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळ इथं एक कोटी ६४ हजार
रुपये किंमतीची माती चोरल्या प्रकरणी २३ जणांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सतरा
वीट भट्टी चालक आणि सहा शेतकऱ्यांविरुद्ध या प्रकरणी परवान्यापेक्षा दहापट अधिक माती
उपसा केल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी आल्या होत्या, त्यावरून मिरज तहसीलदारांनी
पोलिसांत गुन्हे नोंदवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment