Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 16
June 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ जून
२०१९ दुपारी १.०० वा.
****
मुंबईत राजभवनात आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. या मंत्रिमंडळात १३ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, आशिष शेलार, संजय कुटे, सुरेश खाडे, डॉक्टर अनिल बोंडे,
प्राचार्य
अशोक उईके आणि डॉक्टर तानाजी सावंत यांना कॅबिनेट मंत्री म्हणून, तर योगेश सागर, अविनाश महातेकर, संजय उर्फ बाळा भेगडे, डॉक्टर परिणय फुके
आणि अतुल सावे यांना राज्यमंत्री म्हणून राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
दरम्यान विष्णू सावरा, राजकुमार बडोले, प्रवीण पोटे, दिलीप कांबळे,
प्रकाश मेहता आणि अंबरिश अत्राम या मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले.
****
दरम्यान, जयदत्त क्षीरसागर यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड
झाल्याबद्दल बीड शहरातल्या बशीरगंज भागात शिवसैनिकांनी जल्लोष केला. औरंगाबादेतही पूर्व
मतदारसंघाचे आमदार अतुल सावे यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेताच त्यांच्या समर्थकांनी आणि भारतीय
जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी फटाके फोडून, मिठाई वाटून आनंद साजरा केला.
****
शिवसेनेच्या १८ नवनिर्वाचित
खासदारांबरोबर अयोध्या दौऱ्यावर असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज
रामजन्मभूमीला भेट दिली. यावेळी त्यांनी सहकुटुंब रामलल्लाची पूजाही केली. त्यानंतर,
सरकारनं राम मंदिरासाठी अध्यादेश आणावा, कायदा करून मंदिर बनवावं, असे उद्गार त्यांनी
अयोध्येतल्या पत्रकारांशी संवाद साधताना काढले. उद्या संसदेचं कामकाज सुरू होत आहे,
त्यापूर्वी शिवसेनेचे खासदार प्रभू रामाच्या दर्शनासाठी आल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
कृषीक्षेत्रात धोरणात्मक
सुधारणा करण्याकरता एक उच्चस्तरीय कृतीदल स्थापन करायची घोषणा, पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी काल नवी दिल्लीत, नीती आयोगाच्या
नियामक मंडळाच्या बैठकीत केली होती.
जलसंधारणाच्या क्षेत्रात
महाराष्ट्रानं लक्षणीय कामगिरी केल्यामुळे मागील वर्षी कमी पाऊस होऊनही राज्यात सुमारे
११६ लाख, मेट्रिक टन अन्नधान्याचं उत्पादन
घेतल्याचं या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं दुष्काळ निवारणासाठी आजवरची सर्वाधिक
अशी ४ हजार ७०० कोटी रुपयांची मदत दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्राचे आभार
मानल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
व्यवहारांचं डिजिटायझेशन मोठ्या प्रमाणात होऊ लागलं आहे.
त्यामुळे सायबर गुन्हे वाढण्याची शक्यता आहे. या आव्हानाला सामोरे जाण्याच्या सज्जतेमुळे
महाराष्ट्र पोलीस दल देशात सायबर पोलिसिंगच्या दृष्टिने अव्वल ठरणार आहे, असं
प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. वांद्रे इथल्या सायबर क्राईम पोलीस स्टेशन, पोलीस उप आयुक्त सायबर
क्राईम कार्यालय आणि निवासस्थानांचं भुमिपूजन मुख्यमंत्र्याच्या हस्ते झाले. त्यावेळी
ते बोलत होते. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात मिळून चाळीस सायबर लॅब स्थापन करण्यात आल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
****
गोव्यातल्या अगरवाडा - शिवोली इथं आज सकाळी
पुलावर झालेल्या अपघातात पेडण्यातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. यातच संतप्त
जमावानं अपघातग्रस्त वाहन पेटवल्यामुळे पुलावर तणाव निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी झाली.
घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान पोहचले, तरी जमाव पुलावरून हटण्यास तयार नसल्यामुळे
वाहनांच्या दोन्ही बाजूंनी रांगा लागल्या होत्या.
****
आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा सामना आज इंग्लंडमधल्या मँचेस्टर इथं थोड्याच वेळात सुरू होत आहे. पावसामुळे सामने रद्द होत
असल्याच्या पार्श्वभूमीवर आज मात्र मँचेस्टरचं आकाश निरभ्र असल्यामुळे सामन्यावरचं
संकट तूर्तास टळल्याचं, तसंच तिथल्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर आणि मैदानाबाहेर क्रिकेटप्रेमींची
चाहत्यांची आतापासूनच रीघ लागल्याचं वृत्त आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होणाऱ्या या सामन्याचं थेट समालोचन, आकाशवाणी वरुन दुपारी २ वाजून ३० मिनिटांपासून प्रसारित केलं जाईल.
*****
***
No comments:
Post a Comment