Saturday, 15 June 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 15.06.2019....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 June 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १ जून २०१९ सायंकाळी ६.००
****
भारतीय अर्थव्यवस्थेला २०२४ पर्यंत पाच खर्व डॉलर करण्याचं लक्ष्य आव्हानात्मक पण राज्यांच्या एकत्रित प्रयत्नांतून साध्य करणं शक्य असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत निती आयोग नियामक मंडळाच्या पाचव्या बैठकीत बोलत होते. `सर्वांची साथ, सर्वांचा विकास आणि सर्वांचा विश्र्वास` साध्य करण्यासाठी निती आयोगाला महत्त्वपूर्ण भूमिका बजवावी लागेल यावर पंतप्रधांनी यावेळी भर दिला. देशाच्या विकासासाठी आता प्रत्येकानं प्रयत्न करण्याची गरज असल्याचं नमूद करताना पंतप्रधानांनी यावेळी गरिबी, बेकारी, दुष्काळ, पूर, प्रदूषण, भ्रष्टाचार आणि हिंसाचार याविरुद्ध एकत्रित लढा उभारण्याची गरज व्यक्त केली.
****
ऑनलाईन साधनांच्या उपयोगाद्वारे गुन्ह्यांचं प्रमाण सध्या वाढत असून त्यावर प्रभावी नियंत्रण आणणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत सायबर प्रयोगशाळा, पोलिस ठाणे, प्रशिक्षण संस्था आणि निवासस्थानांसाठी उभारल्या जाणाऱ्या दहा मजली इमारतीच्या कोनशीला समारंभात बोलत होते. भविष्यात नव्या आव्हानांचा सामना करावा लागणार असून त्यांना तोंड देण्यासाठी राज्यात चाळीस सायबर प्रयोगशाळा सज्ज असून पोलिस दलाला तांत्रिकदृष्ट्या सक्षम करणं आवश्यक असल्याचं या संदर्भातील एका संदेशात मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं आहे.
****
राज्य मंत्रीमंडाळाचा उद्या विस्तार होणार आहे. नव्या मंत्र्यांना राज्यपाल चे विद्यासागर राव मुंबईत राजभवन इथं सकाळी अकरा वाजता शपथ देतील. राजभवनच्या सुत्रांनी आज ही माहिती दिली. भाजपचे अनिल बोंडे, रिपाईच्या आठवले गटाचे अविनाश महातेकर यांची नावं या विस्तारासाठी चर्चेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल भेट घेऊन प्रस्तावित मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा केली होती.
****
लोकसभेत शिवसेनेच्या संसदीय पक्षाचे गटनेते म्हणून रत्नागिरी-सिंधूदुर्ग मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आलेले खासदार विनायक राऊत यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी तशा आशयाचं पत्र संसदीय कामकाज मंत्रालयाला लिहून ही शिफारस केली आहे. शिवसेनेचे अठरा खासदार सतराव्या लोकसभेवर निवडून आले आहेत.
****
राज्य महिला आयोगाचा महत्वाकांक्षी प्रकल्प ‘प्रज्वला योजने’च्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ आज नंदुरबार इथं महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या तीन लाख बचतगटांद्वारे साठ लाख महिलांचं सक्षमीकरण आणि त्यांना स्वयंपूर्ण करण्यात येईल, अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रहाटकर यांनी यावेळी दिली.
****
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन केलं. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, पेरणीसाठी एकरी दहा हजार रुपये अनुदान तत्काळ द्यावं, पिक विमा त्वरित मंजूर करावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन होतं, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
यवतमाळ जिल्ह्यात राळेगाव तालुक्यातील वडकी इथं जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी कपाशीच्या दोनशे पिशव्या प्रतिबंधित बियाणं जप्त केली आहेत. याप्रकरणी आरोपी विनोद भोयरविरुद्ध वडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कृषी विभागानं यवतमाळ जिल्ह्यात घाटंजीच्या जरूर इथं बोगस बियाणांची चाळीस पाकिटं तर पांढरकवड्याच्या किंन्हाळा इथं साठ पाकिटं जप्त केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या निळवंडे प्रकल्पातून कालवे खोदण्याच्या कामाला आज इंदोरी इथल्या शेतकऱ्यांनी विरोध केला. दोन दिवसांपूर्वी या कामाला सुरूवात झाली आहे. उभ्या पिकात खोदकाम सुरू असून यामुळं पिकांचं नुकसान होत असंल्यानं शेतकऱ्यांनी या कालव्यांना विराध केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बारामतीकडे जाणारं पाणी सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागाकडे वळवण्याच्या निर्णयावरून सातारा जिल्ह्यातला राजकीय वाद सुरुच आहे. त्यावरून खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा निषेध म्हणून विधान परिषदेचे सभापती रामराजे यांच्या पुतळ्याचं खासदार उदयनराजे यांच्या समर्थकांनी आज साताऱ्यात दहन केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
धुळे जिल्ह्यात महसूल विभागानं शिंदखेडा तालूक्यातल्या टाकरखेडा शिवारात तापी नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत संबंधित एक कोटी सोळा लाख रुपयांची वाहनं आज जप्त केली आहेत. याप्रकरणी दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 17.06.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 17 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...