Friday, 7 June 2019

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 07.06.2019 7.10


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 June 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ जून २०१ सकाळी ७.१० मि.
****

** आरक्षणामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी वैद्यकीय शाखेच्या जागा वाढवून देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी
** रेपो व्याज दरात पाव टक्क्यांची कपात; अंकेक्षित व्यवहारांना चालना देण्यासाठी `एनईएफटी` आणि `आरटीजीएस` वरचं शुल्क रद्द करण्याचा भारतीय रिझर्व्ह बँकेचा निर्णय
** लोकसभेचं उपसभापतीपद देण्याची शिवसेनेची भारतीय जनता पक्षाकडे मागणी

आणि
** विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडिजवर १५ धावांनी विजय
****
आरक्षणामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी वैद्यकीय शाखेच्या जागा वाढवून देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याकडे केली आहे. नवी दिल्लीत काल मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन ही मागणी केली. सामाजिक आणि आर्थिक मागासवर्गीय - एसईबीसी आणि आर्थिक कमकुवत घटकांना देण्यात आलेल्या आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी या जागा वाढवणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी डॉक्टर हर्षवर्धन यांना सांगितलं. दरम्यान, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेनं प्रमुख व्याजदर रेपो दरात आणखी पाव टक्क्यांनी कपात केली असून हा रेपो दर आता सहा टक्क्यांवरून पावणेसहा टक्के झाला आहे. याचबरोबर अंकेक्षित -डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण-`एनईएफटी` आणि रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट- `आरटीजीएस` वरचं शुल्क रद्द करण्याचाही निर्णय बँकेनं जाहीर केला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पतधोरणाचा दुसरा द्वैमासिक आढावा काल भारतीय रिझर्व्ह बँकेनं काल जारी केला. पतधोरण समितीची बैठक संपल्यानंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काल मुंबईत वार्ताहरांना ही माहिती दिली. गेल्या चार महिन्यातली रेपो दरात केलेली ही सलग तिसरी कपात आहे. रेपो दरात कपात केल्यामुळे वाहनकर्ज आणि गृहकर्जाचे हप्ते कमी होण्याची शक्यता आहे. रिव्हर्स रेपो दर साडेपाच टक्के तर बँक दर सहा टक्के राहणार आहे. आर्थिक वृद्धी दराच्या यापूर्वी व्यक्त केलेल्या अंदाजात बदल करून तो आता सात टक्के राहील, असा नवा अंदाजही रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला आहे. 
****
लोकसभेचं उपसभापतीपद शिवसेनेला देण्याची मागणी भारतीय जनता पक्षाकडे केली आहे, असं शिवसेनेचे नेते राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी सांगितलं. भाजपच्या नेतृत्वाकडे ही मागणी पोहोचवली असल्याचं ते म्हणाले. पुढील आठवड्यात शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आपल्या १८ नवनिर्वाचित खासदारांसह अयोध्येला भेट देणार असल्याचंही ते म्हणाले. अयोध्येत राममंदिर उभारावं यासाठी शिवसेना वचनबद्ध असून  त्याचाच एक भाग म्हणून ही अयोध्या भेट असल्याचं ते म्हणाले.
****
केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल मुंबईत चित्रपट विभागाच्या आवारात वृक्षारोपण केलं. त्यांनी नुकत्याच सुरु केलेल्या `सेल्फी विथ सॅपलिंग` या उपक्रमाला चालना देत, पर्यावरण रक्षणाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशानं हे वृक्षारोपण केलं. यानंतर जावडेकर यांनी भारतीय चित्रपट संग्राहलयाला भेट दिली.
****
राज्यातल्या  विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना - भारतीय जनता पक्ष युती कायम राहील असं शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी काल कोल्हापूरमध्ये वार्ताहरांना सांगितलं. जागा वाटपाबाबत निर्णय नंतर जाहीर करणार असल्याचं ते म्हणाले. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते.
राज्य शासन दुष्काळी स्थिती चांगल्यारीतीनं हाताळत असल्याचं सांगून येत्या रविवारपासून आपण दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या दौऱ्यात दुष्काळग्रस्तांना धान्य आणि चारा छावणीतल्या जनावरांसाठी चारा देण्याचं त्यांनी जाहीर केलं. केंद्रात एकच मंत्रिपद मिळालं म्हणून शिवसेना नाराज नाही असं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.
****
परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातल्या कामांसाठी ३५ कोटी रुपयांचा निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून दिला जाईल अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल मुंबईत दिली. या आराखड्याच्या अंमलबजावणीचा त्यांनी आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने १३३ कोटी ५८ लाख रुपयांचा परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र आराखडा मंजूर केला आहे. अर्थमंत्र्यांनी मंदिराला पूर्वरूपात आणण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचंही सांगितलं.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरूळ इथल्या श्री क्षेत्र घृष्णेश्वर मंदिर विकास आराखड्याच्या कामांचा आढावाही मुनगंटीवार यांनी घेतला. मंदिर विकास आराखड्यातल्या कामांनी या मंदिराच्या वास्तू शिल्पात भर पडावी, अशा सूचना मुनगंटीवार यांनी केल्या. श्री क्षेत्र घृष्णेश्वर मंदिर परिसर विकासासाठी ११२ कोटी ४१ लाख रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान आणि परिसर विकासासाठी १४८ कोटी ३७ लाख रुपयाचा आराखडा मंजूर करण्यात आला असल्याची माहितीही मुनगंटीवार यांनी दिली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर काल मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी उपस्थित हजारो शिवप्रेमींनी दिलेल्या शिवछत्रपतींच्या जयघोषाने रायगड दुमदुमला. या सोळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, किल्ले रायगड विकास प्राधिकरण समितीचे अध्यक्ष युवराज संभाजीराजे, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावर्षी शिवराज्याभिषेक सोळ्यामध्ये छत्रपती शिवरायांवर अभिषेक करण्याचा मान छत्रपती संभाजीराजे युवराज शहाजी यांचे समवेत उस्मानाबाद जिल्ह्यातले आत्महत्याग्रस्त शेतकरी आवदड यांच्या कुटुंबियांना देण्यात आला. या कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी छत्रपती संभाजीराजे यांनी स्विकारली आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड शुगर अँड एनर्जी कंपनीच्या ३२८ कोटी रूपयांच्या कर्ज गैरव्यवहार प्रकरणी काल सक्तवसुली संचालनालय- ईडीनं कंपनीच्या मुंबई आणि परभणी इथल्या कार्यालयांवर छापे घातले. कंपनीचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे आणि इतरांविरोधात यापूर्वीच गुन्हे दाखल करण्यात आले असून याप्रकरणी अधिक पुरावे गोळा करण्यासाठी ईडीनं मनी लॉंडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ही कारवाई केली. कंपनीनं खोटी हमी आणि माहिती देत आठ ते दहा हजार शेतकऱ्यांच्या नावे  विविध बँकांकडून जवळपास ३२८ कोटी रूपयाचं कर्ज घेतलं आणि ते समूहाच्या वेगवेगळ्या उद्योगांमध्ये वळवण्यात आलं होतं.
****
लातूर शहराला पिण्यासाठी उजनी धरणातून कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी लातूर शहरातल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी हे निवेदन दिलं आहे. लातूर कायमच दुष्काळाचा सामना करत असल्यामुळे उजनी ते लातूर या पाणीपुरवठा योजनेबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, असं या निवेदनात म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकी दरम्यान केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी लातूर इथं उजनीचं पाणी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलं होतं, राज्य सरकारनं या योजनेचा प्रकल्प अहवाल तयार केला आला असून त्यासाठी ८०० कोटी रूपये  खर्च अपेक्षित आहे, असं निवेदनात नमूद केलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर शहरात काल वळवाचा पाऊस झाला. सेलू तालुक्याआडगाव दराडे परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यानं केळीच्या बागांचं मोठं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जालना, औरंगाबाद परिसरात काल पावसाच्या हल्यक्या सरी झाल्या.
दक्षिण कोकणात काही ठिकाणी तसंच उत्तर कोकण, मराठवाडा, विदर्भ तसंच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे.
****
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल ऑस्ट्रेलियानं वेस्ट इंडिजवर १५ धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियानं विजयासाठी वेस्ट इंडीजसमोर २८९ धावांचं आव्हान ठेवलं, मात्र वेस्ट इंडिजचा संघ ५० षटकात नऊ बाद २७३ धावांच करू शकला.
दरम्यान आज या स्पर्धेत पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे.
****
औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातल्या नगर रचना विभागात काल सकाळी आग लागली. यात महत्त्वाचे दस्तावेज तसंच फर्निचर जळून खाक झालं. अग्निशमन विभागाच्या दोन बबांनी ही आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्किटमुळं आग लागल्याचा अंदाज अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी  व्यक्त केला आहे.
****
मराठवाड्यातले नामवंत कबड्डीपटू आणि तेली समाजाचे जेष्ठ पदाधिकारी मनोहरराव पांगारकर यांचं काल दुपारी जालना इथं निधन झालं. त्यांच्यावर रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
औरंगाबादमधल्या शरणापूर -माळीवाडा इथं केडीआर फार्मची जागा अकृषक परवानगी नसतानां विकल्यामुळे बांधकाम व्यावसायिक संजय जोशी याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन वर्ष कारावास आणि २० हजार रूपये दंड ठोठावला आहे. जोशी यानं खोटा सातबारा तयार करून तुश्मन कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून केडीआर फार्म या नावानं प्लॉटवर घरे बांधून विकली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
**** भभयाकसाकसि.ाभसाकस.ाकसा.सक.ासका.अिहअह.
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण मधल्या जायकवाडी धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या औरंगाबादच्या चार तरूणांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला आहे. स्थानिक पोहणाऱ्या नागरिकांनी धरणात उड्या मारून तीन तरूणाना पाण्याबाहेर काढल्यानं ते बचावले. रमझान ईदच्या निमित्तानं हे चार तरूण जायकवाडी धरण परिसरात पर्यटनासाठी आले होते.
****
अहमदनगर जिल्ह्यामुळा धरणात जिलेटीनचा वापर करून स्फोट घडवून मासेमारी करत असल्या प्रकरणी पाटबंधारे विभागानं कारवाई केली आहे. ण परिसरात पहाटे स्फोटाचे आवाज झाल्याच्या पार्श्र्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. धरण अभियंत्यांनी या प्रकरणी चौकशी करून अवैध मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचे जाळे जप्त केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
***********

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.07.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 July 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...