Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 June
2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ जून २०१९ दुपारी १.०० वा.
****
सरकार
आरोग्यदायी भारत निर्माण करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करेल, अशी ग्वाही पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. समाजातील गरीब, वंचितांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा
पुरवल्या जातील, असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे. जनतेला स्वस्थ आरोग्यासाठी खाद्य
पदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षा अतिशय आवश्यक असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
आज साजरा केला जात असलेल्या पहिल्या जागतिक अन्न दिनानिमित्त पंतप्रधांनांनी हा संदेश
दिला आहे. केंद्र सरकारनं महात्मा गांधी
यांच्या शतकोत्तरी सुवर्ण महोत्सव जयंतीपर्यंत देशातील कुपोषणाची समस्या दूर करण्याचा
संकल्प केला असल्याची माहितीही पंतप्रधानांनी या संदेशात दिली आहे.
*****
जम्मू काश्मीरमधील
पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत चार दहशतवादी मारले गेल्याची माहिती
पोलिसांनी दिली आहे. दक्षिण काश्मीरमधील पांजरण इथं ही चकमक झाली. मारले गेलेले दहशतवादी
जैश ए मोहम्मदचे सदस्य असल्याचं वृत्त आहे. सुरक्षा दलांनी पांजरण भागात दहशतवादी असल्याची
माहिती मिळाल्यानंतर या परिसराला काल घेराव घालून शोध मोहीम हाती घेतली होती.
*****
मुंबईच्या विशेष न्यायालयानं
मालेगाव स्फोट प्रकरणी साक्षीदार गैरहजर राहिल्याबद्दल त्याच्या नावे जामीनपात्र वारंट
जारी केलं आहे. दिवसभरात केवळ एक साक्षीदार उपस्थित राहिल्याबद्दल न्यायमूर्तीं व्ही.
एस. पाडळकर यांनी राष्ट्रीय अन्वेषण विभागालाही फटकारलं आहे. अशा वातावरणात वेगानं
सुनवाई होऊ शकत नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. या आठवड्यात ज्या साक्षीदाराला
हजर करायचं होतं, त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही, अशी माहिती एनआयए अधिकारी आणि विशेष
सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली होती. साक्षीदाराला न्यायालयात सुनावणीची माहिती
होती तरीही अऩुपस्थित राहिल्यानं न्यायालयानं त्याच्या नावे जामीनपात्र वारंट जारी
केलं. भाजपच्या खासदार प्रज्ज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह
आठ जणांविरुद्ध मालेगाव स्फोट प्रकरणी खटला सुरू आहे. आरोग्याच्या कारणामुळं प्रज्ज्ञा
ठाकूर काल न्यायालयात हजर झाल्या नाहीत. मालेगांवमध्ये २९ सप्टेंबर २००८ रोजी विस्फोटात सहा जण
मारले गेले होते.
*****
रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात पाव टक्के कपात केल्यामुळे सुक्ष्म, लघू तसंच मध्यम
उद्योगांना परवडणार्या दरात कर्ज मिळू शकेल, त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी
मिळेल असं केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी एका संदेशात म्हटलं आहे.
*****
केंद्रिय मंत्रिमंडळाच्या
समित्यांमधे सरकारनं बदल केले असून, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना जास्तीत जास्त
समित्यांमधे स्थान दिलं आहे. परवा सरकारनं आठ मंत्रिमंडळ समित्यांचं पुनर्गठन केलं
होतं. त्यातल्या दोन समित्यांवर राजनाथ सिंग होते. आता आणखी चार समित्यांवर त्यांना
घेतलं असल्याचं मंत्रिमंडळ सचिवालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
*****
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील पांडाणे परिसरात मृग नक्षत्राच्या दिवसीच
पावसाने सकाळी सहा वाजता हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. पुणेगाव, काजीमाळे,
फोफशी, दहीवी, अंबानेर, पांडाणे परिसरात पावसाने मृग नक्षत्राच्या दिवशीच हलकेशी हजेरी
लावल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. सांगली जिल्ह्यात सकाळपासून पावसाला
आज सुरुवात झाली, योग्य वेळी पाऊस सुरु झाल्यानं शेतकरी समाधान व्यक्त करत आहे.
*****
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले इगतपुरी रस्त्यावर
इंदोरी फाटा इथं आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात
आलं. निळवंडे धरणातील पाणी अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी राखीव करण्यात यावं, खिळपाट
पाझर तलावाचं काम, भुमिगत कालवे करावे या मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्त आणि कालवेग्रस्त
शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं आहे.
*****
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील
ढवळपुरी इथं शेततळ्यात पोहण्यास उतरलेल्या तीन मुलांचा काल बुडून मृत्यू झाला. या दूर्घटनेत
पाण्याचा अंदाज न आल्यानं नावेद, ईस्माईल शब्बीर शेख आणि मोईन निजाम शेख हे तिघं बुडुन
मृत्यूमुखी पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
सोलापूर- पुणे महामार्गावर सोलापूर विद्यापीठाजवळ तेलंगणाची
एसटी बस आणि ट्रकमध्ये काल रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात १५ जण जखमी झाले असून
पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर सोलापुरच्या शासकीय रुग्णालय तसंच खाजगी रुग्णालयात
उपचार सुरु आहेत.
***********
No comments:
Post a Comment