Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 July 2019
Time 18.00 to
18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ जुलै २०१९ सायंकाळी ६.००
****
केंद्रीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक संवर्ग आरक्षण
विधेयकावर आज लोकसभेत चर्चा सुरू आहे. या विधेयकात, केंद्रीय शैक्षणिक संस्थांमध्ये
अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्ग आणि सामान्य प्रवर्गातल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल
घटकातल्या उमेदवारांच्या थेट भर्तीची तरतूद आहे. हे विधेयक संमत झाल्यास, केंद्र सरकारनं
या संदर्भात जारी केलेल्या अध्यादेशाची ते जागा घेईल. उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक
भर्तीसाठी तेरा बिंदू रोस्टर ऐवजी, दोनशे बिंदू रोस्टर अनुसार आरक्षण लागू करणं, हा
या विधेयकाचा उद्देश असल्याचं, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल यांनी
सांगितलं. काँग्रेसचे अधीररंजन चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, भाजपच्या
डॉ.प्रीतम मुंडे यांच्यासह अनेक सदस्यांनी या विधेयकावरच्या चर्चेत सहभाग घेतला.
****
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार सामाजिक आणि
शैक्षणिक मागास प्रवर्गांतर्गत मराठा समाजाला सरसकट सोळा टक्के ऐवजी, शिक्षणात बारा
टक्के आणि नोकरीत तेरा टक्के आरक्षण लागू करण्यासाठीचं विधेयक मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी विधानसभेत मांडलं. सदनानं हे विधेयक एकमतानं संमत केलं.
****
विधानसभेत आज शून्य प्रहरात लोकहिताचे अनेक मुद्दे उपस्थित
केले. राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांच्या
कार्याचा गौरव करावा, अशी मागणी विधानसभेत शून्य प्रहरात सदस्य सुभाष साबणे यांनी केली.
अनेक सदस्यांनी या मागणीला पाठिंबा दर्शवला. लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर
यांनी या मागणीचं स्वागत केलं.
काँग्रेसचे आरेफ नसीम खान तसंच यशोमती ठाकूर यांनी, राज्यात
मॉब लिंचिंगविरोधात कडक कायदा करण्याची गरज व्यक्त केली.
काँग्रेसचे लातूरचे आमदार अमित देशमुख यांनी, वैद्यकीय
अभ्यासक्रमासाठी प्रादेशिक आरक्षणाची अट काढून टाकावी, अशी मागणी केली.
परभणी तालुक्यात बोबडे टाकळी इथं पीकविम्याच्या बनावट
पावत्यांसंदर्भात सखोल चौकशी करून शेतकऱ्यांना महिनाभरात न्याय देण्याची ग्वाही कृषीराज्यमंत्री
सदाभाऊ खोत यांनी दिली. डॉ. राहुल पाटील यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.
महिला उद्योजकांसाठी स्वतंत्र औद्योगिक वसाहत असावी, असा
प्रस्ताव सदस्य प्रशांत बंब यांनी मांडला. महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी
या प्रस्तावाची दखल घेत असल्याचं सांगितलं. पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेदरम्यान त्या
बोलत होत्या.
दरम्यान, विधान सभेनं आज विविध विभागांच्या पुरवणी मागण्या
आवाजी मतदानानं मंजूर केल्या. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा उद्या समारोप होत आहे.
****
भूजलपातळीत वाढ करण्यासाठी हायड्रो फ्रॅक्चरिंग तंत्रज्ञानाचा
अधिकाधिक अवलंब करण्यात येईल, असं पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी
आज विधानसभेत सांगितलं. अतिशोषित पाणलोट क्षेत्रांमध्ये दोनशे फुटांहून अधिक खोलीची
कुपनलिका घेण्यास प्रतिबंध करण्यात आला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
****
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते
दिवंगत वसंतराव नाईक यांची जयंती आज सर्वत्र साजरी करण्यात आली. विधानभवनात विधान परिषदेचे
सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी तर मंत्रालयात
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण
करुन आदरांजली वाहिली. मराठवाड्यात औरंगाबाद, बीड, परभणीसह सर्वत्र नाईक यांना अभिवादन
करण्यात आलं.
****
३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत आज मराठवाड्यात ठिकठिकाणी
वृक्षारोपण करण्यात आलं. औरंगाबाद इथं वाल्मी परिसरात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष देवयानी
डोणगावकर आणि महापौर नंदकुमार घोडेले यांनी, लातूर इथं महापौर सुरेश पवार आणि मनपा
आयुक्त एम. डी. सिंह यांनी तर जालना इथं, जिल्हा परिषद इमारतीच्या आवारात जिल्हा परिषद
अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी वृक्षारोपण केलं.
****
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेशासाठी असलेलं ७०-३०
प्रादेशिक आरक्षण रद्द करावं, या मागणीसाठी आज बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं सर्वपक्षीय
मोर्चा काढण्यात आला.
****
No comments:
Post a Comment