Wednesday, 17 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 17.07.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 July 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक जुलै २०१९ सायंकाळी ६.००
****
केंद्रीय मंत्रीमंडळानं राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक २०१९ ला आज मंजुरी दिली. या विधेयकामुळे, भारतीय वैद्यकीय परिषदेची जागा भारतीय वैद्यकीय आयोग घेईल. तसंच, या विधेयकामुळे भारतीय वैद्यकीय परिषद कायदा १९५६, रद्द होईल. यातल्या तरतुदीनुसार, एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाची सार्वत्रिक परिक्षा, `नॅशनल एक्झिट टेस्ट`, या नावानं ओळखली जाईल आणि हीच परिक्षा पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची पात्रता परिक्षा राहील. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयं आणि अभिमत विद्यापीठांतल्या पन्नास टक्के जागांच्या शैक्षणिक आणि इतर शुल्कांचं नियमन आयोगाच्या अखत्यारीत राहील, असं जावडेकर यांनी सांगितलं.
****
औरंगाबादमध्ये जाहीर झालेल्या क्रीडा विद्यापीठासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज लोकसभेत केली. क्रीडा महासंघांमधे राजकीय नेत्यांचा सहभाग नसावा तसंच औरंगाबाद इथं फुटबॉल खेळासाठी सुविधा निर्माण कराव्यात अशी मागणीही खासदार जलील यांनी यावेळी केली.
****
शेतक-यांसंदर्भात सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या धोरणांचा अवलंब करावा, असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज लोकसभेत केलं. देशाच्या अर्थव्यवस्थेची जागतिक क्रमवारी सुधारत असताना शेतक-यांच्या आत्महत्या मात्र कमी होत नाहीत, अशा शब्दात त्यांनी चिंता व्यक्त केली.
****
मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात उद दावा या संघटनेचा प्रमुख हफीझ सईद याला आज पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतात तिथल्या दहशतवाद प्रतिबंधक विभागानं अटक केली. सईदला अमेरिकेनं विशेष जागतिक दहशतवादी  घोषित केलं आहे.
****
राज्यातल्या खाजगी पीक विमा कंपन्या आणि बँकांनी, शेतक-यांच्या, पीकविमा आणि कर्जमाफीच्या प्रलंबित प्रकरणांचे दावे येत्या पंधरा दिवसात मार्गी लावावेत अन्यथा तीव्र आंदोलन केलं जाईल, इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. शिवसेनेतर्फे आज मुंबईत राज्यातल्या खाजगी पीक विमा कंपन्यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
सरकारनं शेतक-यांच्या पीकविम्याच्या आणि कर्जमाफीच्या विविध योजना आणलेल्या असतानाही, शेतकऱ्याला त्याच्या हक्काचे पैसे पीक विमा कंपन्या मिळू देत नाहीत, असा आरोपही ठाकरे यांनी यावेळी केला.
****
घरकुल योजनेसाठीच्या पात्र लाभार्थ्यांची यादी  करण्याकरता आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं सर्वेक्षण करण्यात यावं आणि त्यानंतर यादीबाबत कार्यवाही करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात यावा, असे निर्देश आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर परिणय फुके यांनी दिले आहेत. राज्यातल्या बेघर आदिवासींना घरं उपलब्ध करून देण्यासंदर्भात आज मुंबईत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.
****
धुळे  जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्यानं वृक्ष लागवड मोहिमेवरही परिणाम झाला आहे. वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत राज्य शासनानं धुळे जिल्ह्याला दिलेल्या पासष्ट लाख शहात्तर हजार झाडांच्या उद्दीष्टापैकी नऊ लाख झाडांची लागवड केल्यानंतर, पावसाअभावी वनविभागानं वृक्षलागवडीचं काम थांबवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
समाजातल्या तळागाळातल्या व्यक्तींपर्यंत सर्व मूलभूत सुविधा पोहचवण्यावर भर देण्यात येत असून यासाठी पंडीत दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाच्या माध्यमातून समाजातल्या पात्र लाभार्थ्यांना गॅस जोडणी आणि शिधा पत्र उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचं नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. नागपूर इथं पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाचा आरंभ बावनकुळे यांच्या हस्ते आज करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
****
यावर्षी मराठवाडयात सरासरीच्या तुलनेत केवळ ३४ टक्केच पाऊस पडला  असल्यानं पीक परिस्थिती समाधानकारक नसून काही ठिकाणी अजुन पेरण्या शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत पर्यायी पीक  पेरणी करणं सोईस्कर होईल, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अधिकारी डॉ. यू. एन. आळसे यांनी दिला आहे.
यापुढील काळात पेरणीयोग्य पावसाच्या आगमनानुसार पीकांची पेरणी करावी, असं डॉ. आळसे यांनी सुचवलं आहे.
****




No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 15.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 15 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...