Friday, 3 April 2020

AIR NEWS BULLETIN 03.04.2020 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 03 April 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०३ एप्रिल २०२० दुपारी १.०० वा.

****

देशात कोरोना बाधितांची संख्या दोन हजार ३०१ झाली आहे. या संसर्गामुळे आतापर्यंत ५६ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर १५७ रुग्ण उपचारानंतर प्रकृतीत सुधार होवून घरी परतले आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयानं ही माहिती दिली. दरम्यान, भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेनं १२६ सरकारी प्रयोगशाळा तर ५२ खाजगी प्रयोगशाळांना कोरोनाविषाणू चाचणी घेण्याची परवानगी दिली आहे. 

*****

राज्यात कोरोना बाधितांची संख्या ४२३ झाली आहे. आतापर्यंत राज्यभरात कोरोना बाधित २० रुग्णांचा मृत्यू झाला असून ४२ रुग्ण उपचारानंतर बरे होवून घरी परतले आहे. केंद्र सरकारच्या सल्ल्यानं राज्य सरकारनं राज्यात ३० रुग्णालयांना फक्त कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी चिन्हांकित केलं आहे. या सर्व रुग्णालयांमध्ये दोन हजार तीनशे पाच खाटांची व्यवस्था करण्यात आली असून तिथे फक्त कोरोना बाधितांचाच उपचार केला जाईल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. या बाबतची अधिसूचना जाहिर केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

*****

जालना इथं उभारल्या जात असलेल्या कोरोना रुग्णालयातल्या विविध पदांसाठी सध्या जिल्हा परिषद इमारतीमध्ये थेट भरती प्रक्रिया सुरु आहे. मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांना सुरक्षित अंतर ठेऊन मुलाखत कक्षात प्रवेश दिला जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

कोरोनाच्या तपासणी साठी मिरज शासकीय रुग्णालयात अद्ययावत प्रयोग शाळेला पुण्याच्या विषाणू परीक्षण संस्थेकडून मान्यता मिळाली आहे. यामुळे सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातल्या कोरोना संशयित रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी मिरज इथं करता येणार आहे. चार ते सहा तासात कोरोना चाचणीचे अहवाल मिळतील अशी माहिती नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.

****

वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोना बाधित व्यक्ती आढळला नसून दिल्लीच्या निझामोद्दीन इथं झालेल्या मरकज मधून आलेल्या व्यक्तीला रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे.  त्याच्या लाळेचा नमुना तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. तसंच इतर तीन व्यक्ती देखील दिल्लीवरून आल्या असून त्यांनाही विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांचा मरकजशी कोणताही संबंध नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी प्रसार माध्यमांना दिली.

****

अहमदनगरचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी एक कोटी रूपये निधीबरोबरच आपलं एका महिन्याचं मानधन पंतप्रधान मदत कोषात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात टोल फ्री नंबर दिले असून, जे नागरिक इतर ठिकाणी अडकले आहेत त्यांना, ते आहेत त्या ठिकाणीच मदत मिळावी म्हणून प्रयत्न करत असल्याचं डॉ विखे पाटील यांनी सांगितलं

****

माजी मंत्री विधीज्ञ आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री मदत निधीसाठी एक लाख रुपयांचा धनादेश मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द केला आहे. पंतप्रधान मदत निधी आणि मुख्यमंत्री मदत निधीला शक्य असेल तशी मदत करा. आपल्या वस्तीत आजुबाजूला असलेल्या प्राणीमात्रांनाही मदत करा. प्रशासकीय आदेशांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा, असं त्यांनी आवाहन केलं.

****

परभणी जिल्ह्यात पूर्णा इथं भारतीय स्टेट बँक आणि महाराष्ट्र बँकेच्या शाखेसमोर आज खातेधारकांनी गर्दी केली होती. या दोन्ही बॅंकेच्या शाखा जवळजवळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली. प्रशासनाच्यावतीने वारंवार सांगूनही अंतर राखण्याच्या नियमाला हरताळ फासण्यात आला. शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचं अनुदान, कर्मचाऱ्यांचे पगार आणि पुढच्या आठवड्यात बँकांना दोन दिवस सुटी आल्यानं, आज खातेधारकांची गर्दी झाली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात कनेरगाव नाका इथं गल्ली बोळीतले सर्व रस्ते नागरिकांनी बंद केले आहेत. संचारबंदी नियमांचं काटेकोर पालन करत विनाकारण फिरणाऱ्यांना मनाई करण्यात आली आहे.

****

कोरोना विषाणूच्या प्रार्दूभावामुळं सुरु असलेल्या संचारबंदीत भटक्या गायी गुरांचे हाल होत असल्यामुळे धुळे शहरात आज रस्त्यावरील गाई वासरांना शिवसेनेचे धुळे जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांनी वाहनातून चारा आणून खाऊ घातला.

****

ज्येष्ठ पत्रकार रवींद्र जगताप यांच्या निधनाबद्दल राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. साहित्य, सांस्कृतिक तसंच सामाजिक क्षेत्रात मोठा वावर असलेल्या जगताप यांच्या निधनानं या सर्व क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना देशमुख यांनी व्यक्त केली.

//*************//






No comments:

Text आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.10.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 07 October 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत...