Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 14 June 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ जून २०१७ सकाळी ६.५० मि.
****
·
खरीपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना तातडीनं दहा हजार रुपये हंगामी
उचल देण्याचा राज्यसरकारचा निर्णय
·
राज्यभरात आदरातिथ्य क्षेत्रात
किमान ५० हजार लघुउद्योजक तयार करण्याचं राज्य सरकारचं उद्दीष्ट
·
दहावीचा निकाल जाहीर; औरंगाबाद
विभागाचा
८८ टक्के तर लातूर विभागाचा ८५ टक्के निकाल; अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची १८ जुलै पासून फेरपरीक्षा
आणि
·
मराठवाड्यात येत्या दोन दिवसात अतिवृष्टीचा
इशारा
****
खरीपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना तातडीनं दहा
हजार रुपये हंगामी उचल देण्याचा निर्णय राज्यसरकारनं घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत
पाटील यांनी ही माहिती दिली. मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत परिवहनमंत्री दिवाकर
रावते यांनी मांडलेला हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. राज्यभरात सुमारे ३४ लाख अल्पभूधारक
शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
भाडेपट्ट्याची मुदत संपलेल्या जिमखान्यांच्या भाडेपट्ट्यांच्या
नूतनीकरणाचं सुधारित धोरण काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलं. प्रादेशिक योजनांमल्या निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक किंवा अन्य बिगर शेती वापरासाठी असलेल्या
जमिनींसंदर्भात पूर्वी झालेले बेकायदेशीर व्यवहार, दंड आकारून नियमित करण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णयही कालच्या
बैठकीत घेण्यात आला.
****
कृषी
शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था स्थापनेसंदर्भातल्या काही अटी शिथिल करण्यासाठी ‘महाराष्ट्र
कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेशी’ चर्चा करून त्यावर विधायक तोडगा काढण्याचं आश्वासन
कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिलं आहे. कृषीमंत्री आणि महाराष्ट्रातल्या कृषी
तसंच कृषीसंलग्न महाविद्यालयांच्या व्यवस्थापन समिती यांच्यात काल मुंबईत झालेल्या
बैठकीत ते बोलत होते.
****
राज्यभरात
हॉस्पिटॅलिटी अर्थात आदरातिथ्य क्षेत्रात किमान ५० हजार लघुउद्योजक तयार करण्याचं उद्दिष्ट
असल्याचं, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे. आदरातिथ्य क्षेत्रातली आंतरराष्ट्रीय
पातळीवरील एअर बीएनबी ही कंपनी आणि राज्य शासनाचा पर्यटन विभाग यांच्यामध्ये, काल मुंबईत
सामंजस्य करार करण्यात आला, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रावल बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या करारामुळे राज्यातल्या पर्यटनस्थळांवर
आंतरराष्ट्रीय पर्यटकांना दर्जेदार आणि आंतरराष्ट्रीय मानके असलेली निवासव्यवस्था उपलब्ध
होण्यास चालना मिळेल, असं म्हटलं आहे.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे
मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या, इयत्ता दहावीच्या
परीक्षेचा निकाल ८८ पूर्णांक ७४ टक्के इतका लागला आहे.
औरंगाबाद विभागाचा निकाल ८८ पूर्णांक १५ शतांश तर लातूर विभागाचा निकाल ८५ पूर्णांक २२ शतांश एवढा लागला
आहे. औरंगाबाद विभागात बीड जिल्ह्याचा निकाल
सर्वाधिक ९२ पूर्णांक ६५ शतांश एवढा असून, जालना ८९ पूर्णांक ९० शतांश, औरंगाबाद ८९
पूर्णांक ५६ शतांश, हिंगोली ८० पूर्णांक ९३ शतांश, तर परभणी जिल्ह्याचा निकाल सर्वात
कमी ८०पूर्णांक ८९ शतांश लागला आहे.
लातूर विभागाचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत
चार टक्क्यांनी वाढला आहे. विभागात लातूर जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक
८९ पूर्णांक ५ दशांश इतका लागला
असून, उस्मानाबाद जिल्ह्याचा निकाल ८२ पूर्णांक ४८ शतांश तर नांदेड जिल्ह्याचा निकाल ८३
पूर्णांक
६ दशांश एवढा लागला आहे.
लातूर विभागातून गेल्या वर्षी पुनर्परीक्षेत
अनुत्तीर्ण झालेल्या एक हजार सहाशे विद्यार्थ्याना कौशल्य विकास योजनेतून प्रशिक्षण
देण्यात आलं आहे. हे विद्यार्थी अकरावीत एम सी व्ही सी अभ्यासक्रमासाठी थेट प्रवेश
घेऊ शकतील, अशी माहिती विभागीय सचिव गणपतराव मोरे यांनी दिली.
दहावीच्या इंग्रजी विषयाच्या परीक्षेच्या दिवशी, लातूर जिल्ह्याच्या चाकूर
इथं सर्पदंशामुळे रुग्णालयातून परीक्षा दिलेली प्रतीक्षा कांबळे ही विद्यार्थिनी,
७३
पूर्णांक ८० शतांश गुण मिळवत उत्तीर्ण झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांना गुणपत्रिका येत्या
२४ तारखेला दुपारी तीन वाजता शाळेतून मिळणार आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा
१८ जुलै पासून सुरू होणार आहे.
या निकालासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षण मंडळानं
हेल्पलाईन सेवा सुरु केली आहे. येत्या २० जून पर्यंत ही हेल्पलाईन सुरु राहणार आहे.
****
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं केंद्रीय माध्यमिक शिक्षण
मंडळ - सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना मिळणारे वाढीव गुण - ग्रेस मार्क्सची पद्धत रद्द
करण्याचा निर्णय घेतला आहे. २०१८ पासून वाढीव गुणांऐवजी नव्या धोरणाची अंमलबजावणी करण्यात
येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही
उपलब्ध आहे.
****
मराठवाड्यात येत्या दोन दिवसात अतिवृष्टीचा इशारा
देण्यात आला आहे. आज मध्यरात्रीपासून पुढचे ४८ तास विभागातल्या सर्वच जिल्ह्यात जोरदार
पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी विशेषत: शेतकऱ्यांनी या काळात दक्षता
घ्यावी, तसंच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनं सतर्क राहावं, अशा सूचना प्रशासनानं दिल्या
आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्यानं, उमरगा, तुळजापूर आणि उस्मानाबाद
तालुक्यात शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या सुरू केल्या असल्याचं, आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे. खरीप हंगामासाठी महाबीजसह विविध कंपन्यांचं ३५ हजार ५०८ मेट्रीक टन बियाणं
उपलब्ध करून देण्यात आलं आहे.
****
बीड इथं काल वीजवाहक तार तुटून वीजेचा धक्का बसल्यानं, एका बालकासह
एका महिलेचा मृत्यू झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही वीजवाहक तार तुटल्याचं सांगितलं
जात आहे.
****
परभणी जिल्ह्यात चारठाणा ते जिंतूर
मार्गावर काल तिहेरी अपघातात एक जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाले. एका जीपनं तीन दुचाकींना
धडक दिल्यामुळे हा अपघात झाला.
****
जालना औरंगाबाद रस्त्यावर काल इंधनाची
वाहतुक करणाऱ्या एका टँकरला लागलेल्या आगीत चालकाचा होरपळून मृत्यू झाला. मनमाडहून
नांदेडकडे जाणाऱ्या या टँकरचं टायर फुटून टँकरनं वीजेच्या खांबाला धडक दिल्यानं हा
अपघात झाला.
****
लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यात जादुटोणा विरोधी कायद्याअंतर्गत
काल चार जणांना अटक करण्यात आली. या चौघांनी एक महिला आणि एका अल्पवयीन मुलीवर अघोरी अत्याचार केल्याचा आरोप
आहे. या चौघांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी
दिली.
****
शासनाकडून स्वच्छतागृह बांधकामासाठी
मिळणाऱ्या १२ हजार रुपयांचं अनुदान मंजूर करण्यासाठी ५०० रुपयांची लाच घेताना बीड
जिल्ह्यातल्या वडवणी इथं कंत्राटी समूह समन्वयक विजय बिक्कड याला काल लाचलुचपत प्रतिबंधक
विभागानं रंगेहाथ अटक केली. संबंधिताच्या तक्रारीवरुन सापळा रचून ही कारवाई करण्यात
आली.
उस्मानाबाद पंचायत समितीतल्या संगणक
परिचालक अमोल पाटेकर यालाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल एक हजार रुपये लाच घेताना
रंगेहाथ अटक केली. घरकुल योजनेचा पहिला हप्ता मिळवून देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली
होती.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या
नर्सी नामदेव इथून संत नामदेव महाराजांची दिंडी आज आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान
करणार आहे. दिंडीतलं पहिलं रिंगण उद्या हिंगोलीत रामलीला मैदानावर होणार आहे. दिंडीचं
हे २२ वं वर्ष आहे
****
नांदेड जिल्ह्यात देगलूर
नांदेड महामार्गावर वाळूची अवैध वाहतूक करणारे सात ट्रक जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या
विशेष पथकानं काल पकडले. यावेळी या पथकानं एक कोटी चार हजार रूपयांचा मुद्देमालही जप्त
केला. या प्रकरणी १३ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
औरंगाबाद इथल्या मृद आणि जलसंधारण आयुक्तालयाच्या आयुक्त पदाचा
अतिरिक्त कार्यभार जल आणि भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मीचे कार्यकारी संचालक ह. का.
गोसावी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या पदावर भारतीय प्रशासन सेवेतल्या अधिकाऱ्यांची
नेमणूक होईपर्यंत गोसावी यांच्याकडे हा कार्यभार असेल. या संदर्भातला आदेश जलसंधारण
विभागानं काल जारी केला.
****
शासन पुरस्कृत योजनांना बँकांनी वेळेत कर्जपुरवठा
करावा, असं लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी म्हटलं आहे. जिल्हास्तरीय बँकर्स
समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. विविध महामंडळांमार्फत आलेले सर्व परिपूर्ण कर्ज
प्रस्ताव वेळेत निकाली काढावेत, एकही प्रस्ताव प्रलंबित ठेवू नये, असं जिल्हाधिकाऱ्यांनी
म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार १० रुपयांचे नाणे चलनात आहे, ते स्वीकारण्यास
नकार देणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
****
ज्येष्ठ समाजवादी नेते गोपाळ दत्ताराम दुखंडे यांचं काल सावंतवाडी इथं हृदय विकाराच्या
झटक्यानं निधन झालं, ते ७२ वर्षांचे होते. छात्रभारतीच्या कार्यात सक्रीय
सहभाग असलेले दुखंडे यांनी जनता दलाच्या प्रदेश चिटणीस पदाची जबाबदारी सांभाळली होती. दुखंडे यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
वस्तु आणि सेवा कर - जीएसटीची अंमलबजावणी
येत्या एक जुलै पासूनच होणार असून, अफवांवर विश्वास ठेऊ नये, असं सरकारनं स्पष्ट केलं
आहे. जीएसटीची अंमलबजावणी उशीरा होणार असल्याची अफवा सोशल मिडियावर पसरवण्यात आल्याच्या
पार्श्वभूमीवर अर्थमंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात हे स्पष्टीकरण देण्यात आलं.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेनं
५०० रुपयांची नवीन नोट जारी केली आहे. महात्मा गांधी श्रेणीतल्या या नव्या नोटेवर इन्सेटमध्ये
इंग्रजी ए अक्षर लिहिलेलं असेल.
****
आदिवासी मुलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र
सरकारच्या आदिवासी व्यवहार मंत्रालयानं आणखी ७२ शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी
दिली आहे.
//*******//
No comments:
Post a Comment