आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
१४ जून २०१७ सकाळी १०.००
वाजता
****
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून
सुरु होत आहे. येत्या २८ तारखेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असून, गरज पडली तर १७ जुलैला
मतदान होणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ २४ जुलैला संपत आहे. राष्ट्रपतीपदासाठी
उमेदवाराच्या निवडीबाबत चर्चा करण्यासाठी आज विरोधी पक्षांची बैठक होणार आहे.
****
दरम्यान, राष्ट्रपती पदाच्या उमेदवारासाठी सर्वांची सहमती तयार करणं सरकारचं
काम असून, त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या
नायडू यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. राष्ट्रपती पदाच्या
उमेदवाराची निवड करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांशी चर्चा केली जाईल असं त्यांनी स्पष्ट
केलं.
****
सरकारी निवासस्थानांवर अनधिकृत कब्जा करणाऱ्यांवर सरकारनं कडक पावलं उचलली
असून कायद्याच्या माध्यमातून ही निवासस्थानं सरकार सोडवणार असल्याचं नायडू यांनी म्हटल
आहे. ते नवी दिल्लीत भाजप सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित वार्ताहर परिषदेत
बोलत होते. या निवासस्थानांमध्ये रहाण्याचा कालावधी संपल्यानंतरही ती रिकामी न केल्याच्या
पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
भारतीय बँकांचं कोट्यवधी रुपयांचं कर्ज घेऊन लंडनमध्ये पळून गेलेल्या
विजय मल्याच्या प्रत्यार्पणावर काल इंग्लंडच्या वेस्टमिंस्टर न्यायालयात सुनावणी झाली.
न्यायालयानं चार डिसेंबर पर्यंत मल्ल्याचा जामीन मंजूर केला आहे. सहा जुलै रोजी पुढील
सुनावणी होणार असून, सुनावणी दरम्यान हजर राहण्याचे आदेश मल्ल्याला देण्यात आहे आहेत.
****
आदिवासी मुलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्र सरकारच्या
आदिवासी व्यवहार मंत्रालयानं या वर्षात आणखी ७२ शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी
दिली आहे. आदिवासी व्यवहार मंत्रालयानं केलेल्या विशेष प्रयत्नांमुळे सध्या २६ राज्यांमध्ये
१६१ शाळा कार्यरत असून, त्यामध्ये ५२ हजार आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महाराष्ट्रात या योजनेंतर्गंत सन २००० मध्ये पहिली शाळा सुरु झाली.
****
No comments:
Post a Comment