Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 June 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ जून २०१७ दुपारी १.००वा.
****
केंद्रीय मंत्रिमंडळानं शेतकऱ्यांना कमी व्याजात कर्ज देण्यास
मंजुरी दिली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. एकूण
नऊ टक्के व्याजापैकी पाच टक्के व्याज सरकार भरणार असल्यामुळे, शेतकऱ्यांना आता फक्त
चार टक्के व्याजदरात पिककर्ज मिळणार आहे.
****
ज्या खात्यांवर पाच हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक थकीत कर्ज
आहे, ती खाती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सल्लागार समितीनं वेगळी काढली आहेत. देशातल्या
एकूण बुडीत कर्जापैकी २५ टक्के कर्ज या खात्यांवरचं असून, दिवाळखोरी कायद्याअंतर्गत
या कर्ज वसुलीसाठी त्वरीत उपाययोजना केल्या जाणार आहेत.
अंशत: किंवा संपूर्ण बुडीत कर्जाची रक्कम असलेली अशी ५००
खाती शोधून काढण्यात आली आहेत. अशा खात्यांकडे प्राध्यान्यानं लक्ष देऊन कर्जवसुलीसाठी
उपाय शोधण्याला या समितीनं मान्यता दिली असल्याचं बँकेच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं
आहे. अशा खातेधारकांची नावं उघड न करता, त्यांना दिवाळखोर ठरवून, त्यांच्याकडून थकीत
कर्ज वसूल करण्याची प्रक्रिया सुरु करावी, असं समितीनं म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी देशातल्या रोजगार
स्थितीचा आढावा घेणार आहेत. रोजगार निर्मितीचं मूल्यमापन करण्यासाठी विश्वासार्ह आणि
कालबद्ध रोजगार आकडेवारी उपलब्ध नसल्याबद्दल वरिष्ठ नियोजनकर्त्यांनी चिंता व्यक्त
केल्याच्या पार्श्वभूमीवर ही आढावा बैठक होणार आहे. रोजगारासंबंधीची नवी आकडेवारी लवकरच
उपलब्ध होईल, ज्यामुळे देशातल्या रोजगार स्थितीचा अंदाज येईल, असं नीति आयोगाचे उपाध्यक्ष
अरविंद पनगडिया यांनी म्हटलं होतं.
****
देशातल्या ८०० शहरातल्या मुख्य टपाल कार्यालयात पारपत्र सुविधा
उपलब्ध होणार आहे. या वर्षी १५० टपाल कार्यालयात पारपत्र सेवा केंद्र सुरू करण्यात
येणार असून, येत्या दोन वर्षांच्या आत ८०० शहरात ही सेवा उपलब्ध केली जाणार असल्याची
माहिती परराष्ट्र राज्यमंत्री व्ही के सिंग यांनी दिली आहे. दुर्गम भागातल्या नागरिकांना
पारपत्र बनवण्यासाठी मोठ्या शहरात जावं लागतं, म्हणून केंद्र सरकारनं हा निर्णय घेतल्याचं
ते म्हणाले.
****
मराठवाड्यात येत्या दोन दिवसात अतिवृष्टीचा इशारा
देण्यात आला आहे. आज मध्यरात्रीपासून पुढचे ४८ तास विभागातल्या सर्वच जिल्ह्यात जोरदार
पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी विशेषत: शेतकऱ्यांनी या काळात दक्षता
घ्यावी, तसंच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनं सतर्क राहावं, अशा सूचना प्रशासनानं दिल्या
आहेत.
दरम्यान, आजही राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरु
आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर आज जोरदार पाऊस झाल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथल्या महापौरपदी कॉंग्रेसचे
रशिद शेख यांची निवड झाली आहे. शेख यांना ४१ मतं मिळाली असून, त्यांना शिवसेनेच्या
नगरसेवकांनी पाठींबा दिला. राष्ट्रीय जनता दलाचे नबी अहमद यांना ३४ मतं मिळाली. तर
उपमहापौरपदी शिवसेनेचे सखाराम घोडके यांची निवड झाली आहे.
****
औरंगाबाद इथल्या मृद आणि जलसंधारण आयुक्तालयाच्या
आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार जल आणि भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मीचे कार्यकारी
संचालक ह का गोसावी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या पदावर भारतीय प्रशासन सेवेतल्या
अधिकाऱ्यांची नेमणूक होईपर्यंत गोसावी यांच्याकडे हा कार्यभार असेल. या संदर्भातला
आदेश जलसंधारण विभागानं काल जारी केला.
****
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या २५ टक्के प्राथमिक शाळा सेमी
इंग्रजी करण्याचा ठराव नुकताच शिक्षण समितीनं मंजूर केला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातल्या
जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा आणखी सुधारणार आहे. शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख
यांनी सर्वच शाळा सेमी इंग्रजी करणं शक्य नसल्याचं सांगून, पहिल्या टप्प्यात २५ टक्के
शाळांना सेमीचा दर्जा देता येईल, असा पर्याय सूचवला. त्यावर समिती सदस्यांचं एकमत झालं.
****
शासन पुरस्कृत योजनांना बँकांनी वेळेत कर्जपुरवठा
करावा, असं लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी म्हटलं आहे. जिल्हास्तरीय बँकर्स
समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. विविध महामंडळांमार्फत आलेले सर्व परिपूर्ण कर्ज
प्रस्ताव वेळेत निकाली काढावेत, एकही प्रस्ताव प्रलंबित ठेवू नये, असं जिल्हाधिकाऱ्यांनी
म्हटलं आहे. रिजर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार १० रुपयांचं नाणं चलनात आहे, ते स्वीकारण्यास
नकार देणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
****
लंडन इथं सुरु असलेल्या चॅम्पियन्स चषक क्रिकेट
स्पर्धेत आज पाकिस्तान आणि इंग्लंड दरम्यान उपान्त्य फेरीचा सामना होणार आहे. भारतीय
वेळेनुसार दुपारी तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. दुसरा उपान्त्य सामना उद्या बर्मिंघम
इथं भारत आणि बांग्लादेश दरम्यान होणार आहे.
****
No comments:
Post a Comment