Friday, 16 February 2018

Text - AIR NEWS BULLETIN AURANGABAD 16.02.2018 6.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 February 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ फेब्रुवारी  २०१८ सकाळी ६.५० मि.

****

·       गारपीटग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·       मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स २०१८ परिषदेत १० लक्ष कोटी रूपयांच्या उद्योग कराराचं उद्दीष्ट

·       एक्क्याणवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून बडोद्यात प्रारंभ

आणि

·       भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज मालिकेतला शेवटचा एकदिवसीय क्रिकेट सामना

****

गारपीटग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. बीड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र नारायणगड इथल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी जात असताना, लातूर इथं वार्ताहरांशी काल ते बोलत होते. यावेळी बोलतांना ते म्हणाले.

एवढ्या वेगानं पंचनामे कधीच करण्यात आले नव्हते.दोन दिवसात आम्ही सगळे पंचनामे केले.एनडीआरएफ प्रमाणे मदत त्या ठिकाणी घोषित केली.आणि आता फायनल पंचनामे जे काही आहेत ते कलेक्टरांकडून येत आहेत.कारण की काही जागा सुटली असेल एखादं शेत सुटलं असेल एखाद्या सर्कलमध्ये काही कमी राहीलं असेल तर त्यांना पुढचे तीन ते चार दिवसांमध्ये सगळं फायनल सर्व्हे करून ते पाठवायला सांगितलेलं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही मदत देणार आहोत.



बीड तालुक्यातल्या नारायण गड इथं तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गतच्या विविध कामाचं भुमिपूजन, कोनशिलेचं अनावरण तसंच वृक्षारोपण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या शेवटच्या शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत कर्जमाफी योजना सुरूच राहणार असल्याचं सांगितलं. शासनानं ५० लाख शेतकऱ्यांना चार हजार कोटी रूपयांची कर्जमाफी दिली असल्याचं सांगून यातून जवळपास ७० ते ८० टक्के शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली असल्याचा दावा त्यांनी केला.

****

पुणे जिल्ह्यातल्या आळंदी इथं आयोजित सातव्या सरपंच महापरिषदेचं उद्घाटनही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. पायाभूत सुविधा, सामाजिक सुविधा आणि आर्थिक विकास हीच आदर्शग्राम विकासाची त्रिसूत्री असल्याचं सांगून त्यांनी, सरपंच हा पंचायत राज व्यवस्थेच्या विकासाचा पाया असल्याचं नमूद केलं. शेती आणि ग्रामविकास याला सरकार प्राधान्य देत असून, चौदाव्या वित्त आयोगामुळे गावांच्या विकासासाठी सरपंचांच्या खात्यात विकासासाठी थेट निधी जमा केला जात असल्याचं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं.

****

आपत्ती मदत निधीच्या नियमानुसार राज्य शासनानं अवकाळी पाऊस आणि गारपिटीग्रस्तांसाठी जाहीर केलेली मदत तोकडी असून, राज्य सरकारनं हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. जालना इथं वार्ताहरांशी काल ते बोलत होते. सरकारनं संपूर्ण कर्जमाफी जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात केवळ एक टक्का शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

****

राज्य शासनानं जाहीर केलेली कर्जमाफीची रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नसून, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची नुसतीच घोषणा सरकारनं केली असल्याची टीका, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. ते काल लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. आगामी निवडणुकीत आपला पक्ष भारतीय जनता पक्षासोबत युती करणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

****

राज्याच्या औद्योगिक वाढीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स २०१८ या जागतिक गुंतवणूक परिषदेत १० लक्ष कोटी रूपयांच्या उद्योगांच्या कराराचं उद्दीष्ट ठेवण्यात आल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं. या परिषदेच्या आयोजनाबाबतची माहिती काल त्यांनी वार्ताहरांना दिली.

येत्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई इथं या परीषदेचं उदघाटन होईल. या परिषदेत सुमारे साडेचार हजार सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या होणार असून यातून ३५ लाख रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा असल्याचं देसाई म्हणाले. जागतिक स्तरावरील गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची परिषद आयोजित करण्यात आली असल्याचं ते म्हणाले.

****

एक्क्याणवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून बडोद्यात प्रारंभ होत आहे. साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला सनई चौघड्यांच्या मंजूळ स्वरात, टाळ मृदुंगाच्या गजरात बडोदेकर साहित्यप्रेमींनी सारस्वतांचं स्वागत केलं. उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितीत राहणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम, कविसंमेलन, परिसंवाद, मान्यवरांचे सत्कार आदी कार्यक्रम होणार आहेत. दरम्यान, संमेलनाच्या पूर्वसंध्येला काल ग्रंथ दिंडी काढण्यात आली.  या ग्रंथदिंडीत राजमाता शिवांगिनी यांच्यासह मराठी साहित्य संस्कृती मंडळांचे अध्यक्ष बाबा भांड, गुजराती साहित्यिक डॉ. सितांशु यशचंद्र, संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, माजी अध्यक्ष अक्षयकुमार काळे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीनं औरंगाबाद इथं अनुसूचित जाती आणि जमातीच्या उद्योजकांसाठी राज्यस्तरीय परिषदेचं आयोजन आज करण्यात आलं आहे. सकाळी दहा वाजता सिडको इथल्या हॉटैल विंडसर कॅसेलमध्ये होणाऱ्या या परिषदेला राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती राष्ट्रीय लघु उद्योग मंडळानं प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

****

अन्न आणि प्रशासन विभागानं परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या ३५ औषधी दुकानांचे परवाने निलंबित केले आहेत, तर सात औषधी दुकानांचे परवाने कायमचे रद्द केले आहेत. औषधांची बिलाशिवाय विक्री, मुदतबाह्य औषधीची विक्री योग्य औषधीसमवेत साठवणूक, विनाफार्मासिस्ट औषधीची विक्री अशा कारणांमुळे ही कारवाई केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या एक लाख लोकांना योजनांचा लाभ देण्याचं उद्दिष्ट समाधान शिबिराच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार असून, यासाठी सर्व शासकीय यंत्रणेबरोबरच पदाधिकारी आणि नागरिकांनी सक्रिय सहभागी व्हावं, असं आवाहन राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलं आहे. परभणी इथं काल विस्तारित समाधान शिबिराच्या पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

****

क्रिकेट:

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान खेळल्या जाणाऱ्या सहा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना आज सेंच्युरियन इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडे चार वाजता या सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत चार सामने जिंकत भारतानं आधीच विजयी आघाडी घेतली आहे.

****

संत सेवालाल महाराज यांची जयंती काल सर्वत्र साजरी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुबंईत सेवालाल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. औरंगाबाद शहरातही या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील विविध शाळा महाविद्यालयांतून संत सेवालाल यांना अभिवादन करण्यात आलं तर ऑल इंडिया बंजारा टायगर्सच्यावतीनं शहरातून वाहन रॅली काढण्यात आली होती.

****

सामाजिक माध्यमावर वादग्रस्त लेखन करणारे औरंगाबाद महापालिकेचे कनिष्ठ अभियंता जयंत खरवडकर यांना निलंबित करण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी काल झालेल्या सर्वसाधारण सभेत दिले. महापालिकेच्या गेल्या आठवड्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक राजेंद्र जंजाळ आणि राज वानखेडे यांनी खरवडकर यांच्या लेखनाबाबत आक्षेप घेतला होता, त्यानंतर प्रशासनानं त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

****

भूगर्भातला पाण्याचा साठा कमी होत असल्यानं पाण्याचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहन जलमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर राजगोपाल कालानी यांनी केलं आहे. जलमित्र प्रतिष्ठानच्या वतीनं पाण्याचं महत्व या विषयावर जनजागृती करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात परभणी इथं काल ते बोलत होते.

****

समाजातल्या व्यक्तीचा विकास समोर ठेवून प्रसार माध्यमांनी सकारात्मक भूमिकेतून काम केल्यामुळे देशाचा विकास होतो, असं मत लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी व्यक्त केलं आहे. पत्र सूचना कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी काल ते बोलत होते. शासन आणि समाज यांच्यामधला संवादक म्हणून प्रसार माध्यमं काम करतात असं श्रीकांत यावेळी म्हणाले.

//**********//

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...