Sunday, 19 August 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 19.08.2018 - Morning Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19 August 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ ऑगस्ट २०१८ सकाळी ६.५० मि.

**** 

·                  डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्याला औरंगाबाद इथून अटक.

·                  केरळ पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्राकडून २० कोटी रुपये तातडीची आर्थिक मदत जाहीर.

·                  स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी उमेदवारांच्या शपथपत्रासंबंधी नियमात बदल.

आणि

·                  मराठवाड्यातल्या प्रलंबित शेतरस्ते प्रकरणांचा येत्या १७ सप्टेंबर पर्यंत निपटारा होणार.

****

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्याला दहशतवाद विरोधी पथक - एटीएसनं औरंगाबाद इथून अटक केली आहे. सचिन अणदुरे असं त्याचं नाव असून, नालासोपारा स्फोटक प्रकरणी तपासासाठी एटीएसनं चार दिवसांपूर्वी त्याला ताब्यात घेतलं होतं. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान, सचिन यानं दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याची कबुली दिली, असं एटीएसकडून सांगण्यात आलं आहे. नालासोपारा स्फोटक प्रकरणात गेल्या आठवड्यात पोलिसांनी अटक केलेला शरद कळसकर हा देखील औरंगाबाद जिल्ह्यातला रहिवासी असून, त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीवरून एटीएसनं ही कारवाई केली. सचिन अणदुरेला आज पुणे न्यायालयात हजर करणार असल्याचं, पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे.

या प्रकरणात एटीएसनं जालना इथल्या एका माजी नगरसेवकालाही ताब्यात घेतलं आहे. एका राजकीय पक्षाचा नगरसेवक म्हणून दहा वर्ष कार्यरत राहिल्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून हा संशयित राजकारणात सक्रीय नसल्याचं समजतं. एटीएसनं त्याच्या घराची झडती घेतल्याचंही वृत्त आहे. दाभोलकर यांच्या हत्येला उद्या पाच वर्ष होत आहेत. २० ऑगस्ट २०१३ रोजी दाभोलकर यांची पुण्यात हत्या झाली होती.

दरम्यान, अवैध स्फोटकं बाळगल्याप्रकरणी, मुंबईत नालासोपारा इथून अटक केलेल्या तिघांच्या पोलिस कोठडीत येत्या २८ तारखेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर अशी या तिघांची नावं आहेत. सोलापूर जिल्ह्यातून एका व्यक्तीकडून जप्त केलेल्या स्फोटकांसंदर्भात सखोल चौकशी आवश्यक असल्याचं, दहशतवाद विरोधी पथकानं न्यायालयाला सांगितलं. त्यामुळे न्यायालयानं पोलिस कोठडीत वाढ केली.

****

केरळ पूरग्रस्तांना मदत म्हणून राज्य शासनातर्फे २० कोटी रुपये तातडीची आर्थिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. समाजाच्या सर्व स्तरातील घटकांनी केरळच्या नागरिकांना शक्य ती मदत करावी, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. एम सी एच आय-क्रेडाई या संघटनेनं दीड कोटी रुपयांचे खाद्यपदार्थ उपलब्ध करुन दिले आहेत तर पुण्यातून रेल्वेमार्गे पिण्याचं सात लाख लीटर शुद्ध पाणी पुरवण्यात आलं आहे. राजस्थानी वेलफेअर असोसिएशन, जितो इंटरनॅशनलसारख्या संस्थांनी आर्थिक मदत जाहीर केली आहे. आतापर्यंत एकूण ११ टन खाद्यपदार्थ संकलित झाले असून, त्यापैकी सहा टन खाद्यपदार्थ काल केरळकडे रवाना झाले.

****

केरळमध्ये आलेल्या पुराला राष्ट्रीय आपत्ती घोषित करावी, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही या पुराला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी केली आहे. तसंच केंद्र सरकारनं केरळला ५०० कोटी रुपयांची जाहीर केलेली मदत ही पुरेशी नसल्याचं मत मुंडे यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केलं.

****

राज्यातही पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अद्याप पावसाचा जोर ओसरला नसल्यानं, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातली धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी सुमारे तीस टक्क्यांवर पोहोचली असून, धरणात काल सायंकाळी सुमारे अकरा हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत होती.

****

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्जासोबत सादर करायच्या शपथपत्राच्या नियमात बदल करण्यात आला आहे. आता या शपथपत्रात उमेदवारांना स्वत:च्या आणि कुटुंबियांच्या उत्पन्नाचा स्रोत, उत्पन्नाचे तसंच विविध करारांचे तपशील, यापूर्वी निवडणूक लढवली असल्यास त्याबाबतची माहिती नमूद करावी लागेल. सर्वोच्च न्यायालयानं १६ फेब्रुवारी २०१८ रोजी दिलेल्या निर्देशानुसार हा बदल करण्यात आला आहे. राज्याचे निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी ही माहिती दिली. उमेदवारांना गेल्या तीन वर्षांचे तपशील सादर करावे लागणार आहेत. यामध्ये शेती, नोकरी, व्यापार-व्यवसाय, भांडवली नफा, बक्षीस अथवा देणग्या, आणि इतर उत्पन्नाचा तपशील देणे बंधनकारक असेल.

****

सर्व राज्यांमध्ये कार्यरत ‘वन स्टॉप सेंटर्स’च्या कामकाजावर राज्य महिला आयोगांनी लक्षं ठेवावं, असे निर्देश, केंद्रीय महिला आणि बालविकास विभागानं दिले आहेत. महिलांच्या मदतीसाठी, सरकारनं वन स्टॉप सेंटर्सची स्थापना केली आहे. या केंद्रांवर योग्य पद्धतीनं काम होत नसल्याच्या अनेक तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश जारी करण्यात आले. देशात २०० वन स्टॉप सेंटर्सच्या मार्फत, आतापर्यंत सुमारे एक लाख तीस हजार महिलांना मदत करण्यात आली आहे.

****

संयुक्त राष्ट्र संघाचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचं काल स्वित्झर्लंडची राजधानी जिनेव्हामधे अल्पशा अजाराने निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. अन्नान यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांना शांततेच्या नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

****

मराठवाड्यातल्या प्रलंबित शेतरस्त्यांच्या प्रकरणांचा निपटारा शासनस्तरावर येत्या १७ सप्टेंबर पर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.पुरूषोत्तम भापकर यांनी दिली आहे. ते काल औरंगाबाद इथं जिल्हा सरपंच, पोलीस पाटील संकल्प परिषदेत उद्घाटनपर भाषणात बोलत होते. शेतकरी सबलीकरणासाठी सरपंचांनी गावा-गावात मनरेगाच्या कामांवर भर द्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. यावेळी राज्यातल्या प्रत्येक गावात पोलिस पाटलांच्या रिक्त जागा भरण्यात याव्या, त्यांचा एक प्रतिनिधी विधीमंडळात असावा, तसंच सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना दरमहा ग्रामसेवकाच्या पगाराइतकं सरकारी मानधन आणि निवृत्ती वेतन आदी मागण्यांचा समावेश आहे.

****

माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्याच्या प्रस्तावाला विरोध करणारे औरंगाबादचे एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना पोलिसांनी अटक केली आहे. महानगरपालिकेच्या परवा झालेल्या सर्वसाधारण सभेत मतीन यांनी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्याच्या प्रस्तावाला विरोध केल्यानंतर काही नगरसेवकांनी त्यांना मारहाण केली. महापालिकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी मतीन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर ही अटक करण्यात आल्याचं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं. तर मतीन यांनी दिलेल्या तक्रारीवरुन त्यांना मारहाण करणाऱ्या नगरसेवकांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

****

जालना जिल्ह्यात मंठा तसंच परतूर इथं जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण केली. अटलजींनी विकास आणि एकतेचा जो मूलमंत्र दिला, त्यानुसार मार्गक्रमण करणं, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल अशी भावना, लोणीकर यांनी व्यक्त केली.

माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना काल लातूर इथं श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सर्वपक्षीय नेते, सामाजिक संघटनाचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वाजपेयी यांना पुष्प अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. वाजपेयी यांचं कार्य पुढे नेणं, हीच त्यांना खरी श्रद्धांजली असल्याचं मत भाजपचे शहराध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

जालना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि आदिवासी शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती या योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना नवीन विहीरीचं खोदकाम करण्यासाठी अडीच लाख रुपये, विहीर दुरुस्तीसाठी ५० हजार रुपये, विद्युत पंप, वीज जोडणीसाठी तीस हजार रुपये तर शेततळ्याच्या अस्तरीकरणासाठी एक लाख रुपये अनुदान दिलं जाणार आहे. दीड लाख रुपये मर्यादेपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांनी योजनेसाठी येत्या नऊ सप्टेंबरपर्यंत शासनाच्या, ॲग्रीवेल डॉट महा ऑनलाईन डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावा, असं आवाहन जिल्हा कृषी विकास अधिकारी हरिश्चंद्र झनझन यांनी केलं आहे.

****

देशातल्या लघू उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा, या उद्देशानं केंद्र सरकारनं २० हजार करोड रुपये भांडवल असलेली ‘मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी’ अर्थात मुद्रा बँक स्थापन केली आहे. या बँकेच्या माध्यमातून लघू उद्योगांना कर्ज देण्यासाठी, देशातल्या इतर बँकांना प्रोत्साहनही देण्यात येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातले अर्जुन म्हस्के यांनी आपल्या दृष्टीहीनतेवर मात करून मुद्रा योजनेच्या माध्यमातून सतरंजी विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. या योजनेबाबत आपला अनुभव व्यक्त करतांना म्हस्के म्हणाले -

माझे नाव अर्जुन शिवाजी म्हस्के, आम्ही दोघं totally blind असल्यामुळं आम्हाला बँकेकडून मुद्रा योजनेतून २५ हजार रुपये मला रक्कम मिळाली. आणि ही रक्कम घेऊन मी त्याच्यामध्ये एक छोटा व्यवसाय चालू केला. सतरंज्याचा चालू केला. आणि त्याची परतफेड हळूहळू करत आहे. आमच्या पायावर उभारलोय. धन्यवाद आमचा.

****

बंजारा समाजाच्या वतीनं आरक्षणासह इतर मागण्यांसाठी काल परभणी जिल्ह्यात गंगाखेड तहसील कार्यालयावर हलगी मोर्चा काढण्यात आला. समाजाला मुलभूत सुरक्षा सुविधा मिळाव्यात, मुलांना शैक्षणिक तसंच आरोग्य विषयक सुविधा पुरवण्यात याव्यात, आदी मागण्यांचं निवेदन बंजारा न्याय हक्क मोर्चा समितीच्या वतीनं तहसीलदारांना देण्यात आलं. या हलगी मोर्चात बंजारा समाजातले महिला पुरुष मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

****

राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी काल हिंगोली जिल्ह्यात औंढा इथं नागनाथ मंदिराला भेट दिली. औंढा विश्रामगृह इथं त्यांनी आपल्या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सवांद साधला. 

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...