Saturday, 15 December 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 15.12.2018 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15  December 2018

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ डिसेंबर २०१ सकाळी ७.१० मि.

****



Ø राफेल विमान खरेदी व्यवहारात कोणतीही अनियमितता नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

Ø खोटा प्रचार केल्याप्रकरणी राहुल गांधी यांनी माफी मागावी - भाजपची मागणी

Ø  तंबाखूच्या उत्पादनावर संपूर्ण बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं सरकारकडून स्पष्ट

Ø  दाभोलकर हत्या प्रकरणातल्या तिघा आरोपींना पुणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर  

आणि

Ø  औरंगाबाद इथल्या वर्धन घोडे हत्येप्रकरणी दोघा आरोपींना आजन्म कारावास

****



 राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहारात कोणत्याही प्रकारची अनियमितता झाली नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. या कराराची केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या विविध याचिका, सर्वोच्च न्यायालयानं काल फेटाळून लावल्या. लढाऊ विमानांची देशाला आवश्यकता असून, या खरेदी व्यवहारामध्ये शंका घेण्याचं कोणतंही कारण नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये जेव्हा हा करार झाला, त्यावेळी कोणीही यावर आक्षेप घेतला नव्हता, याकडेही न्यायालयानं लक्ष वेधलं. फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्सवा ओलांद यांच्या विधानानंतर हा मुद्दा उपस्थित झाला, मात्र त्या विधानाला न्यायालयीन तर्क नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी या निर्णयाचं स्वागत करत, चुकीचे आरोप - खोटा प्रचार आणि जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. राहुल गांधींनी हे आरोप ज्या माहितीच्या आधारे केले, त्या माहितीचा स्रोत जाहीर करावा असंही ते म्हणाले.



 अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हा करार संरक्षण आणि वाणिज्यदृष्ट्या सुरक्षित असून, यामुळे देशाच्या क्षमतेत वाढ झाल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या निर्णयाचं स्वागत करत, राफेल विमान करारावर काँग्रेस पक्षानं लावलेले आरोप चुकीचे असल्याचं नमूद केलं.



 राफेल करारासंदर्भात न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं, रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी स्वागत केलं आहे. आपल्या कंपनीविरोधात राजकीय हेतूंनी प्रेरित आरोपातला खोटेपणा या निर्णयामुळे स्पष्ट झाला असल्याचं, अंबानी यांनी म्हटलं आहे.



 दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यासंदर्भात संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीची मागणीचा पुनरुच्चार केला आहे. सर्वोच्च न्यायालयानं राफेल प्रकरणी दाखल याचिका फेटाळल्या असल्या तरी, राफेलचा मुद्दा जनतेच्या न्यायालयात कायम असेल आणि आपला पक्ष संसदेत हा मुद्दा लावून धरेल, असं काँग्रेस नेते खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटलं आहे.

****



 दरम्यान, राफेल विमान मुद्यावरुन कालही संसदेचं कामकाज बाधित झालं. राफेल प्रकरणी पंतप्रधानांवर आरोप केल्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी करत भाजपच्या खासदारांनी लोकसभेत जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर दोन्ही बाजूच्या सदस्यांनी गदारोळ सुरु केल्यानं, अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कामकाज सोमवारपर्यंत स्थगित केलं. राज्यसभेतही या मुद्यावरुन गदारोळ झाल्यानं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं. 

****



 देशात तंबाखूच्या उत्पादनावर संपूर्ण बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं सरकारनं काल लोकसभेत सांगितलं. अन्न सुरक्षा अधिनियमाअंतर्गत गुटखा विक्रीवर बंदी घालण्यात आल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी सांगितलं. सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंधक कायदा २००३ अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास, तसंच १८ वर्षांखालच्या मुलांना तसंच शैक्षणिक संस्थांच्या परिसरातही तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी असल्याचं त्यांनी सांगितलं.

****



 काँग्रेसनं राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी अशोक गहलोत यांची, तर उपमुख्यमंत्रीपदी सचिन पायलट यांची निवड केली आहे. येत्या सोमवारी गहलोत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.

****



 प्रख्यात इंग्रजी लेखक अमिताव घोष यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य क्षेत्रात सर्वोच्च मानला जाणारा हा यंदाचा ५४ वा ज्ञानपीठ पुरस्कार आहे. घोष यांना पद्मश्री पुरस्कारासह साहित्य अकादमी पुरस्कारांनीही गौरवण्यात आलं आहे.

****



 येत्या १८ डिसेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असलेल्या पंतप्रधानांनी राज्याच्या दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून थेट भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ते काल नाशिक इथं बोलत होते. दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे मागितलेली सात हजार कोटी रूपयांची मदत, राज्य सरकारला अद्याप मिळालेली नाही. अशा परिस्थितीत पंतप्रधान केवळ मेट्रोच्या भूमिपूजनासाठी येत असतील तर ती दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा ठरेल, अशी टीका विखे पाटील यांनी केली आहे.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे नेते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातल्या तिघा आरोपींना पुणे सत्र न्यायालयानं, जामीन मंजूर केला. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं काल यासंदर्भात झालेल्या सुनावणीत, आरोपींना कुठलाही फायदा होणार नाही, यासाठी तपास यंत्रणांनी प्रयत्न करायला हवं, तपासाला होणारा विलंब आणि आरोपपत्र दाखल करण्याबाबत तपास यंत्रणांनी कायदेशीर मर्यादेचं भान बाळगायला हवं, असं नमूद केलं.



 दरम्यान, या आरोपींना जामीन मिळण्यास राजकीय उदासीनता कारणीभूत असल्याचा आरोप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केला आहे, ते काल नाशिक इथं बोलत होते.

****



 औरंगाबाद इथल्या वर्धन घोडे या बालकाच्या हत्येप्रकरणी आरोपी अभिलाष सुधीर मोहनपूरकर आणि श्याम लक्ष्मण पगारे या दोघांना जिल्हा आणि सत्र न्यायालयानं काल आजन्म कारावास आणि ५ लाख ३२ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. १० वर्षीय वर्धनची, गेल्या वर्षी २७ फेब्रुवारीला या दोघांनी निर्घृण हत्या केली होती.

****



 परभणी जिल्ह्याच्या पाथरी इथल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर आंदोलन करताना एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ काल भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काल बाजारपेठ बंद पाडली. मरडसगाव इथले शेतकरी तुकाराम काळे कर्ज मिळत नसल्यानं बॅंकेसमोर उपोषणाला बसले होते, त्यांचा काल मृत्यू झाला. बँकेच्या कामकाजामुळे काळे यांचा मृत्यू झाला असून, बँकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाकपनं केली आहे. 

****


 सातारा जिल्ह्यातल्या किल्ले प्रतपागडावर काल शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. भवानी मातेची पूजा, पालखी मिरवणूक असे विविध कार्यक्रम यावेळी पार पडले.

****


 बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथं योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्रोत्सवाला काल सकाळी वर्णी महापूजेनं प्रारंभ झाला. २२ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवासाठी योगेश्वरी देवल समितीच्या वतीनं भाविकांसाठी निवास, स्वच्छता, पेयजल आदींसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

****



  मुदखेड ते मुगट रेल्वे स्थानकांदरम्यान उद्यापासून दर रविवार, मंगळवारी आणि शुक्रवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे अदिलाबाद - नांदेड इंटरसिटी एक्सप्रेस गाडी मुदखेड स्थानकावर ८५ मिनिटं आणि काचीगुडा - मनमाड प्रवासी गाडी मुदखेड स्थानकावर ४५ मिनिटं थांबणार आहे.



 रामेश्वरम्‌ - ओखा - रामेश्वरम् ही गाडी रामेश्वरम्‌ ते मंडपम दरम्यान पुढील आदेश मिळेपर्यंत तात्पुरती रद्द करण्यात आली आहे.

****



 नाशिक जिल्ह्याच्या विकासासंदर्भात भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोसमवेत काल एक करार करण्यात आला. या करारानुसार जिल्ह्यातल्या शेती, गाव तळे, जलसंपदा, माती परीक्षण या कामांसाठी इस्रो उपग्रहीय छायाचित्रं आणि अन्य माहिती जिल्हा प्रशासनाला देणार आहे. जिल्हा स्तरावर माहितीची आदान प्रदान करणारा इस्रोचा हा देशातला पहिलाच करार आहे.

*****

***

No comments: