Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 23 December 2018
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
२३ डिसेंबर २०१८ सकाळी
७.१० मि.
****
· विविध २३ वस्तुंवरच्या करात
कपात करण्याचा वस्तू आणि सेवा कर परीषदेचा निर्णय.
· ४०व्या मराठवाडा साहित्य
संमेलनाला आजपासून उदगीर इथं प्रारंभ.
· उस्मानाबाद जिल्हा परिषद
शिक्षण विभागाचं पहिलं बालकुमार साहित्य संमेलन सुरू.
आणि
· गेल्या वर्षीचा विजेता अभिजीत
कटके आणि बुलडाण्याचा मल्ल बाळा रफीक यांच्यात आज ‘महाराष्ट्र केसरी’ किताबासाठी लढत.
****
वस्तू
आणि सेवा कर परिषदेनं काल विविध २३ वस्तुंवरचे कर कमी करण्याचा निर्णय घेतला. नवी दिल्ली
इथं काल परिषदेच्या बैठकीनंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी वार्ताहरांना ही माहिती
दिली. यामध्ये सहा वस्तूंवरचा कर २८ टक्क्यांवरुन १८ टक्के केला आहे. यात दूरचित्रवाणी
संच, टायर, पॉवर बँक, व्हिडिओ गेम्स, सिनेमा तिकिटं आणि धार्मिक यात्रेसाठीच्या विमान
प्रवासाचा समावेश आहे. १०० रुपयांपर्यंत सिनेमा तिकीटावर १८ टक्क्यांऐवजी १२ टक्के,
तर १०० रुपयांपेक्षा जास्त दराच्या सिनेमा तिकीटावर २८ टक्क्यांऐवजी १८ टक्के कर आकारला
जाईल. धार्मिक प्रवासासाठीचं विमान भाडं, तसंच दिव्यांग व्यक्तींच्या वाहनांच्या सुट्या
भागांवर पाच टक्के कर आकारला जाईल. गोठवलेला भाजीपाला तसंच बँक सेवेवर आता कोणताही
कर आकारला जाणार नाही.
या
निर्णयानंतर आता जीएसटी अंतर्गत २८ टक्के कराच्या कक्षेत, सिमेंट, भांडी घासण्याची
यंत्रं, वातानुकूलन यंत्र, वाहनांचे सुटे भाग, अशा २८ वस्तूच शिल्लक आहेत. वस्तू आणि
सेवा कर रचनेतले हे बदल येत्या एक जानेवारीपासून लागू होतील. दरम्यान, आयकर विवरणपत्र
भरण्यासाठीची नवीन प्रणाली एक जुलै २०१९ पासून अंमलात येईल, अशी माहितीही जेटली यांनी
यावेळी दिली.
****
एक
ट्रिलियन डॅालरची अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे प्रयत्न सुरू
असल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल लघु-मध्यम क्षेत्रातल्या
नवउद्यमींची संस्था - स्टार्ट अपची मुंबई शेअर बाजारामध्ये अधिकृत नोंदणी करण्यात आली,
त्यावेळी ते बोलत होते. येत्या काळात उद्योजकांनी आपलं भांडवल वाढवण्यासोबत रोजगार
निर्मितीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
****
आगामी
लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारचं धोरणच भारतीय जनता पक्षाच्या पराभवाचं कारण बनेल, असं
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक इथं
वार्ताहरांशी बोलत होते. विरोधी पक्ष कधीच जिंकत नाही, सत्ताधारी पक्षाचा नेहमी पराभव
होतो, असं सांगत ठाकरे यांनी, सरकारच्या विविध धोरणांवर टीका केली. देशातल्या १० महत्त्वाच्या
तपास यंत्रणांना कोणत्याही संगणकावर नजर ठेवण्याचा अधिकार देण्याच्या सरकारच्या निर्णयावरही
त्यांनी आक्षेप घेतला. सरकारी तिजोरीत पैसा नसताना, कांदा उत्पादकांना अनुदान कोठून
देणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जानेवारी मध्ये पुन्हा एकदा नाशिकच्या दौऱ्यावर
येणार असल्याचंही ठाकरे यांनी सांगितलं.
****
४०
व्या मराठवाडा साहित्य संमेलनाला आजपासून लातूर जिल्ह्यात उदगीर इथं प्रारंभ होत आहे.
संमेलनाच्या पूर्वसंध्येला उदगीर शहरातून ग्रंथ दिंडी काढण्यात आली. लातूर जिल्हा ग्रंथालय
संघाचे अध्यक्ष त्र्यंबकदास झंवर यांनी ग्रंथदिंडीचा शुभारंभ केला. संमेलनाचे नियोजित
अध्यक्ष डॉ ऋषीकेश कांबळे, स्वागताध्यक्ष रामचंद्र तिरुके, मराठवाडा साहित्य परिषदेचे
अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्यासह शालेय विद्यार्थी या दिंडीत सहभागी झाले होते.
आज सकाळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन
होणार असून, परवा २५ तारखेपर्यंत चालणाऱ्या या संमेलनात कथाकथन, कविसंमेलन, विविध विषयांवरचे
परिसंवाद होणार आहेत.
****
उस्मानाबाद
जिल्हा परिषद शिक्षण विभागानं आयोजित केलेल्या पहिल्या ‘बालकुमार साहित्य संमेलना’ला
काल सुरूवात झाली. या पहिल्या बालकुमार साहित्य संमेलनाची अध्यक्षा इयत्ता नववीची विद्यार्थीनी
साक्षी तिगाडे ही आहे. यावेळी बोलतांना चंदनशिव यांनी बालकांना या व्यासपीठावरून व्यक्त
होण्याचं आवाहन करत बालकांमध्ये साहित्याप्रती आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम मोलाचा
ठरेल असं सांगितलं. राज्यात प्रथमच जिल्हा परिषदेनं अशा प्रकारचं संमेलन आयोजित केलं,
त्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले.
त्याआधी
काल सकाळी आठ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथ दिंडी काढण्यात आली. टाळ, मृदंगाचा
गजर करणारं पथक आणि विविध वेशभूषेतल्या विद्यार्थ्यांनी यावेळी लक्ष वेधून घेतलं.
****
जालना
इथं सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत, गेल्या वर्षीचा विजेता अभिजीत
कटके आणि बुलडाण्याचा मल्ल बाळा रफीक यांच्यात आज महाराष्ट्र केसरी किताबासाठी लढत
होणार आहे
अभिजित
कटके यानं, काल गादी गटातल्या अंतिम सामन्यात, सोलापूरच्या रवींद्र शेंडगे याला चितपट
करून, सुवर्णपदक पटकावलं.
माती
गटाच्या अंतिम फेरीत, बाळा रफीक यानं रत्नागिरीच्या संतोष दोरवड याला चितपट करुन सुवर्ण
पदक जिंकलं.
दरम्यान,
अभिजित कटके आणि गणेश जगताप यांच्यात गादी गटाचा अंतिम सामना सुरु असताना, पंचाने वेळेपूर्वीच
शिट्टी वाजवल्याच्या कारणावरून, काका पवार आणि आयोजक यांच्यात वाद झाला. पंचांनी भेदभाव
केल्याचा आरोप करत, काकासाहेब पवार यांनी या स्पर्धेवर बहिष्कार टाकला. काका पवार तालीम
संघातले, पोपट घोडके, हर्षद सदगीर आणि अतुल पाटील या तीन खेळाडूंनी या स्पर्धेतून माघार
घेतली.
या
स्पर्धेत मराठवाड्यातल्या मल्लांनी विविध गटात पदकं पटकावली. यामध्ये ७९ किलो माती
गटात उस्मानाबादच्या वेताळ शेंडगे यानं सुवर्ण, ८६ किलो माती गटात जालन्याच्या बालाजी
यलगुंदे यानं रौप्य पदक, तर औरंगाबादच्या अजहर शेखनं ७९ किलो माती गटात कांस्य पदक
पटकावलं. अहमदनगरच्या अक्षस कावरे यानं ८६ किलो गादी गटात सुवर्ण तर अहमदनगरच्याच केवल
भिंगारनं ७९ किलो गादी गटात कांस्यपदक पटकावलं आहे.
****
नांदेड
जिल्ह्याच्या हदगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या काल झालेल्या निवडणुकीच्या मतदानाची
आज मतमोजणी आज होणार आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होतील. काल १८ जागांसाठी
जवळपास ८० टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.
****
अंबाजोगाई
इथल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाची काल पूर्णाहुतीनं सांगता
झाली. रात्री योगेश्वरी देवीच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली.
पालखी सोहळ्यात आराधी भजनीमंडळ, महिलांचे भजनी मंडळ, ढोलताशे तसंच झांज पथक नागरिकांचं
लक्ष वेधून घेत होते. विद्युत रोषणाईमुळे पालखी मार्ग झळाळून निघाला होता.
****
दत्त
जयंती काल सर्वत्र भक्तीभावानं साजरी झाली. नांदेड जिल्ह्यातल्या माहूर गडावर दत्तशिखर
इथं दत्त जन्म सोहळ्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. विदर्भ आणि मराठवाड्यातून आलेल्या
भाविकांची संख्या लक्षणीय असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. अक्कलकोट इथंही
काल दत्त जयंतीनिमित्त, स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
****
केंद्र
शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्यानं लातूरच्या दयानंद विज्ञान
महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या १६व्या इन्स्पायर शिबीराचं उद्घाटन रॉयल एज्युकेशन
सोसायटीचे अध्यक्ष, डॉ. एम. आर. पाटील यांच्या हस्ते काल करण्यात आलं. यावेळी बोलतांना
पाटील यांनी या इन्स्पायर शिबीराच्या माध्यमातून संशोधन करत असताना नाविन्यपूर्ण संशोधन
व्हावं असं प्रतिपादन केलं. येत्या २६ तारखेपर्यंत हे शिबित सुरू राहणार आहे.
****
लातूर
तालुक्यात एकुर्गा इथल्या जळालेल्या ऊस क्षेत्राची काल जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी
पाटील निलंगेकर यांनी पाहणी केली. यावेळी निलंगेकर यांनी जळालेल्या ऊसाच्या नुकसानीचे
पंचनामे करुन शासनाकडून अधिकाधिक मदत मिळवून देऊ अशी ऊस नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ग्वाही
दिली. एकुर्गा इथं विद्युत वाहिनीच्या मेन स्वीच मध्ये शॉट सर्कीट होऊन शुक्रवारी १०
ते १२ शेतकऱ्यांचा जवळपास ४० एकर क्षेत्रावरील ऊस जळाला असून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
झालं आहे.
****
मराठा
जातीचा इतर मागास प्रर्वग - ओबीसीमध्ये समावेश करून ओ.बी.सी आरक्षणाची मर्यादा वाढण्यासाठी,
छावा मराठा संघटनेच्या वतीनं येत्या २६ डिसेंबर पासून दिल्ली इथं आमरण उपोषण करण्यात
येणार आहे. छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण यांनी काल औरंगाबाद इथं ही
माहिती दिली.
****
केंद्र
सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालयाच्या वतीनं मुंबईत आयोजित हुनर हाट या प्रदर्शानाचं
उद्घाटन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल करण्यात आलं. येत्या ३१
डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन सुरू रहाणार असून देशभरातल्या विविध ठिकाणचे कारागीर, दस्तकार,
शिल्पकार यात सहभागी झाले आहेत.
****
No comments:
Post a Comment