Monday, 31 December 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.12.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३१ डिसेंबर   २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 काश्मीरच्या नौगाम जिल्ह्यात नियंत्रणरेषेवरील एका भारतीय चौकीवर हल्ला करण्याचा पाकिस्तान सीमा कृती दलाचा प्रयत्न मोडून काढताना भारतीय सैन्यानं दोन संशयित पाकिस्तानी सैनिकांना ठार केलं आहे. या ठिकाणी शस्त्रं आणि स्फोटकांचा फार मोठा साठाही सैन्यानं जप्त केला आहे. पाक सैन्यानं सुरू केलेल्या गोळीबाराच्या कवचाखाली काही घुसखोर भारतात शिरत असताना सैन्यानं ही कारवाई केली. याठिकाणी अजून काही घुसखोर असण्याची शक्यता लक्षात घेत सैन्यानं शोध मोहीम हाती घेतली आहे.

****

 एका वेळी तीन तलाक देण्याच्या पद्धतीला गुन्हा ठरवणारं तिहेरी तलाक विधेयक आज राज्यसभेत सादर होणार आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपआपल्या खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्याचा व्हिप काढला आहे. हे विधेयक आहे त्या स्वरूपात मंजूर होऊ देणार नसल्याचं काँग्रेसनं जाहीर केलं आहे. गेल्या गुरुवारी लोकसभेत हे विधेयक मंजूर झालं आहे.

****

 केंद्रीय माहिती आयोगाच्या मुख्य आयुक्तपदी केंद्र सरकारनं सुधीर भार्गव यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय सरकारनं अन्य चार माहिती आयुक्तांची नियुक्तीही केली असून, यात वनजा सरना या एकमेव महिला आयुक्तांचा समावेश आहे.

****

 कोरेगाव भीमाच्या लढ्याच्या दोनशे एकाव्या वर्धापनदिनानिमित्त उद्या तिथे आयोजित कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी भीम आर्मीचे प्रमुख  चंद्रशेखर आझाद काल पुण्यात पोहचले आहेत. सरकारनं परवानगी नाकारली तरी आपण भीमा कोरेगावला जाणार असल्याचं आझाद यांनी पत्रकारांना सांगितलं.

****

 अंदमान निकोबारमधल्या तीन बेटांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामकरण केलं असून रॉस नावानं ओळखलं जाणारं बेट आता  नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप नावानं,नील बेट शहीद द्वीप नावानं आणि हॅवलॉक बेट आता स्वराज द्वीप या नावानं ओळखलं जाईल. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर इथे तिरंगा फडकवण्याच्या घटनेला पंचाहत्तर वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी काल याबाबतची घोषणा केली.

****

 तिसरी राष्ट्रीय महिला मुष्टीयुद्ध स्पर्धा आजपासून कर्नाटकच्या विजयनगरमध्ये सुरू होत आहे. सहा जानेवारीपर्यंत चालणार असलेल्या या स्पर्धेत देशाच्या नामांकित खेळाडू भाग घेणार आहेत.

*****

***

No comments: