Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 29
December 2018
Time 7.10 AM to
7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९
डिसेंबर २०१८ सकाळी ७.१० मि.
****
Ø योग
हे जगासाठी भारताच्या
सौम्य शक्तीचं उत्तम उदाहरण
-
राष्ट्रपतींचं प्रतिपादन
Ø लैगिंक शोषणापासून
बालकांचं संरक्षण करणाऱ्या पॉक्सो कायद्यात मृत्यूदंडाची तरतूद
Ø कांदा उत्पादनात
वाढ झाल्यानं निर्यात अनुदान दुप्पट
Ø अपहरण आणि खंडणी
प्रकरणी लातूरच्या दोन नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल;एकास अटक
आणि
Ø ६४ व्या राष्ट्रीय
शालेय बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून औरंगाबाद इथं प्रारंभ
****
योग
हे जगासाठी भारताच्या सौम्य शक्तीचं उत्तम उदाहरण आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. ते काल मुंबईत योग इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात बोलत होते. एकत्व हे योगाचं दुसरं नाव
आहे, योगानं जगभरातल्या संस्कृतींना अंतर्गत धाग्यांनी जोडलं आहे. योगाचा प्रसार करण्यासाठी
केंद्र सरकार प्रयत्नशील असून, देशातल्या योग संस्थांच्या बळकटीकरणाची गरज राष्ट्रपतींनी व्यक्त केली. महाराष्ट्र आणि
इतर राज्यांनी शालेय अभ्यासक्रमात योगाचा समावेश केल्याबद्दल राष्ट्रपतींनी त्यांची
प्रशंसा केली. या कार्यक्रमाला राज्यपाल चे विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद येसू नाईक यांच्यासह अनेक मान्यवर
उपस्थित होते.
****
लैगिंक शोषणापासून बालकांचं संरक्षण करणारा पॉक्सो
कायदा अधिक कठोर करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. बालकांचं लैंगिक
शोषण करणाऱ्या आरोपीला मृत्यूदंडाची तरतूद या सुधारित कायद्यात असणार आहे. नैसर्गिक
आपत्ती आणि अन्य आपत्तीच्या काळात बालकांचं लैंगिक शोषण रोखण्यासाठी कायद्याच्या कलम
९ मध्येही बदल प्रस्तावित केले आहेत. कोणत्याही बालकाचं अश्लील छायाचित्रण बाळगणाऱ्यांसाठी
कठोर शिक्षेची तरतूदही या कायद्यात आहे.
****
महत्त्वाकांक्षी गगनयान कार्यक्रमालाही केंद्रीय
मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या कार्यक्रमाअंतर्गत तीन अंतराळवीरांचा चमू एक ते सात
दिवसांसाठी अंतराळात पाठवण्यात येणार आहे. यासाठी १० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित
आहे. भारतीय वैद्यकीय परिषदेची जागा घेणाऱ्या राष्ट्रीय आयोगाच्या स्थापनेसंदर्भातल्या
वैद्यकीय विधेयकाला, तसंच होमिओपॅथीसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करणाऱ्या विधेयकालाही मंत्रिमंडळानं काल मान्यता
दिली.
****
कांदा निर्यातीचं अनुदान पाच टक्क्यांवरून दहा टक्के
करण्यात आलं आहे. कांद्याच्या उत्पादनात वाढ झाल्यानं केंद्र सरकारनं काल हा निर्णय
जारी केला. एक नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीत
कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. मुंबई कृषी उत्पन्न
बाजार समिती वगळता राज्यातल्या सर्व बाजार समित्यांसाठी हा निर्णय लागू असेल. हे अनुदान
थेट बँक हस्तांतरणाद्धारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केलं जाणार आहे. या योजनेसाठी
दीडशे कोटी रुपये निधीही मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे. कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल
२०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानंही २० डिसेंबर रोजी घेतला होता.
****
राज्यातल्या
दुष्काळग्रस्त १५ जिल्ह्यांत राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीनं चालक तथा वाहक
पदाच्या ४ हजार २४२ पदांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री
दिवाकर रावते यांनी दिली. ते काल मंत्रालयात वार्ताहरांशी बोलत होते. यासंबंधीची
जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल असं ते म्हणाले. या १५ जिल्ह्यांमध्ये
मराठवाड्यातल्या हिंगोली वगळता अन्य ७ जिल्ह्यांचा समावेश आहे. औरंगाबाद स्मार्ट
सिटी प्रकल्पासाठी ५६० पदं एस. टी. महामंडळातर्फे कंत्राटी पद्धतीनं भरण्यात येणार
असल्याचं रावते यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या
पार्श्वभूमीवर रोजगार हमी योजनेअंतर्गत शंभर ऐवजी दिडशे दिवस
मजुरी उपलब्ध करुन देण्यास केंद्र सरकारनं मंजुरी दिली असून उर्वरित २१५ दिवसांची
मजुरी राज्य सरकारच्या वतीनं उपलब्ध करुन देण्यात येईल अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवठा योजनेद्वारे पिण्याचे पाणी आणि जनावरांना चारा
उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं
जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
लातूर इथं खासगी शिकवणी चालकाचं अपहरण करुन खंडणी
उकळल्या प्रकरणी दोन नगरसेवकांसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये
कॉंग्रेसचे नगरसेवक सचिन मस्के, स्वीकृत सदस्य पुनीत पाटील आणि व्ही एस पॅंथरचे संस्थापक
अध्यक्ष विनोद खटके यांच्यासह अनोळखी चार जणांचा समावेश आहे. हे सर्वजण शिकवणीचालक
विजयसिंह परिहार आणि राजीव तिवारी यांच्याकडे दरमहा खंडणी मागत होते. आतापर्यंत सहा
लाख ६६ हजार रुपये खंडणी घेऊन, आणखी २५ लाख रुपयांसाठी त्यांनी परिहार आणि तिवारी यांचं
१० डिसेंबरला अपहरण करून छळ केल्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. यापैकी
सचिन मस्के याना पोलीसांनी अटक केली असून, न्यायालयानं त्याना ३१ डिसेंबर पर्यंत पोलीस
कोठडी सुनावली आहे. इतर आरोपींचा विविध पथकांकडून तपास सुरू आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडचे
नगराध्यक्ष विजयकुमार तापडीया यांच्यासह त्यांच्या कुटुंबातल्या सहा व्यक्तींविरोधात
फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पंधरा वर्षांच्या करारावर घेतलेली जमीन करार संपल्यानंतरही
परत न करता, तापडिया यांनी आपल्या कुटुंबीयांच्या नावावर करून घेत, पुनर्विक्री केल्याचा
प्रकार समोर आला आहे, या प्रकरणी विविध कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं,
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अहमदनगर
महानगरपालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाचे बाबासाहेब वाकळे विजयी झाले. राष्ट्रवादी
काँग्रेस पक्ष आणि बहुजन समाज पक्षाच्या पाठिंब्यावर वाकळे यांनी विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारानी अर्ज मागे घेतल्यानं, भाजपचे वाकळे आणि शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे यांच्यात महापौर
पदासाठी थेट लढत
झाली. वाकळे यांनी बोराटे यांचा
१४ मतांनी पराभव केला, वाकळे यांना ३७ मते मिळाली. यामध्ये भाजपचे
१४, राष्ट्रवादी काँग्रेसचे १८, बसपाचे चार आणि एका अपक्ष
नगरसेवकाच्या मताचा समावेश आहे. सेनेचे बोराटे यांना २३ मते मिळाली.
****
औरंगाबाद इथं ६४ व्या राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेला
आजपासून प्रारंभ होत आहे. औरंगाबाद विभागीय क्रीडा संकुलात होणाऱ्या या स्पर्धेत देशभरातून
१४ वर्षे आणि १९ वर्षे वयोगटातले सुमारे एक हजार खेळाडू, सहभागी होणार आहेत. दोन जानेवारीपर्यंत
या स्पर्धा चालणार आहेत.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान
सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज
चौथ्या दिवशी भारतानं दुसरा डाव आठ बाद १०६ धावांवर घोषीत केला.
ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३९९ धावा करणं आवश्यक आहे. काल ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव एकशे ५१ धावांवर संपुष्टात आला. जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक सहा गडी बाद केले. आज उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या
दोन बाद ४४ धावा झाल्या. चार
सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ एक - एकनं बरोबरीत आहेत.
****
परभणी जिल्ह्यात सेलु इथं संगीतरत्न
हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. "शार्ङ्गदेव संगीत
मंच" च्या वतीनं सेलू इथल्या नूतन विद्यालयात आयोजित या महोत्सवाला आज सायंकाळी
पाच वाजता प्रारंभ होईल.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या नागेशवाडी शिवारातून जवळपास २० लाख रुपयांचा गुटखा पोलिसांनी
काल पकडला. हा गुटखा नांदेडवरुन हिंगोलीकडे नेला जात होता.
****
परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यात काल विजेच्या
तारांचं घर्षण होऊन सुमारे एक एकरावरचा ऊस जळून नुकसान झालं, देवेगांव शिवारात ही दुर्घटना
घडली. या आगीत उभ्या ऊसासोबत एक बैलगाडीही खाक झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं
आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यात हरडफ सजाच्या
तलाठ्याला साडे चार हजार रुपये लाच घेताना, लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं रंगेहाथ अटक
केली. बालाजी पन्नमवार असं या तलाठ्याचं नाव असून, तक्रारदाराच्या वडिलोपार्जित जमिनीचा
तक्रारदारच्या वडिलांच्या नावे फेरफार करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
*****
***
No comments:
Post a Comment