Friday, 21 December 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 21.12.2018....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 21 December 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ डिसेंबर २०१८ सायंकाळी ६.००

****

केंद्रीय गृह मंत्रालयानं देशातल्या १० महत्त्वाच्या तपास यंत्रणांना संगणकातल्या माहितीवर नजर ठेवण्याचा अधिकार बहाल केल्याच्या विरोधात आज राज्यसभेत विरोधकांनी गदारोळ केला. दुपारनंतर कामकाजाला सुरुवात झाल्यावर विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी, गृह मंत्रालयाच्या या आदेशावर आक्षेप घेत, यामुळे देशात आपत्कालिन परिस्थिती निर्माण होईल, असं मत व्यक्त केलं. असे आदेश जारी करुन सरकार नागरिकांच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाच्या अखंडतेला असणारा धोका लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं. माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिलं, मात्र विरोधकांचा गदारोळ वाढत गेल्याचं उपसभापतींनी कामकाज बुधवार २६ डिसेंबर पर्यंत स्थगित केलं. आता नाताळच्या सुटीनंतर गुरुवार २७ डिसेंबर रोजी सदनाचं कामकाज सुरू होईल.

****

शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं हा कायमस्वरुपी उपाय नसल्याचं संसदीय कार्य मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलं आहे. ते आज संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मुलभूत समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. मध्य प्रदेशात शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणं, ही केवळ एक राजकीय खेळी असल्याचा आरोप त्यांनी केला. राष्ट्रीय लोकशाही आघाडी पूर्णपणे एकत्र असल्याचंही तोमर यांनी नमूद केलं.

****

सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यासह वेतन वाढीच्या मागणीसाठी अखिल भारतीय बँक अधिकारी संघटनेनं आज संप पुकारला असून, या संपाचा अंशतः परिणाम बँकांच्या कामकाजावर झाला आहे. दरम्यान, तीन बँकांच्या विलिनीकरणाविरोधात युनायटेड बँक युनियन फोरमनं येत्या २६ तारखेला संपाचा इशारा दिला आहे.

****

लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध असून, नवीन औद्योगिक धोरणात या उद्योगांना विशेष सवलती दिल्या जातील, असं आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिलं आहे. मुंबईत आज आयोजित लघु आणि मध्यम उद्योग संघटनेच्या संचालकांच्या परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. छोट्या कंपन्यांमध्ये तयार होणारे सुटे भाग वापरण्यासाठी देश-विदेशातल्या मोठ्या कंपन्यांना सक्ती करण्यात आली असून, याशिवाय काही समस्या असतील तर त्यावर तोडगा काढला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

****

अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत शहरातल्या मुख्य रस्त्यावरच्या मुस्लिम ट्रस्ट पीर दावल मलिक देवस्थानच्या जमिनीवरचे सर्व अनधिकृत बांधकामं तत्काळ काढा अशी मागणी करत आत्मदहन करणाऱ्या तौसिफ हमीम शेख यांचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर कर्जत तालुक्यात नागरिकांनी ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन केलं, तसंच काही ठिकाणी दुकानं बंद ठेवण्यात आली. प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडली असून, तौफिक यांच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

****

कांद्याला दोन हजार ३०० रुपये हमीभाव दिला जावा, अशी मागणी करत धुळे इथं आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन करण्यात आलं. पंतप्रधानांनी शेतमालाला हमीभाव देण्याचं आश्वासन पूर्ण करावं, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.   

****

जालना इथं सुरु असलेल्या ६२ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आजच्या तिसऱ्या दिवशी ६१ किलो माती विभागात पुण्याच्या निखिल कदमनं साताऱ्याच्या सागर सुळचा सात - शून्य असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. तर दुसऱ्या उपान्त्य सामन्यात सांगलीच्या राहुल पाटीलनं उस्मानाबादच्या दत्ता मेटे याचा १२ - ११ असा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. कांस्य पदकासाठीच्या लढतीत सागर सूळनं दत्ता मेटेचा पराभव केला.

६१ किलो वजनी गटात गादी विभागाच्या उपान्त्य फेरीत कल्याणच्या जयेश साळवीनं नाशिकच्या सागर बर्डेचा दहा - शून्य असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. तर दुसऱ्या उपान्त्य फेरीत कोल्हापूरच्या सौरभ पाटीलनं जालन्याच्या अक्षय धानोरेवर चार - शून्य अशी मात करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. तर सागर बर्डेनं औरंगाबादच्या नुमेश पिंपळेचा आठ - दोन असा पराभव करत कांस्य पदक पटकावलं.

७० किलो गादी विभागातल्या उपांत्य लढतीत कोल्हापूरच्या स्वप्निल पाटीलनं पुण्याच्या दिनेश मोकाशीला चार - तीन असं हरवत, तर पुण्याच्या शुभम थोरातनं सोलापूरच्या धिरज वाघमोडेला आठ - दोन असं हरवत अंतिम फेरी गाठली. या गटात धीरज वाघमोडेनं कांस्य पदक जिंकलं.

****

राज्यात आज सर्वात कमी सहा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमान अहमदनगर इथं नोंदवलं गेलं. औरंगाबाद १०, परभणी ११ पूर्णांक पाच, तर उस्मानाबाद इथं १४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.08.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 15 August 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्...