Tuesday, 18 December 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 18.12.2018....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 December 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ डिसेंबर २०१८ सायंकाळी ६.००

****

देशभरात दळणवळणाच्या सोयी सुविधांचं अद्ययावतीकरण होण्यात स्थानिक नागरिक तसंच शेतकऱ्यांचं सहकार्य मोलाचं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पुणे इथं मेट्रो प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. आपलं सरकार पायाभूत सुविधा उभारणीला प्राधान्य देत असून, महाराष्ट्रात विविध ठिकाणी मिळून दोनशे किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गांचं काम सुरु असल्याचं, त्यांनी सांगितलं.

पंतप्रधानांनी त्यापूर्वी आज मुंबईत ठाणे-भिवंडी-कल्याण आणि दहिसर-मीरा भाईंदर मेट्रो या महत्त्वाच्या मेट्रो मार्गांच्या कामाची पायाभरणी केली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी १८ हजार कोटी रुपये किंमतीची ९० हजार घरं आणि अल्प उत्पन्न गटासाठी गृहप्रकल्प योजनेचं उद्धाटनही त्यांच्या हस्ते झालं. राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

केंद्र सरकारनं देशभरातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. ते आज संसद परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असल्याचं त्यांनी नमूद केलं. राफेल खरेदीची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीच्या मागणीचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.

****

बँक आपल्या दारी ही संकल्पना इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून साकार होत असल्याचं राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हटलं आहे. ते आज जालना इथं आयोजित एका कार्यशाळेत बोलत होते. ग्रामीण भागातले सर्वसामान्य नागरिक आणि छोटे व्यावसायिक यांना बँकींग क्षेत्राशी जोडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक उपयोगी ठरेलं, असा विश्वास खोतकर यांनी व्यक्त केला. 

****

औरंगाबाद महानगरपालिका हद्दीत आतापर्यंत एक लाख ६६ हजार ६१२ मुलांना गोवर रुबेला लस देण्यात आल्याचं महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितलं. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. गोवर - रूबेला लसीकरणाचे कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम नसून, याविषयी काही समाजकंटक चुकीची माहिती पसरवत असल्याचं आमदार इम्तियाज जलील यांनी यावेळी सांगितलं. नागरिकांनी न घाबरता आपल्या मुलांना ही लस देण्याचं आवाहन आमदार जलील यांनी केलं.

****

जिल्हा उपनिबंधकांनी आपल्या कांद्याबाबत राज्य सरकारकडे सादर केलेला अहवाल खोटा आणि कोणत्याही तपासणीशिवाय तयार केलेला असल्याचा आरोप, नाशिक जिल्ह्यातले कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी केला आहे. पंतप्रधान कार्यालयाला पाठवलेल्या पत्रात साठे यांनी हा आरोप केला. साठे यांनी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीला साडे सातशे किलो कांदा विक्रीतून आलेले एक हजार ६४ रुपये पंतप्रधान कार्यालयाला पाठवले होते, त्यानंतर उपनिबंधकांनी साठे यांचा कांदा निम्न प्रतीचा आणि काळसर असल्याचा अहवाल दाखल केला होता.

****

कोतवालांना चतुर्थश्रेणी मिळावा या प्रमुख मागणीसाठी हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य कोतवाल संघटनेतर्फे आजपासून बेमुदत आंदोलन सुरु करण्यात आलं. ३१ डिसेंबरपर्यंत शासनाने यावर निर्णय न घेतल्यास मुंबईत आझाद मैदानावर उपोषणाचा इशारा संघटनेनं दिला आहे.

****

पीक कर्जाच्या मागणीसाठी आंदोलन करताना परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातल्या मरडसगाव इथल्या शेतकऱ्याचा हृदयविकारानं मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना दहा लाख रूपयांची मदत बँकेकडून काल मिळणार होती. मात्र मुदत उलटून गेल्यावरही मयत शेतकरी कुटूंबाला ही रक्कम न दिल्यानं आज शेतकऱ्यांनी बँकेचं कामकाज बंद पाडलं.

****

जालना जिल्हा तसंच परभणी शहरातल्या घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यचे निर्देश पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत. या संदर्भात आज मुंबईत आयोजित बैठकीत ते बोलत होते. जालना जिल्ह्यातल्या पाणी पुरवठा योजनांसाठी विद्युत पंप, सौर ऊर्जेवर चालवण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली.

****

महावितरण कंपनीचा अतिरीक्त कार्यकारी अभियंता रामेश्वर सोनत याला आज औरंगाबाद इथं लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं वीस हजार रूपयांची लाच घेतांना रंगेहात अटक केली. वीजचोरी बाबतच्या दंडाची आकारणी कमी करण्यासाठी सोनत यांनं ही लाच मागितली होती.

****

राज्यात आज सर्वात कमी नऊ अंश सेल्सिअस तापमान जळगाव इथं नोंदवलं गेलं. नाशिक नऊ पूर्णांक पाच, औरंगाबाद ११ पूर्णांक चार, उस्मानाबाद १४ पूर्णांक सात, तर नांदेड आणि परभणी इथं सरासरी १५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

****

No comments: