Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 25 December 2018
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २५ डिसेंबर
२०१८ सायंकाळी ६.००
*****
राज्यात उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय
शैक्षणिक दर्जाच्या १३ शाळांचा शुभारंभ
आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. या शाळांना `भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा’ हे
नाव दिलं जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना उत्तम
शिक्षण देण्यासाठी शंभर शाळा निर्माण करायचा निर्णय राज्य सरकारनं
ऑक्टोबर २०१६ मध्ये घेतला होता. महाराष्ट्र आंतराष्ट्रीय शिक्षण मंडळाअंतर्गत सुरू झालेल्या या शाळांचा अभ्यासक्रम
संशोधन पद्धतीचा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्यातल्या ९० टक्के शेतकऱ्यांना सरकारच्या कर्जमाफी
योजनेचा लाभ मिळाल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. शिवसेना
पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पंढरपूरमध्ये पीक विमा आणि कर्ज माफी शेतकऱ्यांपर्यंत
पोचली नसल्याची टीका केल्याच्या पार्श्र्वभूमीवर, दानवे यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी
बोलताना ही प्रतिक्रीया दिली. उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रक्रीया सुरू आहे.
राज्यातल्या आत्महत्या पीडित १४ जिल्ह्यांमध्ये गहू दोन रुपये आणि तांदूळ तीन रुपये
किलो दरानं उपलब्ध करून देण्यात आल्याचं ते म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना
भाजप युतीबद्दल बोलणी अद्याप सुरू व्हायची आहे, असं दानवे यांनी सांगितलं.
****
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं सुरू असलेल्या मराठवाडा
साहित्य संमेलनाचा आज समारोप होत आहे. ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे
अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यावेळी उपस्थित आहेत. मराठवाडा साहित्य संमेलनासाठी २५
लाख रुपयांचं अनुदान देण्यात यावं, उदगीर जिल्हा निर्मिती करावी, मराठवाड्यातल्या सगळ्या
रेल्वे मार्गांचं दुहेरीकरण करून मध्य रेल्वेशी जोडण्यात यावेत, घाटनांदूर ते श्रीगोंदा,
लातूर ते बोधन रेल्वे मार्ग विकसीत करावा आदी ठराव यावेळी मांडण्यात आले. अटलजींच्या
कवितांवर आधारित ‘गीत नया गाता हूँ’ हा कार्यक्रम, तसंच विविध परिसंवाद या मराठवाडा
साहित्य संमेलनात आज झाले.
****
विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी आज बीड इथं
दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री पेयजल योजना आणि राष्ट्रीय पेयजल
योजनेतंर्गत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनस्तरावर करण्यात आलेल्या नियोजनाची संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष त्या गावात जाऊन पाहणी करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
दरम्यान, बीड इथं आगामी लोकसभा निवडणुकीत वापरण्यात
येणाऱ्या
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि मतदानाची पावती देणारं व्ही व्ही पॅट यंत्राचीही
भापकर यांनी प्रात्याक्षिकाव्दारे
माहिती जाणून घेतली. या यंत्रांसंबंधी
मतदारांमध्ये मोठया प्रमाणात
जनजागृती होण्यासाठी अधिकाऱ्यांनी
प्रयत्न करावा, असं ते म्हणाले.
****
परभणी इथं उभारण्यात आलेल्या केंद्रीय विद्यालयाचं उद्घाटन
आज पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते झालं. परभणी जिल्ह्याच्या
शिक्षण क्षेत्रात हा दिवस महत्वपूर्ण असून, देशपातळीवरच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ केंद्रीय
विद्यालयाच्या माध्यमातून झाल्याचं लोणीकर यावेळी म्हणाले. डॉ.पंजाबराव देशमुख वसतीगृह
निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी परभणीत
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परिसरातल्या वसतीगृहाचं उद्घाटनही आज लोणीकर
यांच्या हस्ते झालं.
****
राज्यात विदर्भात तापमानात घट, तर उर्वरित भागात तापमानात
वाढ झाली आहे, आज सर्वात कमी आठ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमान गोंदिया इथं नोंदवलं
गेलं. नाशिक आणि परभणी सरासरी १४, तर औरंगाबाद इथं १५ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची
नोंद झाली.
****
आशादिप दिव्यांग प्रतिष्ठाणने दिव्यांगांना वाचन - लेखनावर
मार्गदर्शनासाठी ३० डिसेंबर रोजी औरंगाबाद इथं विशेष कार्यशाळा ठेवली आहे. महात्मा
गांधी मिशनच्या आईनस्टाईन सभागृहात सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेदरम्यान ही कार्यशाळा
होईल. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्त्रोनं शोधलेल्या रोबो रायटरविषयी आठ संशोधक
यात मार्गदर्शन करणार आहेत.
****
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त
औरंगाबाद इथल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आलं. मराठवाडा
वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष भागवत कराड यावेळी प्रमुख उपस्थित होते.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तिसरा कसोटी क्रिकेट सामना
उद्या मेलबोर्न इथं सुरू होत आहे. भारतानं या सामन्यासाठी संघात तीन बदल केले आहेत.
रोहित शर्मा, मयांक आग्रवाल आणि रविंद्र जडेजा यांना मुरली विजय, के. एल. राहूल आणि
उमेश यादव यांच्याऐवजी संघात स्थान देण्यात आलं आहे. चार सामन्यांच्या या मालिकेत पहिला
सामना भारतानं तर दुसरा ऑस्ट्रेलियानं जिंकल्यानं मालिकेतील रंगत वाढली आहे.
//***********//
No comments:
Post a Comment