Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 19
December 2018
Time 7.10 AM to
7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९
डिसेंबर २०१८ सकाळी ७.१० मि.
****
Ø वस्तु आणि सेवा कर सुलभ करून ९९
टक्के वस्तु १८ टक्के कर रचनेत आणण्याचा प्रयत्न - पंतप्रधान
Ø पुण्यातल्या
मेट्रो प्रकल्पाच्या तिसऱ्या
टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते भुमिपूजन
Ø सरस्वती भुवन
शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी उद्योगपती राम भोगले विजयी
आणि
Ø दुसऱ्या क्रिकेट
कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा १४६ धावांनी पराभव
****
केंद्र सरकार वस्तू आणि सेवा कर- जीएसटी
सुलभ बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
मुंबईत एका समारंभात काल ते बोलत होते. ९९ टक्के वस्तू जीएसटीच्या १८ टक्के आणि
त्यापेक्षा कमी कर रचनेत आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. फक्त एक टक्का चैनीच्या
वस्तूंवरच २८ टक्के जीएसटी आकारला जाईल, असं ते म्हणाले. जीएसटी लागू होण्यापूर्वी
नोंदणीकृत उद्योगांची संख्या ही फक्त ६५ लाख होती, आता त्यात आणखी ५५ लाखानं वाढ
झाल्याची माहिती त्यांनी दिली.
राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर
यावेळी उपस्थित होते. पंतप्रधानांनी त्यापूर्वी काल मुंबईत ठाणे-भिवंडी-कल्याण, आणि दहीसर -मीरा
भाईंदर मेट्रो या मेट्रो मार्गांच्या कामाची पायाभरणी केली. प्रधानमंत्री आवास
योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी १८ हजार कोटी रुपये किंमतीची ९० हजार घरं
आणि अल्प उत्पन्न गटासाठी गृह प्रकल्प योजनेचं उद्धाटनही त्यांच्या हस्ते झालं. मुंबईत राजभवनात आयोजित छोटेखानी समारंभात, प्रसिद्ध व्यंगचित्रकार
दिवंगत आर के लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांवर आधारित टाईमलेस लक्ष्मण या पुस्तकाचं
प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते काल करण्यात आलं.
पुणे इथं मेट्रो प्रकल्पाच्या तिसऱ्या
टप्प्याचं भूमिपूजनही काल पंतप्रधानांच्या हस्ते झालं. देशभरात दळणवळणाच्या सोयी सुविधांचं अद्ययावतीकरण होण्यात
स्थानिक नागरिक तसंच शेतकऱ्यांचं सहकार्य मोलाचं आहे, असं पंतप्रधान यावेळी बोलतांना
म्हणाले. पायाभूत सुविधा उभारणीला सरकार प्राधान्य देत असून, महाराष्ट्रात विविध ठिकाणी
दोनशे किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गांचं काम सुरु असल्याचं, त्यांनी सांगितलं.
****
राफेल प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळात
संसदेचं कामकाज कालही बाधित झालं. लोकसभेचं कामकाज सुरू होताच, राफेल खरेदी चौकशीसाठी
संयुक्त संसदीय समिती, कावेरी खोऱ्यातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, आंध्र प्रदेशला विशेष
राज्याचा दर्जा या मुद्यांवरून घोषणाबाजी करत, काँग्रेस-अण्णा द्रमुक- आणि तेलगु देशम
पक्षाचे सदस्य हौद्यात उतरले. या मुद्यावरून लोकसभेत गोंधळ सुरूच राहिल्यानं अध्यक्षांनी
कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं. राज्यसभेतही याच मुद्यांवरून गदारोळ होत राहिल्यामुळे
सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.
****
केंद्र सरकारनं देशभरातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी
द्यावी अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. ते काल संसद
परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ मध्ये नवनियुक्त सरकारनं
शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचं त्यांनी नमूद केलं. राफेल खरेदीची चौकशी करण्यासाठी
संयुक्त संसदीय समितीच्या मागणीचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.
****
बँक आपल्या दारी ही संकल्पना इंडिया पोस्ट पेमेंट
बँकेच्या माध्यमातून साकार होत असल्याचं राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हटलं आहे.
ते काल जालना इथं आयोजित एका कार्यशाळेत बोलत होते. ग्रामीण भागातले सर्वसामान्य नागरिक
आणि छोटे व्यावसायिक यांना बँकींग क्षेत्राशी जोडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक
उपयोगी ठरेलं, असा विश्वास खोतकर यांनी व्यक्त केला.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं
जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
लातूर जिल्ह्यात गेल्या तीन - चार दिवसांपासून थंडीचा
जोर वाढल्यानं द्राक्ष बागायतदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. औसा, रेणापूर, चाकूर तालुक्यात
द्राक्ष बागांची संख्या अधिक आहे. या भागात थंडीमुळे द्राक्षांची वाढ खुंटणं, भुरी
रोगाचा प्रादुर्भाव होणं, मणी फुटणं या सारखं नुकसान होण्याची शक्यता असल्याचं द्राक्ष बागायतदार संघाचे पदाधिकारी शिवाजी
सोनवणे यांनी सांगितलं. त्यामुळे आताच बागयतदारांनी शेकोट्या पेटवणं, गंधकाची फवारणी
करणं आदी उपाय योजना सुरु केल्याची माहिती त्यांनी दिली.
****
औरंगाबाद इथल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी
प्रसिद्ध उद्योजक राम भोगले यांची निवड झाली आहे. काल झालेल्या निवडणुकीत भोगले यांनी,
त्यांचे प्रतिस्पर्धी विधीज्ञ जवाहर गांधी यांच्यावर ४३ विरुद्ध ३१ अशा फरकानं विजय
मिळवला. विधीज्ञ दिनेश वकील यांची यापूर्वीच संस्थेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड
झाली आहे. संस्थेच्या नवीन कार्यकारिणीमध्ये ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ, निवृत्त
न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. नंदकुमार उकडगावकर आदी मान्यवरांचा
समावेश आहे.
****
अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील गैरव्यवहार
प्रकरणी आमदार रमेश कदम यांना काल तपास अधिकाऱ्यांनी जालना इथं विशेष जिल्हा आणि सत्र
न्यायालयासमोर हजर केलं. कदम यांच्यावर आरोप निश्चितीसाठी न्यायालयानं येत्या ३ जानेवारीला
पुढची सुनावणी ठेवली आहे.
****
औरंगाबाद महानगरपालिका हद्दीत आतापर्यंत एक लाख ६६
हजार ६१२ मुलांना गोवर रुबेला लस देण्यात आल्याचं महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितलं.
ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. गोवर - रूबेला लसीकरणाचे कुठल्याही प्रकारचे
दुष्परिणाम नसून, याविषयी काही समाजकंटक चुकीची माहिती पसरवत असल्याचं आमदार इम्तियाज
जलील यांनी यावेळी सांगितलं. नागरिकांनी न घाबरता आपल्या मुलांना ही लस देण्याचं आवाहन
आमदार जलील यांनी केलं.
****
कोतवालांना चतुर्थश्रेणी मिळावी, या प्रमुख मागणीसाठी
हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य कोतवाल संघटनेतर्फे कालपासून बेमुदत
आंदोलन सुरु करण्यात आलं. ३१ डिसेंबरपर्यंत शासनाने यावर निर्णय न घेतल्यास मुंबईत
आझाद मैदानावर उपोषणाचा इशारा संघटनेनं दिला आहे.
****
जालना जिल्हा तसंच परभणी शहरातल्या घनकचरा आणि सांडपाणी
व्यवस्थापन प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री
बबनराव लोणीकर यांनी दिले आहेत. या संदर्भात काल मुंबईत आयोजित बैठकीत ते बोलत होते.
जालना जिल्ह्यातल्या पाणी पुरवठा योजनांसाठी विद्युत पंप, सौर ऊर्जेवर चालवण्यासंदर्भात
या बैठकीत चर्चा करण्यात आली.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटी मालिकेतला दुसरा
सामना ऑस्ट्रेलियानं १४६ धावांनी जिंकला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियानं दिलेलं २८७ धावांचं
लक्ष्य पार करताना भारताचा संघ काल १४० धावांवरच सर्वबाद झाला. चार सामन्यांच्या मालिकेत
दोन्ही संघ एक - एकनं बरोबरीत आहेत. दरम्यान, मालिकेतल्या शेवटच्या दोन सामन्यांसाठी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या
आणि मयंक अग्रवाल यांना संघात स्थान मिळालं आहे. मालिकेतला तिसरा सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्न इथं सुरू होणार
आहे.
****
भारतीय स्टेट बँकेच्या परभणी जिल्ह्याच्या पाथरी
तालुक्यातल्या मरडसगाव इथल्या शाखेचं कामकाज शेतकऱ्यांनी काल बंद पाडलं. या शाखेसमोर
पीक कर्जाच्या मागणीसाठी आंदोलन करताना एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता, त्याच्या
कुटुंबियांना दहा लाख रूपयांची मदत बँकेकडून काल मिळणार होती. मात्र मुदत उलटून गेल्यावरही
मयत शेतकऱ्याच्या कुटूंबाला ही रक्कम न दिल्यानं शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं.
****
महावितरण कंपनीचा अतिरीक्त कार्यकारी अभियंता रामेश्वर
सोनत याला काल औरंगाबाद इथं लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं वीस हजार रूपयांची लाच मागितल्या
प्रकरणी
अटक केली. वीजचोरी
बाबतच्या दंडाची आकारणी कमी करण्यासाठी सोनत यांनं ही लाच मागितली होती.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा
मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेकरता १७ क्रमांकाचा अर्ज
भरण्यासाठीची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. खाजगी विद्यार्थी अतिविलंब
शुल्कासह ऑफलाईन पध्दतीनं हा अर्ज भरून परीक्षा देऊ शकतील, असं मंडळानं कळवलं आहे.
****
प्रगल्भ समाज निर्मितीसाठी वाचन महत्त्वपूर्ण असून ग्रंथोत्सव ही वाचन संस्कृतीचा
प्रचार-प्रसार करणारी उपयुक्त चळवळ आहे असं औरंगाबादचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम
भापकर यांनी म्हटलं श्र्आहे. ते काल औरंगाबाद इथं ग्रंथोत्सव २०१८ च्या समारोपप्रसंगी
बोलत होते.
*****
***
No comments:
Post a Comment