आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२२ नोव्हेंबर डिसेंबर २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
नवी दिल्लीत आज वस्तू आणि सेवाकर
परिषदेची बैठक होणार आहे. या बैठकीत अनेक वस्तूंवरचे जीएसटी दर कमी होण्याची अपेक्षा
व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच ९९ टक्के वस्तूंवरील जीएसटी
कर १८ टक्के किंवा त्याहून कमी करण्यात येईल, अशी
घोषणा केली होती. निर्यातदारांसाठी नियम सोपे करण्याबाबतही चर्चा होण्याची शक्यता असून, हायब्रिड
कारवर सध्या लागू असलेला, २८ टक्के दर कमी करण्यावरही विचार होण्याची शक्यता आहे.
जीएसटी परिषदेची गेल्या वर्षी जुलै महिन्यात स्थापना झाली होती.
****
दत्त जयंती आज सर्वत्र साजरी होत आहे. नांदेड जिल्ह्यातल्या
माहूर गडावर दत्तशिखर इथं आज दत्त जन्म सोहळ्यासाठी भक्तांनी गर्दी केली आहे. माहूर
इथं जाण्यासाठी एस टी महामंडळाच्या ७५ ज्यादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. विदर्भ आणि
मराठवाडा विभागातून मोठ्या संख्येनं भक्त दत्तशिखर इथं आले असून, चोख पोलिस बंदोबस्त
ठेवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
गोवर- रुबेला लसीकरण मोहिमेस सहकार्य न करणाऱ्यांविरूद्ध
कारवाई करण्याचे निर्देश, नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत. ज्या
शाळा या लसीकरण मोहिमेत सहभाग घेणार नाहीत, अशा शाळांच्या मान्यता रद्द करण्याबाबतचा
प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. गोवर-रुबेला जिल्हा कृती
दलाच्या बैठकीत ते काल बोलत होते. गोवर - रुबेला लसीकरण मोहीमेबाबत पालकांनी गैरसमज
करु नये, असं आवाहनही डोंगरे यांनी केलं.
****
लातूर तालुक्यातल्या एकुरगा शिवारात काल दुपारी शॉर्ट
सर्किटमुळे आग लागल्यानं जवळपास २५ एकर ऊस जळाला. या घटनेत आठ शेतकऱ्यांचा ७० लाख
रुपयांच्या ऊसाचं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर
धाडी टाकून कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिले आहेत. जिल्हास्तरीय
आढावा बैठकीत ते काल बोलत होते.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० डिसेंबरला आकाशवाणीवरच्या
मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ५१वा भाग
आहे.
*****
***
No comments:
Post a Comment