Monday, 31 December 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.12.2018 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31  December 2018

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१  डिसेंबर २०१ सकाळी ७.१० मि.

****



Ø दारिद्र्य निर्मूलनाच्या क्षेत्रात भारताची विक्रमी वेगान प्रगती - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Ø महाआघाडीत पंतप्रधानपदावरून कोणताही वाद नाही, लोकसभा निवडणुकीनंतर सर्व पक्ष एकत्र येऊन निर्णय घेतील- शरद पवार

Ø राज्यातल्या विविध रस्त्यांची प्रस्तावित विकास कामं प्राधान्यानं, पूर्ण करण्याच्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री  नितीन गडकरी यांच्या सूचना

आणि

Ø मेलबोर्न क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाविरूद्ध एकशे सदोतीस धावांनी विजय

****



 भारतानं दारिद्र्य निर्मूलनाच्या क्षेत्रात विक्रमी वेगान प्रगती केली असून, जगातल्या नामवंत संस्थांनी भारताच्या या वाढीची दखल घेतली आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या 'मन की बात' या कार्यक्रमाच्या एक्कावन्नाव्या भागात बोलत होते. सामुहिक प्रयत्नांच्या जोरावर आपल्या देशानं व्यापार सुलभतेच्या क्रमवारीत अभूतपूर्व सुधारणा अनुभवली आहे सौर ऊर्जा आणि हवामान बदल या क्षेत्रांमध्ये भारताच्या प्रयत्नांची नोंद जगानं घेतली आहे.

 मोदी म्हणाले की देशाची संरक्षण यंत्रणा अधिक मजबूत झाली असून, याच वर्षी आपल्या देशानं आण्विक त्रिकोण यशस्वीरीत्या पूर्ण केला, म्हणजेच आता भारत जमीन, पाणी आणि आकाश या तीनही क्षेत्रात अण्वस्त्रसज्ज झाला आहे.



 येत्या १५ जानेवारीपासून प्रयागराज इथं  जगप्रसिद्ध कुंभमेळा  आयोजित होत आहे. कुंभमेळा हे आत्मशोधाचं प्रभावी साधन आहे. गेल्यावर्षी युनेस्कोने कुंभमेळ्याला मानवतेच्या अद्भुत सांस्कृतिक परंपरांच्या यादीत स्थान दिलं. यावरून आपल्याला त्याच्या जागतिक महत्तेची कल्पना येऊ शकते. यंदाच्या कुंभमेळ्याला जगातल्या दीडशेहून अधिक देशांमधले भाविक येण्याची शक्यता आहे. कुंभाच्या दिव्यतेतून भारताची भव्यता संपूर्ण जगात आपल्या विविधरंगी खुणा उमटवेल, असं मोदी म्हणाले.



 लोहरी, पोंगल, मकर संक्रांति, उत्तरायण, मादी, मग आणि  बिहू या सणांसाठी मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या गुरुगोविंद सिंग यांच्या जयंतीच्याही शुभेच्छा मोदी यांनी यावेळी दिल्या. नवी प्रेरणा, नवा उत्साह, नवा संकल्प, नवी सिद्धी, आणि नव्या उंचीसह पुढ पावल टाकत स्वतः बदल घडवू आणि देशातही बदल घडवू, असं ते म्हणाले.

****



 एका वेळी तीन तलाक देण्याच्या पद्धतीला गुन्हा ठरवणारं तिहेरी तलाक विधेयक आज राज्यसभेत सादर होण्याची शक्यता आहे. हे विधेयक आहे त्या स्वरूपात मंजूर होऊ देणार नसल्याचं काँग्रेसनं जाहीर केलं आहे. गेल्या गुरुवारी लोकसभेत हे विधेयक मंजूर झालं आहे.

****



 महाआघाडीतल्या नेत्यांमध्ये पंतप्रधानपदावरून कोणताही वाद नसून, निवडणूक झाल्यावर सर्व पक्ष एकत्र येऊन याबाबत निर्णय घेतील, असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. ते काल अहमदनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. कॉंग्रेसनं मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीबाबत पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांना शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती नसल्याचं दिसून येतं, असा आरोप शरद पवार यांनी केला. सरकार स्वायत्त संस्थांना लक्ष्य करून विरोधकांना नाउमेद करत असल्यानं देशात आणीबाणीसदृष्य परिस्थिती असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. दरम्यान, अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना मतदान करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांवर आणि स्थानिक नेत्यांवर पक्षाकडून गंभीर कारवाई करण्यात येईल, असं पवार यांनी सांगितलं.

****



 महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढणार आहे, मात्र राज्यात किती जागा लढवायच्या याचा निर्णय निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर घेणार असल्याची माहिती या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पडवे इथं ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते. दिलेली वचनं पूर्ण केली नाहीत तर, भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत धक्का बसेल, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

****



 राज्यातल्या विविध रस्त्यांची प्रस्तावित विकास कामं प्राधान्यानं आणि वेगानं पूर्ण करण्याच्या सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, मंत्री  नितीन गडकरी यांनी संबंधीतांना दिल्या आहेत. औरंगाबाद इथं काल गडकरी यांच्या उपस्थितीत विविध रस्त्यांच्या  कामांची  आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. औरंगाबाद शहरातल्या बीड बायपास मार्गाच्या विस्ताराबाबत बोलतांना गडकरी यांनी हा रस्ता सहा पदरी करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल- डी.पी.आर. तयार करण्याचं सूचित केलं. या बैठकीत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूरसह नजिकच्या भागातील जमिनींबाबतच्या अडचणी, धुळे-सोलापूर महामार्ग याबाबत चर्चा झाली.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन . आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी प्रचार आणि प्रसार करणार असून, या कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर समिती स्थापन करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली आहे. अंधश्रद्धांच्या माध्यमातून समाजाची होणारी फसवणूक टाळण्यासाठी हा कायदा उपयुक्त ठरेल, असं बडोले यांनी म्हटलं आहे.

****



 राज्य परिवहन महामंडळ एस.टी.च्या कर्मचाऱ्यांनाही सहा महिन्यांची बालसंगोपन रजा मिळणार आहे. परिवहन मंत्री आणि एस.टी.चे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी काल ही घोषणा केली. महिला कर्मचाऱ्यांसह पत्नी हयात नसलेले पुरुष कर्मचारी, तसंच ज्याची पत्नी असाध्य आजारानं पिडित आहे, अशा पुरुष कर्मचाऱ्यांना ही रजा मिळू शकेल. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना या रजेसाठी लागू असलेल्या अटीशर्तीही एस.टी.च्या कर्मचाऱ्यांनाही लागू असणार आहेत.

****



 भिमा-कोरेगाव इथं उद्या एक जानेवारीला शौर्य दिनानिमित विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्यांच्या वाहनांना  पथकर माफ करण्याचं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सूचनेनुसार पक्षाच्या शिष्टमंडळानं  सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना याबाबत निवेदन दिलं होतं.

****



 परभणी जिल्ह्यात काल रात्री एका जीपनं दुचाकीला दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात तीन जण मरण पावले तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. सेलू-परभणी मार्गावर हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. अपघातग्रस्त सर्व ढेंगळी पिंपळगावचे रहिवासी आहेत. गंभीर जखमीवर नांदेड इथं उपचार सुरू आहेत.

****



 येत्या चोवीस तासात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.  

****



 भारतानं मेलबोर्न इथं ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात एकशे सदोतीस धावांनी पराभूत करून चार सामन्यांच्या या मालिकेत दोन-  एक अशी आघाडी घेतली. सामन्याच्या पाचव्या दिवशी काल ऑस्ट्रेलियानं परवाच्या आठ बाद दोनशे अट्ठावन्न या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली आणि अवघ्या तीन धावांची भर घालून त्यांचे शिल्लक दोन फलंदाज बाद झाले. जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी तीन तर मोहम्मद शमी आणि इशांत शर्मानं प्रत्येकी दोन गडी बाद केले. बुमराह सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. मालिकेतला अखेरचा सामना गुरुवार तीन जानेवारीपासून सिडनी इथं खेळला जाईल.

****



लाच मागितल्या प्रकरणी अटक करण्यात आलेले लातूर महापालिकेचे नगरसेवक सचिन मस्के आणि पूनित पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याचं लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोईज शेख यांनी काल सांगितलं. त्यांच्याकडून खुलासा प्राप्त झाल्यानंतर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असं शेख म्हणाले.

****



 परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यात काल सलग तिसऱ्या दिवशी शेतातला ऊस जळण्याची घटना घडली आहे. सिमुरगव्हाण शिवारात काल दोन शेतकऱ्यांच्या चार ते पाच एकर शेतातला ऊस जळून गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आगीचं कारण स्पष्ट झालेलं नाही.

****



प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांचं काल सकाळी कोलकत्यात निधन झालं. ते पंचाण्णव वर्षांचे होते. सामाजिक तसंच राजकीय मुद्द्यांवर केंद्रित चित्रपट बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सेन यांनी, एक दिन अचानक, मृगया आणि भुवन शोम यासह अनेक गाजलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं.

*****

***

No comments: