Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29
December 2018
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ डिसेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशमधल्या गाझीपूरमधे वैद्यकीय महाविद्यालयाची कोनशीलेचं
उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी महाराजा सुहेलदेव यांच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचं प्रकाशन
केलं. त्यानंतर आयोजित सभेला संबोधित करताना सरकार पूर्वांचल भागाला वैद्यकीय क्षेत्र
म्हणून विकसीत करण्यासाठी अनेक महत्वाची पावलं उचलत असल्याचं ते म्हणाले. त्यानंतर
त्यांनी वाराणसीमधे दक्षिण आशियामधले स्थापन करण्यात आलेले सहावं आंतरराष्ट्रीय तांदूळ
संशोधन केंद्र देशाला समर्पित केलं.
****
जम्मू
आणि काश्मीरमधे पुलवामा जिल्ह्यातल्या हांजा पायीन परिसरात सैन्य आणि दहशतवाद्यांमधे
झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले. हे चारही दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी
संघटनेचे सदस्य असल्याचं सैन्यानं म्हटलं आहे.
****
भीमा
कोरेगाव इथं गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर येत्या एक जानेवारी
रोजी साजऱ्या होणाऱ्या शौर्य दिनाच्या बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक
विश्वास नांगरे पाटील आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज पुणे इथं पत्रकार परिषद
आयोजित केली होती. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला जाईल, तसंच ५० हेल्मेट मध्ये कॅमेरे
आणि ५० छुपे कॅमेरे बसवले जातील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
राज्यात
नव्यानं दुष्काळ जाहीर झालेल्या ७६ तालुक्यातल्या महसुली मंडळामधील विद्यार्थ्यांनाही
उर्वरित शैक्षणिक वर्षासाठी राज्य परिवहन महामंडळाचा सवलत पास मोफत देण्यात येणार असल्याची
घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज मुंबईत केली.
पूर्वी दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या तालुक्यांना आधीच ही योजना लागू करण्यात आली होती.
आता नव्यानं दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या महसुली मंडळांतल्या विद्यार्थ्यांनाही येत्या
एक जानेवारीपासून मोफत पास सवलत योजनेचा लाभ मिळेल असं त्यांनी सांगितलं.
****
सोलापूर,
राष्ट्रीय महामार्गाच्या देान्ही बाजूला असणाऱ्या तलाव, नाले, पाझर तलाव, जलसंधारण
तलाव तिथली माती, तसंच मुरुम काढून तो राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी वापरला जावा
असा निर्णय काल सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात
आला. यासाठीची रॉयल्टी माफ केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.
****
नवीन
वर्षाचं स्वागत करताना तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जात असून हे थांबवण्यासाठी शिवसंग्राम
पक्ष आणि सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं गेल्या वर्षी पासून व्यसनमुक्ती कार्यक्रम
घेण्यात येत असल्याची माहिती या कार्यक्रमाचे आयोजक आमदार विनायक मेटे यांनी आज बीड
इथं दिली. शहरात आज सकाळी अकरा वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून
ह्या रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, पत्रकार आणि वकील
संघटना यांनी सहभाग घेतला.
****
संविधानात
संतांनी सांगितलेला मार्ग असून, तोच मार्ग फुले आणि आंबेडकर यांनी जनतेला दाखवला, मात्र
हे संविधान बदलण्याचा प्रयत्न राज्यकर्ते करत असल्याचं भारिप बहुजन महासंघाचे राष्टीय
नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते काल शेगाव इथं वंचित माळी समाज राजकीय एल्गार
परिषदेत बोलत होते. फुले, आंबेडकर यांच्या विचारांना जीवंत ठेवण्यासाठी राजकारणात परिवर्तनाची
गरज असल्याचं आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं.
****
हिंगोली
शहरातल्या जलेश्वर तलावातल्या माशांचा अज्ञात कारणानं मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी
निदर्शनाला आली. संपूर्ण तलावात मृत माशांचा थर साचला असून माशांच्या मृत्यूचं नेमकं
कारण अद्याप समजू शकलं नाही. जुलै महिन्यात या तलावात दोन लाखांचं मत्स्यबिज सोडण्यात
आलं होतं. आतापर्यंत मासेमारीला सुरुवात झाली नसून, जानेवारी महिन्यात मासेमारीला सुरुवात
होणार होती. मात्र, अचानक तलावातल्या माशांचा मृत्यू झाल्यानं मोठं नुकसान झालं आहे.
****
नांदेडच्या
महात्मा कबीर समता परिषद संस्थेच्या वतीनं देण्यात येणारा या वर्षीचा 'महाराष्ट्र भूषण'
पुरस्कार नांदेडचे पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांना जाहीर झाला आहे. दहा हजार रुपये,
सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
औरंगाबाद
इथं आज ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ दलित स्टडीज’च्या वतीनं महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या
मागासलेल्या गटांचे प्रश्न : धोरणं आणि सूचनांचं पुनरावलोकन’ या विषयावर एका चर्चासत्राचं
आयोजन करण्यात आलं होतं. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ.सुखदेव थोरात, प्रशासकीय
अधिकारी डॉ.भारत कदम, माहिती संचालक यशवंत भंडारे यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला.
मागासवर्गियांना खासगी क्षेत्रात नोकरी देतांना भेदभाव केला जातो, त्यामुळे खासगी क्षेत्रात
आरक्षण लागू करण्यात यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली.
****
वृक्ष
लागवड उद्दिष्टांपुरती मर्यादित न राहता मराठवाडा हिरवागार करण्यासाठी वन, सामाजिक
वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सातत्यानं पुढाकार घ्यावा अशा सूचना वन विभागाचे सचिव
विकास खारगे यांनी आज औंरगाबाद इथं अधिकाऱ्यांना दिल्या. वन विभागाच्या सभागृहात ३३
कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट आणि पूर्वतयारी नियोजन याबाबत खारगे यांनी विभागस्तरीय
आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
****
No comments:
Post a Comment