Tuesday, 25 December 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 25.12.2018 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25  December 2018

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५   डिसेंबर २०१ सकाळी ७.१० मि.

****



v सामाजिक माध्यमांचा गैरवापर थांबवण्यासाठी माहिती तंत्रज्ञान नियमात सुधारणांचा केंद्र सरकारचा निर्णय

v शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करा - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मागणी

v सातवा वेतन लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी राजपत्रित अधिकारी पाच जानेवारीला संपावर

आणि

v मराठवाडा साहित्य संमेलनापरिसंवाद, कथाकथन आणि कविसंमेलनाला रसिकांचा त्स्फुर्त प्रतिसाद

*****

 सामाजिक संपर्क माध्यमांचा गैरवापर थांबवण्यासाठी माहिती तंत्रज्ञान नियमात सुधारणा करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. या सुधारणां संदर्भातला एक आराखडा माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून, नागरिकांना १५ जानेवारीपर्यंत त्यावर प्रतिक्रिया नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या निर्णयानंतर, आक्षेपार्ह संदेश तसंच चित्रफिती कोणी प्रसृत केल्या, हे शोधून काढणारी उपाययोजना कार्यान्वीत करणं, सामाजिक माध्यमांना बंधनकारक असणार आहे. यासंदर्भात माहिती तंत्रज्ञान विभागाने नुकतीच दिल्लीत सामाजिक संपर्क सुविधा पुरवणाऱ्या माध्यमांची बैठक घेऊन चर्चा केली. दरम्यान, नागरिकांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि खासगीपण जपण्यास कटिबद्ध असल्याचं, सरकारनं म्हटलं आहे.

****

 वस्तू आणि सेवा कराच्या दरात आणखी कपात होण्याचे संकेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहेत. काल नवी दिल्लीत वृत्तसंस्थेशी बोलताना जेटली यांनी, सध्याच्या १२ ते १८ टक्के कररचनेत सुधारणांची शक्यता व्यक्त केली.

****

 माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना आज चौऱ्याण्णवाव्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन करण्यात येत आहे. नवी दिल्ली इथं उभारलेली सदैव अटल ही वाजपेयी यांची समाधी आज राष्ट्राला अर्पण केली जाणार आहे. विविधतेत एकतेचा संदेश देणारी ही समाधी देशातल्या विविध ठिकाणाहून आणलेल्या दगडांचा वापर करून बांधण्यात आली आहे. दरम्यान, वाजपेयी यांच्या सन्मानार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल शंभर रुपयांच्या नाण्याचं अनावरण केलं. वाजपेयी यांच्या जयंतीच्या औचित्यानं, राज्यातल्या, महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय मंडळाशी संलग्न असलेल्या आंतरराष्ट्रीय शाळांचा शुभारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे.

****



 शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करा, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. काल पंढरपूर इथं जाहीर सभेला संबोधित करताना, ठाकरे यांनी, धनगर समाज तसंच कोळी समाजाचे न्याय्यहक्क आणि आरक्षणासाठी आग्रही राहणार असल्याचं सांगितलं. भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला आपला विरोध नसून, भाजपच्या धोरणांना विरोध असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय पथकाच्या दुष्काळ पाहणीसाठीच्या धावत्या दौऱ्यावर त्यांनी टीका केली. राम मंदीर कधी बांधणार असा प्रश्र्नही उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी जानेवारीपासून राज्यात दौरा करणार असल्याचं ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, काल सायंकाळी ठाकरे यांच्या हस्ते चंद्रभागा नदीची आरती करण्यात आली.

****



 सातवा वेतन लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील सुमारे दीड लाख राजपत्रित अधिकारी पाच जानेवारीला संप पुकारणार आहेत. सातव्या वेतन आयोगाची घरभाडे भत्त्यासह अंमलबजावणी करावी, कामाचा आठवडा पाच दिवसांचा करावा, निवृत्तीचं वय साठ वर्षं करावं आणि सगळी रिक्त पदं भरावीत, इत्यादी मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला आहे.

****



 यवतमाळ जिल्ह्यात काल ट्रक आणि जीपची धडक होऊन झालेल्या अपघातात नऊ जण ठार तर अन्य सहा जण जखमी झाले. कळंब तालुक्यात चापर्डा गावाजवळ काल रात्री नऊच्या सुमाराला हा अपघात झाला. जखमींना कळंब ग्रामीण रुग्णालय आणि यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस नाताळ आज देशभरात साजरा होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद,  उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. नाताळचा हा सण सर्वांच्या जीवनात आनंद, शांती आणि संपन्नता घेऊन येवो, असं राज्यपालांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. 

****



 लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं सुरू असलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी परिसंवाद, कथाकथन आणि कविसंमेलनाला रसिकांचा त्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. ‘दुष्काळाची दाहकता आणि प्रसारमाध्यम’ या विषयावरच्या परिसंवादात बसवराज पाटील नागराळकर यांनी माणुसकी, चारित्र्य, प्रामाणिकपणा याचा खऱ्या अर्थाने दुष्काळ असल्याचं सांगितलं. 'आमची बोली -सीमोल्लंघन' या विषयावर आयोजित परिसंवादात बोली भाषा जिवंत राहिली तरच प्रमाणभाषा श्रीमंत होईल, असं मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ दिनकर कुलकर्णी यांनी व्यक्त केलं. निमंत्रित आणि नवोदित कवीसंमेलनात सादर झालेल्या रचनांना काव्यरसिकांची भरभरुन दाद मिळाली.

****



 औरंगाबाद इथं येत्या नऊ ते १३ जानेवारी दरम्यान सहाव आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे. नाथ उद्योग समह, महात्मा गांधी मिशन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच विभागीय केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्यानं हा महोत्सव होत असल्याची माहिती, संयोजक नंदकिशोर कागलीवाल आणि अशोक राणे यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत दिली. शहरातल्या प्रोझोन मॉल मध्ये हा महोत्सव आयोजित होत आहे.

****



 ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँड दौऱ्यात एकदिवसीय तसंच टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही संघांचं नेतृत्व विराट कोहली करणार असून, रोहीत शर्मा उपकर्णधार तर यष्टीरक्षक म्हणून महेंद्रसिंह धोनी याचा समावेश करण्यात आला आहे. न्यूझीलँडमध्ये होणाऱ्या टी ट्वेंटी मालिकेसाठी के एल राहुल, ऋषभ पंत, कृणाल पंड्या यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

****

 नांदेड पोलिसांनी अवैध वाहतुक करणाऱ्या एका कंटेनरमधून एक कोटी वीस लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. देगलूर तालुक्यात मरखेल-तुंबरपल्ली रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.

****



 परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तहसील कार्यालयावर काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. गंगाखेड तालुका दुष्काळी तालुका म्हणून जाहिर करुन मजुरांना रोजगार हमीची कामं उपलब्ध करावी, शेतकऱ्यांना पीक विमा आणि बोंड अळीचं अनुदान वाटप करावं यासह विविध मागण्यांचं निवेदन आंदोलकांनी यावेळी तहसीलदारांना दिलं. 

****



 राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणी भ्रष्टाचार झाल्याचा रोप करत काल काँग्रेस पक्षानं औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली. संयुक्त संसदीय समिती मार्फत या खरेदीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

****



 नांदेड इथं काल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विभागीय जनसंपर्क कार्यालयातर्फे स्वच्छतेविषयक जनजागृती फेरी काढण्यात आली. कार्यालयाचे महाराष्ट्र आणि गोवा संचालक संतोष अजमेरा, यांनी यावेळी केलेल्या भाषणात, राज्यातल्या शहरी भागांमध्ये शंभरहून अधिक कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वच्छतेचा जागर करण्यात येत असल्याची माहिती दिली.

******

***

No comments: