Sunday, 23 December 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 23.12.2018....Headline Bulletin


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२३ डिसेंबर २०१८ सकाळी ११.०० वाजता

****

गुजरातमधल्या डांग जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात दहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर ६५ जण जखमी झाले. महल - बार्दीपडा रस्त्यावर काल रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. सुरत इथल्या ९० विद्यार्थ्यांना घेऊन ही बस सहलीला जात होती. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, अपघातस्थळी बचाव कार्य सुरु असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

नाशिक जिल्ह्यात सिन्नर- शिर्डी रस्त्यावर शिर्डीला पायी जाणाऱ्या मुंबई इथल्या साईराम पालखीतल्या भाविकांना एका चारचाकीनं धडक दिल्यानं तीन साईभक्त ठार तर १९ जण गंभीर जखमी झाले. काल संध्याकाळी ही दुर्घटना घडली. १५ फूट उंच साईबाबांचा देखावा असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला या चारचाकीनं धडक देत साईभक्तांना चिरडलं. काही जखमींना नाशिक इथं तर काहींना शिर्डी इथं उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

नांदेड जिल्ह्याच्या हदगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्या काल झालेल्या निवडणुकीच्या मतदानाची आज मतमोजणी होत आहे. दुपारयर्पंत सर्व निकाल जाहीर होतील. काल १८ जागांसाठी जवळपास ८० टक्के मतदान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 

****

४० व्या मराठवाडा साहित्य संमेलनाला आजपासून लातूर जिल्ह्यात उदगीर इथं प्रारंभ होत आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार असून, परवा २५ तारखेपर्यंत चालणाऱ्या या संमेलनात कथाकथन, कविसंमेलन, विविध विषयांवरचे परिसंवाद होणार आहेत.

दरम्यान, संमेलनाच्या पूर्वसंध्येला काल उदगीर शहरातून ग्रंथ दिंडी काढण्यात आली. लातूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष त्र्यंबकदास झंवर यांनी ग्रंथदिंडीचा शुभारंभ केला. संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ.ऋषीकेश कांबळे, स्वागताध्यक्ष रामचंद्र तिरुके, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्यासह शालेय विद्यार्थी या दिंडीत सहभागी झाले होते.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० डिसेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ५१वा भाग आहे.

****

No comments: