Sunday, 30 December 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.12.2018 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30  December 2018

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० डिसेंबर २०१ सकाळी ७.१० मि.

****



Ø  उत्तर भारतात होणाऱ्या हिम वृष्टीमुळे संपूर्ण देशात थंडीची लाट; मराठवाडाही गारठला

Ø  अल्पसंख्याक समाजाचं राजकीय शोषण संपवण्यासाठी शैक्षणिक सक्षमीकरण हा उत्तम उपाय- मुख्तार अब्बास नक्वी

Ø  एक कोटी रुपयांची लाच घेताना पुणे जिल्ह्यातल्या तहसीलदाराला अटक

 आणि

Ø  ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी सामन्यात पावसाचा अडथळा; दुपारनंतर खेळ सुरू होण्याची शक्यता

****



 उत्तर भारतात होणाऱ्या हिम वृष्टीमुळे संपूर्ण देशात थंडी लाट पसरली आहे. राज्यातल्या अनेक भागात, तापमानामधे कमालीची घट झाली आहे. पुण्यामध्ये गेल्या दहा वर्षातलं सर्वात कमी ५ पूर्णांक ९ अंश सेल्सिअस इतकं तापमान काल नोंदलं गेलं. नाशिक  जिल्ह्यामधे तीन दिवसांपासून थंडीचा जोर पुन्हा वाढला. निफाडमधे पारा एक पूर्णांक ७ अंशापर्यंत खाली आला आहे.



 कसबे-सुकणे इथल्या पिकांवर दव बिंदूही गोठले. द्राक्षबागांवर या थंडीचा परिणाम होणार आहे, कसारा घाटातल्या धुक्याचा वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.



 अमरावती  जिल्ह्यात कालपासून थंडी वाढली आहे, अहमदनगर  जिल्हाही गारठला असून नागपूरात काल दिवसभरात तापमान ५ पूर्णांक ७ अंश इतकं खाली आलं आहे.



 धुळे  जिल्ह्यातही गारठ्याची तीव्रता वाढली आहे.  तापमानात घट होऊन काल धुळ्यात २ पूर्णांक २ सेल्सिअस इतकं तापमान नोंदलं गेलं. ठाणे, गडचिरोली, रायगड, जिल्हे सुद्धा गारठले आहेत.



 मराठवाड्यातही सर्व जिल्हे गारठले असून परभणी जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे ३ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची काल नोंद झाली. कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने ही नोंद केली. औरंगाबाद इथं ५ पूर्णांक ८ अंश तर नांदेड इथं ७ पूर्णांक ५ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद काल झाली.

****



 अल्पसंख्याक समाजाचं राजकीय शोषण संपवण्यासाठी शैक्षणिक सक्षमीकरण हा उत्तम उपाय असल्याचं, केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे. मुंबईत अंजुमन-ए-इस्लामतर्फे उभारण्यात येत असलेल्या मुलींच्या माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या पायाभरणी समारंभात काल ते बोलत होते. गेल्या चार वर्षात अल्पसंख्याक समाजाच्या सुमारे तीन कोटी ११ लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली असून, त्यांपैकी ६० टक्के विद्यार्थिनी आहेत, ही अभिमानाची बाब आहे, असं ते म्हणाले. गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती विनासायास मिळावी म्हणून यंदा नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल मोबाईल अ‍ॅपही सुरु करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. शाळांमधून मुस्लिम मुलींच्या गळतीचं प्रमाण ७० टक्क्यांवरून ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचंही ते म्हणाले.

****



 राज्यात नव्यानं दुष्काळ जाहीर झालेल्या ७६ तालुक्यातल्या महसुली मंडळामधील विद्यार्थ्यांनाही उर्वरित शैक्षणिक वर्षासाठी राज्य परिवहन महामंडळाचा सवलत पास मोफत देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी काल मुंबईत केली. पूर्वी दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या तालुक्यांना आधीच ही योजना लागू करण्यात आली होती. आता नव्यानं दुष्काळग्रस्त जाहीर झालेल्या महसुली मंडळांतल्या विद्यार्थ्यांनाही येत्या एक जानेवारीपासून मोफत पास सवलत योजनेचा लाभ मिळेल असं त्यांनी सांगितलं.

****



 भीमा कोरेगाव इथं येत्या एक जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या शौर्य दिन कार्यक्रमादरम्यान, गतवर्षीच्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला असल्याचं, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितलं. काल या परिसराच्या बंदोबस्ताचा आढावा घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. चोख बंदोबस्तासह पोलिसांच्या हेल्मेट मध्ये कॅमेरे आणि ५० छुपे कॅमेरे बसवले जातील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरुन ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशावासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा एक्कावन्नावा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****



 फेरचौकशी मधे सात बारा उताऱ्यावर वारसांची नोंद करुन देण्यासाठी एक कोटी रुपयांची लाच स्वीकारताना पुणे जिल्ह्यातल्या मुळशी  इथला तहसीलदार सचिन महादेव डोंगरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल सापळा रचून रंगेहाथ अटक केली. लवासा रस्त्यावरच्या उरवडे गावच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. एक कोटी रुपयांची लाच देण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा नसल्यानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं १५ लाख रुपयांच्या खऱ्या आणि उर्वरित रकमेच्या बनावट नोटा डोंगरे याला देण्यासाठी उपलब्ध केल्या होत्या.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 पंतप्रधान उज्वला गॅस योजने अंतर्गत लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येक कुटुंबाला गॅस जोडणी मिळणार असून जिल्हा लवकरच धूरमुक्त होणार असल्याची माहिती हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे सोलापूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कौशल खंडेलवाल यांनी दिली. ते काल लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. या योजने अंतर्गत लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ९९ हजार २१३ लाभार्थ्यांना गॅस जोडण्या देण्यात आल्या आहेत. यात हिंदुस्तान पेट्रोलियमने ३९ हजार ८७५, भारत पेट्रोलियमने ४२ हजार ९४२ तर इंडियन ऑईलने १६ हजार ३४६ जोडण्या दिल्या आहेत.

****



 वृक्ष लागवड उद्दिष्टांपुरती मर्यादित न राहता मराठवाडा हिरवागार करण्यासाठी वन, सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सातत्यानं पुढाकार घ्यावा अशा सूचना वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी काल औंरगाबाद इथं अधिकाऱ्यांना दिल्या. वन विभागाच्या सभागृहात ३३ कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट आणि पूर्वतयारी नियोजन याबाबत खारगे यांनी विभागस्तरीय आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

****



 परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड नगर पालिकेच्या उपाध्यक्षपदी कॉंग्रेसचे नगरसेवक गोपीनाथ लव्हाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पीठासन अधिकारी नगराध्यक्ष विजय तापडिया यांनी काल ही घोषणा केली. गंगाखेड नगरपालिकेत कॉंग्रेसचे नगराध्यक्ष असून कॉंग्रेसचे आठ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहा, भारतीय जनता पक्षाचे चार, रासपाचे तीन, शिवसेनेचे दोन तर घनदाट मित्र मंडळाचा एक नगरसेवक आहे.

****



 भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान मेलबोर्नमध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा खेळ आज पाचव्या दिवशी पाऊस पडत असल्यामुळे अद्याप सुरू होऊ शकला नाही. ऑस्ट्रेलियन वेळेनुसार दुपारनंतर खेळ सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या सामन्यात भारतीय संघ विजयाच्या समीप असून विजयासाठी भारताला ऑस्ट्रेलियाचे केवळ दोन फलंदाज बाद करायचे आहेत, तर ऑस्ट्रेलियाला अजून १४४ धावा करण्याची आवश्यकता आहे. काल ऑस्ट्रेलियाचा संघानं विजयासाठी ३९ धावांचा पाठलाग करताना, आठ बाद २५७  धावा केल्या. तत्पूर्वी भारतानं काल आठ बाद १०६ धावांवर आपला दुसरा डाव घोषित केल्यानंतर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३९९ धावांचं लक्ष्य ठेवलं. भारताकडून जसप्रीत बुमराहनं चमकदार गोलंदाजी करत या सामन्यामध्ये आतापर्यंत ७ खेळाडू बाद केले आहेत.

****



 औरंगाबाद इथं काल ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ दलित स्टडीज’च्या वतीनं ‘महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या मागासलेल्या गटांचे प्रश्न : धोरणं आणि सूचनांचं पुनरावलोकन’ या विषयावर एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं.

*****

***

No comments: