Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 27
December 2018
Time 7.10 AM to
7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ डिसेंबर २०१८ सकाळी ७.१० मि.
****
v घातपाताच्या संशयावरून उत्तरप्रदेश आणि नवी दिल्लीतून दहा दहशतवाद्यांना
अटक
v विमानतळांवरच्या उद्घोषणा स्थानिक भाषेत करण्याचे केंद्र सरकारचे
निर्देश
v नवीन नियमांचा दूरचित्रवाणी कार्यक्रम प्रसारणावर परिणाम नाही
- ट्रायकडून स्पष्ट
आणि
v दुष्काळ निवारण
योजनांची अंमलबजावणी गांभिर्यानं करावी - कृषी राज्यमंत्र्यांचं निर्देश.
****
राष्ट्रीय तपास
संस्था - एनआयएनं इसीस या दहशतवादी संघटनेशी संबंधांतून घातपाताच्या संशयावरून उत्तरप्रदेश
आणि नवी दिल्लीतून दहा जणांना काल ताब्यात घेतलं. उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये १६
ठिकाणी धाड टाकून ही कारवाई करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तरभारतात,
प्रामुख्यानं दिल्लीत स्फोट घडवण्याचा त्यांचा कट होता. `हरकत उल हर्ब ए इस्लाम` संघटनेच्या
नावानं हे संशयीत कारवाया करत होते. त्यांच्या संशयास्पद हालचालींवर गेल्या काही काळापासून
एनआयएचं लक्ष होतं.
****
नाताळच्या सुटीनंतर संसदेच्या कामकाजाला आजपासून
पुन्हा प्रारंभ होत आहे.
मुस्लीम महिला वैवाहिक अधिकार संरक्षण विधेयक २०१८
वर आज लोकसभेत चर्चा होणार आहे. मंत्री रविशंकर प्रसाद हे सुधारित विधेयक सदनात सादर
करतील. या विधेयकावर लोकसभेत होणाऱ्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार असल्याचं या पक्षानं
आधीच जाहीर केलं आहे. भारतीय जनता पक्षानं, आपल्या सदस्यांना या विधेयकावरील चर्चेकरता
लोकसभेत उपस्थित राहण्याबाबत व्हीप जारी केला आहे.
****
विमानतळांवरच्या उद्घोषणा प्राधान्यानं स्थानिक भाषेत
करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं विमानतळ प्राधिकरणाला दिले आहेत. केंद्रीय नागरी उड्डयन
मंत्री सुरेश प्रभू यांच्या निर्देशानुसार या संदर्भातलं पत्र विमानतळ प्राधिकरणाला
देण्यात आलं आहे. सध्याच्या हिंदी आणि इंग्रजी भाषेतल्या उद्घोषणांसोबतच स्थानिक भाषेतून
उद्घोषणा करावी, असं या पत्रात म्हटलं आहे. विमानसेवा पुरवणाऱ्या खासगी कंपन्यांनाही
यासंदर्भात सूचित करण्यात आलं आहे.
****
ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्यांना, स्वत:ची गुंतवणूक
असलेल्या कंपन्यांची उत्पादनं विकण्यास मनाई करण्यात आली आहे. येत्या एक फेब्रुवारीपासून
हा नियम अंमलात येईल. याशिवायही ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्यांसाठी सरकारनं एक नियमावली
जारी केली असून, या नियमावलीचं पूर्ण पालन करत असल्याचं पत्र, संवैधानिक लेखापरीक्षकाच्या
अहवालासह दरवर्षी ३० सप्टेंबरपूर्वी रिजर्व्ह बँकेला सादर करणं, अश्या कंपन्यांना बंधनकारक करण्यात आलं आहे.
****
दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या
शुल्कासंबंधी नवीन नियमांमुळे कार्यक्रमांच्या प्रसारणावर कोणताही परिणाम होणार नाही, असं दूरसंचार नियामक
प्राधिकरण ट्रायनं स्पष्ट केलं आहे. परवा २९ डिसेंबरपासून वाहिन्यांच्या पॅकेजसंदर्भातला
नियम लागू होत असल्यानं, सध्या दिसणाऱ्या वाहिन्यांचं प्रक्षेपण बंद होणार असल्याचं
वृत्त प्रसारित होत आहे, या पार्श्वभूमीवर ट्रायनं, प्रक्षेपण बंद होणार नसल्याचं स्पष्ट
केलं आहे.
दरम्यान, ट्रायच्या
या नियमांना विरोध दर्शवत, केबल ऑपरेटर्सनी आज सायंकाळी सात ते रात्री दहा या वेळेत
प्रसारण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
****
बँक कर्मचारी संघटनांच्या
संपामुळे, देशभरातल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचं कामकाज काल विस्कळित झालं.
विजया बँक आणि देना बँकेच्या बडोदा बँकेत विलीनीकरण प्रस्तावाला या संघटनांचा विरोध
आहे. या संपात बँक कर्मचाऱ्यांच्या विविध नऊ संघटना सहभागी झाल्या. गेल्या आठवडाभरात
बँकांचा हा दुसरा संप होता, २१ डिसेंबर रोजी अधिकाऱ्यांच्या एका संघटनेनं वेतनाच्या
मुद्द्यावरून संप केला होता.
दरम्यान या विलिनीकरणाविरोधात औरंगाबाद इथं बँक अधिकारी
आणि कर्मचाऱ्यांनी काल निदर्शन केली. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनचे पदाधिकारी देवीदास
तुळजापूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातल्या सुमारे साडेचारशे बँक शाखांमधले
कर्मचारी या संपात सहभागी झाले.
****
केंद्र सरकारनं
यावर्षी तुरीची आधारभूत किंमत प्रति क्विंटल पाच हजार ६७५ रुपये निश्चित केली आहे.
राज्यात आधारभूत किंमतीनं तूर खरेदी केंद्र सुरु करण्यासंदर्भातले प्रस्ताव पणन विभागानं
केंद्र सरकारकडे पाठवला असून, ही केंद्रं लवकरच सुरु करण्यात येणार आहे. गेल्या हंगामात
दोन फेब्रुवारी २०१८ पासून खरेदी केंद्र सुरु करण्यात आलं होतं. शेतकऱ्यांनी आधारभूत
किंमतीपेक्षा कमी दरानं व्यापाऱ्यांना तूर विक्री करु नये, सात बारा उतारा व्यापाऱ्यांना
देऊ नये, असं आवाहन पणन मंत्री देशमुख यांनी केलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं
जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
दुष्काळ
निवारण योजनांची अंमलबजावणी गांभिर्यानं करावी, असे निर्देश राज्याचे कृषी
राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले आहेत. परभणी इथं, जिल्हा दुष्काळ नियोजन आढावा
बैठकीत ते काल बोलत होते. राष्ट्रीय पाणी पुरवठा योजना, मुख्यमंत्री
पेयजल योजना तसंच जुन्या योजनांमधून ग्रामीण भागामधली कामं पूर्ण होणं आवश्यक आहे,
ग्रामीण जनतेच्या हाताला काम मिळावं, यासाठी, मग्रारोहयोमधून शेतरस्ता, पाणंद
रस्ता, आदी कामं करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक
आदींना उद्दीष्ट दिलं जावं, असं खोत यांनी सांगितलं.
या बैठकीनंतर खोत यांनी पाथरी तालुक्यातल्या
मरडसगाव इथं, उपोषणादरम्यान मृत्यू झालेले शेतकरी गंगाधर काळे यांच्या
कुटुंबीयांची भेट घेतली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत
सोहळ्यालाही खोत उपस्थित होते.
दरम्यान, टमाट्यांसह भाजीपाल्याला भाव मिळत
नसल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, खोत यांच्या वाहनाखाली
टमाटे फेकून निषेध व्यक्त केला.
****
राफेल विमान खरेदी प्रकरणी, काँग्रेस अध्यक्ष राहुल
गांधी यांनी बिनबुडाचे आरोप करुन जनतेची दिशाभूल केली, त्यासाठी त्यांनी जनतेची माफी
मागावी, असं भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे. ते काल बीड
इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. राफेल विमान खरेदी प्रकरणी कुठलाही घोटाळा झाला नसून
काँग्रेसकडून यासंदर्भात जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात असल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
औरंगाबाद इथल्या
सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळातर्फे पहिल्या डॉ. भीमराव गस्ती प्रबोधन आणि
डॉ. रखमाबाई राऊत पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष दिवाकर कुलकर्णी
यांनी काल पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. पालघरचे मिलिंद थत्ते यांना आदिवासी हक्कांसाठी
दिलेल्या योगदानाबद्दल डॉ.भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार तर चाळीसगावच्या मिनाक्षी
निकम यांना महिला सक्षमीकरण कार्यासाठी डॉ. रखमाबाई राऊत पुरस्कार दिला जाणार आहे.
पुरस्कार वितरण येत्या पाच जानेवारी रोजी होणार आहे.
****
सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्याच्या
वैजापूर तालुक्यातल्या पालखेड इथं बँक शाखा, गॅस एजन्सी, पाणी पुरवठा योजना, रस्ते
यासह १३८ कामांपैकी ८५ कामं पूर्ण झाल्याची माहिती खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली
आहे. पालखेड इथं भारतीय स्टेट बँकेच्या शाखेचं उद्घाटन खासदार खैरे यांच्या हस्ते काल
झालं, त्यावेळी ते बोलत होते. उर्वरीत कामांसाठी लवकरच निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासहन
खैरे यांनी यावेळी दिली.
****
इतर भाषा शिकण्याआधी
मातृभाषेवर प्रभुत्व हवं, असं ज्येष्ठ समीक्षक डॉ.सुधीर रसाळ यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद
इथली स.भु शिक्षण संस्था आणि राजहंस प्रकाशनाच्या वतीनं डॉ.नागेश अंकुश संपादित अक्षरमात्र
तितुकें नीट पुस्तकाचं प्रकाशन रसाळ यांच्या हस्ते काल करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत
होते.
****
भारत ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेट
मालिकेत, मेलबोर्न इथं सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दुसऱ्या दिवशी
उपहारापर्यंत भारतानं, दोन बाद २७७ धावा केल्या आहेत.
चेतेश्वर
पुजाराच्या १०३ तर कर्णधार विराट कोहली ६९ धावा झाल्या आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment