Saturday, 29 December 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.12.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२९  डिसेंबर २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 शालेय विद्यार्थ्यांना सायबरसुरक्षेच्या वेगवेगळ्या पैलूंविषयी माहिती व्हावी, यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं एक मार्गदर्शक पुस्तिका तयार केली आहे. ऑन सायबर सेफ्टी असं या पुस्तिकेचं नाव आहे. विविध प्रकारचे सायबर गुन्हे, अशा गुन्ह्यांपासून कशाप्रकारे बचाव करावा, तसंच सायबर व्यवहारांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या धमक्या याविषयीची माहिती या पुस्तिकेत दिली आहे. विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमांवर अनोळख्या व्यक्तींसोबत मैत्री करू नये, असा सल्ला या पुस्तिकेच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

****

 सूक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग अर्थात  एमएसएसईसाठी  ’59 मिनिटात कर्ज’ या सरकारी योजनेच्या माध्यमातून सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी एक लाख 12 हजाराहून अधिक कर्ज अर्जांना मंजूरी दिली आहे. याची एकूण रक्कम 37 हजार 412 कोटी रुपये एवढी आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सरकार तसंच रिझर्व बँकेनं एमएसएमई  क्षेत्राच्या कर्जसुलभतेसाठी अनेक पावलं उचलल्याचं सांगितलं

****



 उत्तर भारतासह  देशात अनेक ठिक़ाणी थंडीची लाट अजुनही सुरूच आहे,आणखी दोन ते तीन दिवस हा थंडीचा कडाका कायम् रहाणार असल्याचं हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितलं.दरम्यान  राज्यातही गेल्या दोन दिवसांपासून थंडी प्रचंड वाढली असून औरंगाबादसह मराठवाड्यातही अनेक ठिकाणी थंडीचा जोर वाढला आहे.

****

 भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्न  इथं सुरू असलेल्या तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारतानं तिसऱ्या दिवशी आपला दुसरा डाव १०६ धावांवर घोषित केला. विजयासाठी ऑस्ट्रेलियाला आणखी 2३७ धावा करायच्या असून  शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाचे 1६२ धावांवर सहा फलंदाज   बाद झाले होते.

****

 उत्तर -पश्चिम रेल्वेच्या अजमेर विभागात दुहेरीकरणाचं काम पूर्ण झाल्यामुळे नांदेड--श्रीगंगानगर- नांदेड या साप्ताहिक रेल्वे गाडीच्या मार्गात तात्पुरता बदल करण्यात आला आहे. ही गाडी येत्या तीन जानेवारीला बडोदा-रतलाम-चंदेरीया-अजमेर-फलौनी- नागौर या मार्गे श्रीगंगानगरला जाईल, पाच जानेवारीला परतीच्या प्रवासात ही गाडी जोधपूर- लुनी - मारवार- अबुरोड- - अहमदाबाद -बडोदा मार्गे नांदेडला परत येईल.

*****

***

No comments: