Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 December 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ डिसेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
वस्तु
आणि सेवा कर परिषदेनं सहा वस्तुंवरचा जीएसटी २८ टक्क्यांवरुन १८ टक्के केला आहे. यात
दूरचित्रवाणी संच, टायर, पॉवर बँक आणि व्हिडिओ गेम्स या वस्तुंचा समावेश आहे. नवी दिल्ली
इथं आज परिषदेच्या बैठकीनंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली.
१०० रुपयांपर्यंत सिनेमाच्या तिकीटावरचा जीएसटी १८ टक्क्यांवरुन १२ टक्के, तर १०० रुपयांपेक्षा
जास्त किंमतीच्या सिनेमाच्या तिकीटावरचा जीएसटी २८ टक्क्यांवरुन १८ टक्के केल्याचं
त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता २८ वस्तुंवरच २८ टक्के जीएसटी लागणार आहे. यामध्ये
सिमेंट, डिशवॉशर, एयर कंडिशनर, ऑटो पार्टस् यांचा समावेश आहे. यात्रांवर जाण्यासाठीच्या
विमानाच्या तिकीटावर लागणाऱ्या जीएसटीत, तसंच दिव्यांग व्यक्तींसाठी लागणाऱ्या उपकरणांच्या
जीएसटीत पाच टक्के कपात करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. हे नवीन जीएसटी दर
एक जानेवारी २०१९ पासून लागू होतील. आयकर विवरणपत्र भरण्यासाठीची नवीन प्रणाली एक जुलै
२०१९ पासून अंमलात येईल, असं जेटली यांनी सांगितलं.
****
देशात
प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग उल्लेखनीय असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
म्हटलं आहे. गुजरातमधल्या गांधीनगर इथं आज भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या
राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. नारी शक्ती हे सामाजिक एकतेचं
प्रतिक असल्याचं ते म्हणाले. स्वच्छ भारत अभियान, उज्ज्वला योजना, आवास योजना यासारख्या
योजना महिलांनाच केंद्रस्थानी ठेऊन अंमलात आणल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. महिला
मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यावेळी
उपस्थित होते.
****
देशातल्या
शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही वैद्यकीय सेवा अद्ययावत होण्याची आवश्यकता असल्याचं
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. तेलंगणात करीमनगर इथं आज सिकलसेल या आजारासंदर्भात
संशोधनासाठी उभारण्यात आलेल्या केंद्राचं उद्धाटन केल्यानंतर ते बोलत होते. लहान मुलांमधे
हे रक्ताचे आजार बळावू नयेत याकरता राज्य सरकारांनी पावलं उचलावी, असं आवाहन राष्ट्रपतींनी
यावेळी केलं.
****
एक
ट्रिलियन डॅालरची अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे प्रयत्न सुरू
असल्याचं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज लघु-मध्यम क्षेत्रातल्या
नवउद्यमींची संस्था – ‘स्टार्ट अप’ची मुंबई शेअर बाजारामध्ये अधिकृत नोंदणी करण्यात
आली, त्यावेळी ते बोलत होते. येत्या काळात उद्योजकांनी आपलं भांडवल वाढवण्यासोबत रोजगार
निर्मितीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
****
जालना
इथं सुरू असलेल्या राज्य वरीष्ठ अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या
आजच्या चौथ्या दिवशी गादी विभागात पुण्याच्या अभिजित कटकेनं पुण्याच्याच गणेश जगतापचा
सात - शून्य असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
दरम्यान,
या कुस्तीत पंचांनी भेदभाव केल्याचा आरोप पुण्याच्या काका पवार तालीम संघाच्या प्रशिक्षकांनी
केला. सर्व सामने नियमानुसार सुरू असून कुणाला सामन्यांबाबत आक्षेप असेल तर त्यांनी
पंच कमिटीकडे रीतसर दाद मागावी, विनाकारण सामन्यांमध्ये वत्यय आणू नये असं आवाहन संयोजन
समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांनी केलं.
****
सातारा
जिल्ह्याच्या माण तालुक्यातल्या तीर्थक्षेत्र भोजलिंग इथल्या डोंगरावरुन जीप दरीत कोसळून
झालेल्या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले. जीपमधले भाविक
आटपाडी तालुक्यातले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
यवतमाळच्या
राळेगाव जंगलातल्या नरभक्षक टी वन वाघिणीच्या मादा बछड्याला आज जेरबंद करण्यात आलं.
वाघिणीला सी वन आणि सी टु हे दोन बछडे आहेत. १३ ग्रामस्थांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक
टी वन वाघिणीला वनविभागाच्या कारवाईत दोन नोव्हेंबरला ठार मारल्यानंतर प्रधान मुख्य
वनसंरक्षकाच्या आदेशानुसार तिच्या दोन्ही बछड्यांना बेशुद्ध करून पकडण्याची मोहीम वन
विभागानं हाती घेतली आहे.
****
औरंगाबाद
मध्ये बनावट नोटा छापणाऱ्या दोघांना पोलिसांनी आज ताब्यात घेतलं. शहरातल्या बारी कॉलनी
इथं शंभर आणि दोनशे रुपयांच्या बनावट नोटा बनवणाऱ्या कारखान्यावर जिन्सी पोलिस ठाण्याच्या
गुन्हे शोध पथकानं धाड टाकून ४४ हजारांच्या बनावट नोटांसह प्रिंटर आणि इतर साहित्य
ताब्यात घेतलं. शेख हारून शेख बशीर आणि सय्यद शोहरत अजगर अली असं अटक केलेल्या आरोपींची
नावं असल्याचं जिन्सी पोलिसांनी सांगितलं.
****
मराठा
जातीचा इतर मागास प्रवर्ग - ओबीसीमध्ये समावेश करून ओ.बी.सी आरक्षणाची मर्यादा वाढण्यासाठी,
छावा मराठा संघटनेच्या वतीनं येत्या २६ डिसेंबर पासून दिल्ली इथं आमरण उपोषण करण्यात
येणार आहे. छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण यांनी आज औरंगाबाद इथं ही
माहिती दिली.
****
No comments:
Post a Comment