Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 18 December 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ डिसेंबर २०१८ दुपारी १.०० वा.
****
राफेल प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांच्या
गदारोळात संसदेचं कामकाज आजही बाधित झालं. लोकसभेचं कामकाज सुरू होताच, गेल्या आठवडाभरापासून
लावून धरलेल्या, राफेल खरेदी चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती, कावेरी खोऱ्यातल्या शेतकऱ्यांचे
प्रश्न, आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा या मुद्यांवरून घोषणाबाजी करत, काँग्रेस-अण्णाद्रमुक-तेलगुदेशम
पक्षाचे सदस्य हौद्यात उतरले. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी गदारोळात प्रश्नोत्तराचा
तास पुकारला. लातूरचे खासदार डॉ सुनील गायकवाड यांनी लसूण लागवडीचा उत्पादन खर्च कमी
करणं तसंच लसूण साठवणीसंदर्भातला प्रश्न विचारला. यावर केंद्रीय कृषी मंत्री राधामोहनसिंह
उत्तर देत असताना, भाजपचे सदस्यही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माफी मागावी,
अशा आशयाचे फलक झळकावत होते. गदारोळ वाढत गेल्यानं, अध्यक्षांनी सदनाचं कामकाज बारावाजेपर्यंत
स्थगित केलं.
कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर, अध्यक्ष सुमित्रा महाजन
यांनी, घोषणाबाजी करणाऱ्या सदस्यांना कामकाजात शांततेत सहभागी होण्याचं आवाहन केलं.
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राफेल खरेदी चौकशीसाठी संयुक्त संसदीय समितीच्या
मागणीचा पुनरुच्चार केला. सर्वोच्च न्यायालयानं या व्यवहारात काहीही अनियमितता नसल्याचा
निर्वाळा दिल्यामुळे, संयुक्त संसदीय समितीचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं, संसदीय कामकाज
मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितलं, मात्र सरकार प्रत्येक विषयावर चर्चेसाठी तयार
असल्याचं, तोमर यांनी नमूद केलं. त्यानंतरही गदारोळ कायम राहिल्यानं, अध्यक्षांनी कामकाज
दिवसभरासाठी स्थगित केलं.
राज्यसभेत सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी शून्य
काळ पुकारताच, अण्णाद्रमुक तसंच तेलगु देशम पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली,
सभापतींनी या गदारोळातच कामकाज सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर त्यांनी,
सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं.
****
प्रसिद्ध व्यंगचित्रकार दिवंगत आर के लक्ष्मण यांच्या
व्यंगचित्रांवर आधारित टाईमलेस लक्ष्मण या पुस्तकाचं, आज मुंबईत पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या हस्ते प्रकाशन झालं. राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यावेळी उपस्थित होते. व्यंगचित्राच्या माध्यमातून गेल्या काही दशकातल्या सामाजिक
तसंच राजकीय घडामोडींचा आढावा घ्यावा, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. राज्यातल्या एखाद्या
विद्यापीठानं यासाठी पुढाकार घ्यावा, असंही त्यांनी सुचवलं.
****
भारतीय वायू दलानं, लढाऊ विमानासाठी प्रथम जैव इंधनाचा वापर करून, यशस्वी
उड्डाण केलं आहे. हवाई
दल, संरक्षण संशोधन विकास संस्था - डीआरडीओ, वैमानिकी गुणवत्ता प्रमाणन महासंचालनालय
आणि भारतीय पेट्रोलियम संस्था यांचा हा संयुक्त प्रयोग आहे.
या प्रयोगासाठी हवाई दलानं इंजिनाच्या अनेक चाचण्या घेतल्या असून, येत्या
२६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन संचलनात
जैव-इंधनाचा वापर केलेलं हे विमान उडवण्याचा
हवाई दलाचा विचार असल्याचं, याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
भारताच्या
जी सॅट- सात
ए या ३५ व्या
दळणवळण उपग्रहाच्या प्रक्षेपणाची विपरित
गणती आज सुरू होत आहे.
श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अवकाश केंद्रातून उद्या संध्याकाळी चार वाजून दहा मिनिटांनी
जी एस एल व्ही - एफ ११ द्वारे या उपग्रहाचं प्रक्षेपण होईल. हा उपग्रह केयू बँडच्या
ग्राहकांना अधिक चांगली दळणवळण क्षमता उपलब्ध करुन देईल, तो आठ वर्षे काम करेल.
****
बँकांची
कर्ज बुडवून परदेशी पळालेला मद्य व्यापारी विजय मल्ल्या याला फरार आर्थिक गुन्हेगार
घोषित करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयानं केलेल्या याचिकेवर मुंबईतलं विशेष न्यायालय
येत्या २६ तारखेला निर्णय देणार आहेत. मल्ल्याच्या मालमत्ता जप्त करण्याबाबतही त्या
दिवशी निर्णय दिला जाईल.
****
सोलापूर
महानगरपालिकेच्या परिवहन कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप बेकायदा असून, संबंधितांवर कायदेशीर
कारवाई करणार असल्याचं, परिवहन समितीचे व्यवस्थापक अशोक मल्लाव यांनी म्हटलं आहे. परिवहन
विभागाच्या जवळपास ५५ बस काल दिवसभर बंद राहिल्यानं, प्रवाशांचा खोळंबा झाला तसंच परिवहन
विभागाचं सुमारे दोन लाख रुपये नुकसान झालं. गेल्या अकरा महिन्याचे वेतन अदा केलं नसल्यानं
कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे.
****
नांदेड जिल्ह्यात मागील पाच दिवसापासून थंडीची लाट
आली असून आज तापमान पुन्हा घटलं आहे. थंडीच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या
शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि मयंक अग्रवाल
यांना संघात स्थान मिळालं आहे. अग्रवालला पृथ्वी शॉच्या जागी संघात घेतलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment