Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27
December 2018
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ डिसेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
तिहेरी
तलाकला प्रतिबंध करणारं मुस्लिम महिला वैवाहिक अधिकार संरक्षण विधेयक आज लोकसभेत मांडण्यात
आलं. तिहेरी तलाकला बेकायदेशीर ठरवून, अशा प्रकारे तलाक देणाऱ्या पुरुषाला तीन वर्षे
तुरुंगवासाची तरतूद या विधेयकात आहे. हे विधेयक मुस्लिम महिलांना न्याय देणारं असून,
कोणत्याही धर्म, समाज आणि मान्यतेविरुद्ध नसल्याचं कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी
विधेयक मांडताना सांगितलं. यावरच्या संवैधानिक बाबींचा सविस्तर अभ्यास करण्याची गरज
असल्याचं काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. संयुक्त संसदीय समितीसमोर हे विधेयक
सादर करण्याची मागणी त्यांनी केली. तृणमुल कॉंग्रेसचे सुदीप बंडोपाध्याय, अण्णा द्रमुकचे
पी वेणुगोपाल, कम्यूनिस्ट पक्षाचे करुणाकरन, एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांनीही हे विधेयक
संयुक्त संसदीय समितीसमोर सादर करण्याची मागणी केली. भाजपचे मुख्तार अब्बास नक्वी,
बिजू जनता दलाचे रविंद्र कुमार जेना, तेलगु देसम पक्षाचे जयदीप गाला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या
सुप्रिया सुळे यांनी या चर्चेत भाग घेतला. शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी चर्चेत सहभागी
होत समान नागरी संहिता लागू करण्याची मागणी केली. या विधेयकावर शेवटचं वृत्त हाती आलं
तेंव्हा चर्चा सुरु होती.
****
इस्लामिक
स्टेट ऑफ इराक ॲण्ड सिरीया - आयसीसच्या ‘हरकत-उल-हर्ब-ए-इस्लाम’ या कार्यगटाच्या १०
संशयितांना दिल्लीच्या विशेष न्यायालयानं १२ दिवसांची राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयएची
कोठडी सुनावली आहे. एनआयएनं काल उत्तर प्रदेशातल्या अमरोहा आणि हापूर जिल्ह्यातून या
संशयितांना अटक केली होती. या गटानं बॉम्बस्फोट करण्याची पूर्ण तयारी केली होती, असं
एनआयएचे महानिरीक्षक अशोक मित्तल यांनी सांगितलं.
****
राज्य
शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी एक जानेवारी पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यास
राज्य मंत्रिडळानं आज मान्यता दिली. एक जानेवारी २०१६ पासूनची तीन वर्षांची थकबाकी
२०१९-२० पासून पाच वर्षात पाच समान हप्त्यांत रोखीनं देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पातल्या नांदेड शहरानजीकच्या किवळा साठवण तलावाचं
काम जलसंपदा विभागामार्फत करण्यास तसंच मुंबई मेट्रो मार्ग चार अ कासारवडवली ते गायमुख
या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.
****
शिवसंग्रामचा
औरंगाबादमध्ये आयोजित वर्धापनदिन मेळावा येत्या सहा जानेवारीऐवजी २७ जानेवारी रोजी
होणार आहे. पक्षाचे संस्थापक, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी आज
औरंगाबादमध्ये ही माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत झालेल्या
बैठकीत शिवसंग्रामला न्याय देण्याचं आश्र्वासन दिल्यानं आणि त्यासाठी वेळ मागितल्यानं
हा मेळावा पुढे ढकलण्यात आल्याचं ते म्हणाले. मुख्यमंत्री तसंच महसूल आणि सार्वजनिक
बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे या मेळाव्यास उपस्थित
राहणार असल्याची माहितीही मेटे यांनी दिली.
****
भाजपतर्फे
धुळे महापौरपदासाठी चंद्रकांत सोनार आणि उपमहापौरपदासाठी कल्याणी अंपळकर यांनी आज उमेदवारी
अर्ज दाखल केले. येत्या ३१ डिसेंबर रोजी ही निवड होणार आहे. आमच्या वार्ताहरानं दिलेल्या
माहितीनुसार धुळ्याचे खासदार संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या अध्यक्षतेखाली
बैठकीत महापौर, उपमहापौरपदाच्या उमेदवारांचं नाव निश्चित झालं. धुळे महापालिकेत भाजपकडे
७४ पैकी ५० जागा आहेत.
दरम्यान,
अहमदनगर महापालिकेच्या महापौर पदासाठी उद्या निवडणूक होत आहे. महापौर पदासाठी भारतीय
जनता पक्षाकडून बाबासाहेब वाकळे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून संपत बारस्कर, तर शिवसेनेकडून
बाळासाहेब बोराटे यांनी अर्ज दाखल केले आहेत.
****
बुलडाणा
जिल्ह्यात गेल्या चार वर्षात पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत एक लाख ३२ हजार गॅस
जोडण्या देण्यात आल्या आहेत. हिंदुस्थान पेट्रोलियमचे अरुण बन्सल यांनी आज बुलडाणा
इथं ही माहिती दिली. अनुसूचित जाती आणि जमातीतल्या ५० हजार ८३१ कुटुंबांना गॅस जोडण्या
दिल्याचं त्यांनी सांगितलं.
****
जालना
जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातल्या तीर्थपुरी इथं आज मार्निंग वॉकसाठी गेलेल्या तरुणाचा
अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं मृत्यू झाला. नारायण खंडागळे असं मृत तरुणाचं नाव असून,
याप्रकरणी पोलिसांनी एका टँकर चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
****
औरंगाबाद
इथं ६४वी राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा २९ डिसेंबर ते दोन जानेवारी दरम्यान होणार
आहे. औरंगाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयानं आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
विभागीय क्रीडा संकुलात होणाऱ्या या स्पर्धेत १४ वर्षे आणि १९ वर्षे वयोगटातले खेळाडू
सहभागी होतील. देशभरातले सुमारे एक हजार खेळाडू, मार्गदर्शक, अधिकारी यात सहभागी होणार
असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
****
No comments:
Post a Comment