Sunday, 23 December 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 23.12.2018 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23  December 2018

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ डिसेंबर २०१८ सायंकाळी  ६.००

****



 रस्ते आणि सिंचनाच्या प्रश्नावर गेली चार वर्षे राज्य आणि केंद्र सरकार काम करत असून हाती घेतलेले सर्व प्रकल्प पूर्ण करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सातारा इथं आज खंबाटकी घाटातल्या एस वळण परिसरात नियोजित बोगदा तसंच सुमारे एक हजार कोटी खर्चाच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन मुख्यमंत्री आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. मुंबई ते बंगळुरु हा इकोनॉमिक कॉरिडॉर असून, त्याच्या विकासाला चालना देणारा प्रकल्प हाती घेतला असल्याचं ते म्हणाले.

****



 मुंबईचे माजी नगरपाल आणि ज्येष्ठ समाजसेवक नाना चुडासमा यांचं आज निधन झालं, ते ८४ वर्षांचे होते. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक अशा क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं होतं. भाजपच्या प्रवक्त्या शायना एन सी यांचे ते वडील होत. चुडासमा यांनी केलेल्या समाजकार्यासाठी २००५ साली भारत सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात, चुडासमा यांच्या निधनानं मुंबईच्या सामाजिक - सांस्कृतिक विकासाचा ध्यास असणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त केली.

****



 मुंबईत गोरेगाव इथल्या मोतीलाल नगर मध्ये आज सकाळी दोन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाल्याचं वृत्त आहे.

****



 देशात सध्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आल्यासारखी स्थिती निर्माण झाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. गोंदिया इथं आज आठव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनात ते बोलत होते. गोंदिया इथं उभारण्यात आलेल्या रिलायन्स कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटनही पवार यांच्या हस्ते झालं. 

****



 समाजात प्रबोधन आणि परिवर्तन करायचं असेल, तर साहित्याशिवाय पर्याय नाही, असं ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ४० व्या मराठवाडा साहित्य संमेलनाला आजपासून लातूर जिल्ह्यात उदगीर इथं प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते. संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यक ऋषीकेश कांबळे, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते, परवा २५ तारखेपर्यंत चालणाऱ्या या संमेलनात कथाकथन, कविसंमेलन, विविध विषयांवरचे परिसंवाद होणार आहेत.

****



 नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत १८ पैकी नऊ जागांचे निकाल हाती आले. यात भारतीय जनता पक्ष - शिवसेना युतीच्या पॅनलनं सहा, तर काँग्रेसनं दोन जिंकल्या आहेत.

****



 जालना इथं सुरू असलेल्या ६२व्या महाराष्ट्र अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा आज शेवटचा दिवस. आज ९२ किलो वजनी माती गटात हिंगोलीच्या ज्ञानेश्वर गादेकरनं तर ६५ किलो वजनी गादी गटात पुण्याच्या सागर लोखंडेनं कांस्य पदकांची कमाई केली. आज सायंकाळी ६५ किलो वजनी गादी विभागातून कोल्हापूरचा सोणबा गोंगाने विरूद्ध कोल्हापूरच्या मानिक कारंडे, माती विभागात पुण्याच्या सूरज कोकाटे विरुध्द सोलापूरच्या सूर्यकांत रुपनकर यांच्यात सुवर्णपदकासाठी अंतिम लढत होणार आहे. ९२ किलो गादी गटात कोल्हापूरचा सिकंदर शेख विरुध्द पुण्याच्या अक्षय भोसले आणि माती विभागात मुंबईचा सुहास गोगडे व नांदेडच्या अनिल जाधव यांच्यात अंतिम लढत होईल. या लढतीनंतर पुण्याचा अभिजित कटके आणि बुलडाण्याचा बाला रफिक शेख यांच्यात महाराष्ट्र केसरीच्या किताबाची अंतिम लढत होणार आहे. 

****



 उस्मानाबाद इथं आज हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. पाच, दहा आणि २१ किलोमीटर अशा तीन विभागातून ही स्पर्धा घेण्यात आली. यात जिल्हा पोलिस अधीक्षक आर. राजा, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, माजी आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह शेकडो धावपटू सहभागी झाले होते.

****



 बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथं आज अटल महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन पालकमंत्री मदन येरावार आणि गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या हस्ते झालं. यावेळी त्यांनी शिबिरातल्या विविध कक्षांना भेट देऊन औषधी साठा, पुरवठा, रुग्णांची तपासणी आदींची माहिती घेतली.

****



 महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालयातर्फे औरंगाबाद शहरातल्या विवेकानंद महाविद्यालयात मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचं आयोजन करण्यात आलं आहे. एक जानेवारी ते १० जानेवारी या काळात दुपारी चार ते संध्याकाळी सहा या वेळेत होणाऱ्या या वर्गात सहभागी होण्यासाठी महाविद्यालयाच्या इतिहास विभागाशी संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

****


  विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट आली असून, राज्यात उर्वरित भागात तापमान सरासरी आहे. आज सर्वात कमी सात अंश सेल्सिअस तापमान नागपूर इथं नोंदवलं गेलं. नाशिक ११ पूर्णांक दोन, औरंगाबाद आणि परभणी सरासरी १२, तर उस्मानाबाद इथं १४ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

*****

***

No comments: