Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28
December 2018
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ डिसेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
योग
हे जगासाठी भारताच्या सौम्यशक्तीचं उत्तम उदाहरण आहे, असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद
यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत योग इन्स्टीट्यूटच्या कार्यक्रमात बोलत होते. एकत्व
हे योगाचं दुसरं नाव आहे, योगानं जगभरातल्या संस्कृतींना अंतर्गत धाग्यांनी जोडलं आहे.
योगाचा प्रसार करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून, देशातल्या योग संस्थांच्या
बळकटीकरणाची गरज राष्ट्रपतींनी व्यक्त केली. महाराष्ट्र आणि इतर राज्यांनी शालेय अभ्यासक्रमात
योगाचा समावेश केल्याबद्दल राष्ट्रपतींनी त्यांची प्रशंसा केली. या कार्यक्रमाला राज्यपाल
चे विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद येसू
नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रपतींनी
आज राज्यपाल तसंच मुख्यमंत्र्यासमवेत राजभवनाची पाहणी केली. छत्रपती शिवाजी महाराज
यांच्या नियोजित स्मारकाची माहिती राष्ट्रपतींनी घेतली. राजभवनात सापडलेल्या ब्रिटिशकालीन
बंकरच्या संवर्धनाविषयी राष्ट्रपतींनी मोलाच्या सूचना केल्या.
****
जम्मू
काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाला केंद्र सरकार पूर्ण सहकार्य
करेल, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिली आहे. जम्मू काश्मीरमध्ये
राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भातल्या निर्णयाला अनुमोदनासाठी लोकसभेत वैधानिक
प्रस्तावावरच्या चर्चेत ते बोलत होते. दरम्यान काँग्रेस तसंच नॅशनल कौन्फ्रेन्सनं राष्ट्रपती
राजवट लागू करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला. अण्णाद्रमुक, बिजू जनता दल तसंच शिवसेनेचे
सदस्यही चर्चेत सहभागी झाले.
****
वाशिम,
अकोला, धुळे तसंच नंदूरबार इथल्या विद्यमान जिल्हा परिषद तसंच पंचायत समिती सदस्यांना
मुदतवाढ देण्यात आली आहे. या जिल्हा परिषदांचा कार्यकाळ परवा ३० डिसेंबरला संपत आहे,
तर जिल्ह्यातल्या पंचायत समित्यांची मुदत आज संपत आहे. या सर्व ठिकाणी निवडणुका होऊ
न शकल्यानं, प्रशासनानं एक पत्र जारी करून, या सर्व जिल्हा परिषदा तसंच पंचायत समित्यांतल्या
सदस्यांच्या कार्यकाळाला मुदतवाढ जाहीर केली आहे.
****
नागरी
सहकारी बँकांना एक रकमी कर्ज परतफेड योजनेस ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली
आहे. या योजनेचा अधिकाधिक कर्जदारांनी लाभ घ्यावा, तसंच थकबाकी कमी होण्याच्या दृष्टीनं
बँकांनी प्रयत्न करावेत, असं आवाहन सहकारी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधकांनी यांनी केलं
आहे. हा शासन निर्णय राज्य शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
****
परभणी
जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यात आज विजेच्या तारांचं घर्षण होऊन सुमारे एक एकरावरचा ऊस
जळून नुकसान झालं, देवेगांव शिवारात ही दुर्घटना घडली. पाथरी नगर परिषदेच्या अग्नीशामक
बंबाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणली. या आगीत उभ्या ऊसासोबत एक बैलगाडीही
खाक झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यात हरडफ सजाच्या तलाठ्याला साडे चार हजार रुपये लाच घेताना,
लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं रंगेहाथ अटक केली. बालाजी पन्नमवार असं या तलाठ्याचं नाव
असून, तक्रारदाराच्या वडिलोपार्जित जमिनीचा तक्रारदारच्या वडिलांच्या नावे फेरफार करण्यासाठी
त्यानं ही लाच मागितली होती.
****
रत्नागिरी
जिल्ह्यात आज दोन वेगवेगळ्या अपघातांत पाच जण ठार, तर २७ जण जखमी झाले. दापोली ते खेड
रस्त्यावर सकाळी साडेसातच्या सुमारास एका जीपची समोरून येणाऱ्या डंपरशी धडक झाली, यात
पाच जणांचा मृत्यू झाला, मृतांमध्ये दोन महिला आणि चालकासह तीन पुरुषांचा समावेश आहे.
दरम्यान,
संगमेश्वर तालुक्यात झालेल्या दुसऱ्या अपघातात एसटी बस पलटून वीस विद्यार्थ्यांसह २५
प्रवासी जखमी झाले. निवळी-नायरी रस्त्यावर नायरी घाटात ही बस तीन वेळा पलटल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
उत्तर-पश्चिम
रेल्वेच्या अजमेर विभागात दुहेरीकरणाचं काम पूर्ण झाल्यामुळे नांदेड-श्रीगंगानगर- नांदेड
या साप्ताहिक रेल्वे गाडीच्या मार्गात तात्पुरता बदल करण्यात आला आहे. ही गाडी येत्या
तीन जानेवारीला बडोदा-रतलाम-चंदेरीया-अजमेर-फलौनी- नागौर या मार्गे श्रीगंगानगरला जाईल,
पाच जानेवारीला परतीच्या प्रवासात ही गाडी जोधपूर- लुनी - मारवार- अबुरोड- अहमदाबाद
-बडोदा मार्गे नांदेडला परत येईल.
****
औरंगाबाद
इथं ६४ व्या राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेला उद्यापासून प्रारंभ होत आहे. औरंगाबाद
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयानं काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विभागीय क्रीडा
संकुलात होणाऱ्या या स्पर्धेत १४ वर्षे आणि १९ वर्षे वयोगटातले खेळाडू सहभागी होतील.
दोन जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत देशभरातले सुमारे एक हजार खेळाडू, सहभागी
होणार आहेत.
****
No comments:
Post a Comment