Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 23
December 2018
Time 1.00pm to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ डिसेंबर २०१८ दुपारी १.००
वा.
****
भारतानं
आज अग्नि - चार या अण्वस्त्रवाहू बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. जमिनीवरुन
जमिनीवर मारा करणाऱ्या या तब्बल चार हजार किलोमीटर लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रानं,
आज सकाळी साडे आठ वाजता ओडिशातल्या अब्दुल कलाम बेटावरून अचूक लक्ष्यभेद केल्याचं संरक्षण
सूत्रांनी सांगितलं.
****
उत्तर
भारतात थंडीची लाट अधिक तीव्र झाली असून, अनेक भागात धुक्याची चादर पसरली आहे. राजधानी
दिल्लीत आज सकाळी कमी दृश्यमानतेमुळे नागरिकांना वाहनं चालवण्यात अडचणी आल्या. हरियाणा
आणि पंजाबमध्येही थंडीचा कडाका वाढला असून, कर्नाल मध्ये पारा शून्य अंशाच्या खाली
गेला होता, तसंच हिसार आणि नारनौल इथं दोन अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवण्यात आलं.
राज्यातही तापमानात घट होत असून, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान
तापमानात उल्लेखनीय घट झाली आहे. येत्या दोन दिवसांत राज्यातलं हवामान प्रामुख्याने
कोरडं राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
****
पर्यावरणपूरक
उर्जानिर्मिती वाढवणं आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या बाबतीत भारत देश प्रेरणास्त्रोत
ठरला आहे, असं केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. हैदराबाद
इथं काल आंतरराष्ट्रीय सागरी विज्ञान अभियान प्रशिक्षण केंद्राच्या अटल संकुलाचं उद्घाटन
केल्यानंतर ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय सौरऊर्जा क्षेत्रातली भारताची भूमिका लक्षात
घेत, देशानं आंतरराष्ट्रीय समुदायाला दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात लक्षणीय प्रगती
केली आहे. उत्सर्जन कमी करण्याचे जागतिक लक्ष्य भारत पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी
व्यक्त केला.
****
१९८४
च्या शीख दंगलीप्रकरणी शिक्षा सुनावलेले काँग्रेस नेते सज्जन कुमार यांनी त्यांना जन्मठेपेची
शिक्षा सुनावल्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान
दिलं आहे. उच्च न्यायालयानं सज्जन कुमार यांना ३१ डिसेंबरपर्यंत शरण येण्यास सांगितलं
होतं, कुमार यांची शरणागतीची मुदत एक महिना वाढवण्याची मागणी न्यायालयानं फेटाळून लावली.
****
औरंगाबाद
महापालिकेच्या स्मार्ट सिटीतल्या पाच स्मार्ट बसेसचं लोकार्पण आज युवा सेना प्रमुख
आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं. टप्याटप्यानं अशा शंभर स्मार्ट बसेस सेवेत आणण्यात
येणार आहेत. या बसेसध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, फायर सेफ्टी यंत्रणा, कचरा पेटी, प्रवाशांना
तातडीनं मदत हवी असल्यास प्रत्येक सीटजवळ हेल्प स्विच अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.
****
गोंदिया
इथं सुरू असलेल्या शिक्षक भारतीच्या आठव्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनात आज
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. या संमेलनाचं
उद्घाटन काल काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या हस्ते झालं. राज्याच्या काना-कोपऱ्यातून
हजारो शिक्षकांनी या संमेलनात हजेरी लावली आहे.
****
बेळगाव
इथं आज तेराव्या मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीनं झाली. या ग्रंथदिंडीत
शाळकरी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. लेक वाचवा, लेक
शिकवा, पर्यावरण वाचवा, पुस्तकांचे महत्व अशा विषयांवरील फलक या दिंडीत झळकावण्यात
आले.
****
मुंबईत
कालपासून सुरू झालेल्या प्रीमियर बॅडमिंटन लीग स्पर्धेत ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही.सिंधूच्या
नेतृत्वाखालील हैद्राबाद हंटर्सनं विजयी सलामी दिली. काल झालेल्या पहिल्याच सामन्यात
हैद्राबाद हंटर्सनं या स्पर्धेत पहिल्यांदाच उतरलेल्या पुणे सेव्हन एसेस चा पराभव केला.
महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूनं ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेत्या स्पेनच्या कॅरोलिना मरीनचा
आठ - १५, १५ - आठ, १५ - १३ असा पराभव केला. पुरुष एकेरीत डेन्मार्कच्या मार्क कालजोऊनं
लक्ष्य सेन याच्यावर, तर दुसऱ्या एका सामन्यात दक्षिण कोरियाच्या ली ह्यून ईल यानं
फ्रान्सच्या ब्राइस लिवरडेजवर मात केली. पुरुष दुहेरीत किम सा रेंग आणि बोदिन इसारा
जोडीनं चिराग शेट्टी आणि मथाइस बोए जोडीचा पराभव केला. या स्पर्धेत आज मुंबई रॉकेट्सचा
सामना दिल्ली डॅशर्स सोबत सायंकाळी चार वाजता होईल, तर अहमदाबाद स्मॅश मास्टर्स चा
सामना नॉर्थ इस्टर्न वॉरिअर्स सोबत सायंकाळी सात वाजता होणार आहे.
****
जालन्यात
सुरू असलेल्या ६२ व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत
महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठी आज पुण्याचा अभिजित कटके आणि बुलडाण्याचा बाळा रफिक
यांच्यात अंतिम लढत होणार आहे. अभिजित कटके हा गतवर्षीही महाराष्ट्र केसरीचा मानकरी
ठरला होता.
****
नांदेड
इथं आज सकाळी झालेल्या राज्य क्रॉसकंट्री स्पर्धेत नागपूरच्या धावपटूंनी बाजी मारली.
पहिल्या तिन्ही स्थानावर नागपूरच्या धावपटू विजयी ठरल्या. प्राजक्ता गोडबोले प्रथम,
शीतल भगत द्वितीय आणि निकिता राऊत तिसऱ्या स्थानावर राहिली.
****
No comments:
Post a Comment