Wednesday, 19 December 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 19.12.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 19  December 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १९ डिसेंबर २०१  दुपारी .०० वा.

****



 विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज आजही बाधित झालं. लोकसभेचं कामकाज सुरू होताच, काँग्रेस पक्षानं राफेल लढाऊ विमान खरेदीचा मुद्दा, अण्णाद्रमुक पक्षाच्या सदस्यांनी कावेरी खोऱ्यातल्या शेतकऱ्यांचा मुद्दा, तर तेलगु देसम पक्षाच्या सदस्यांनी आंध्र प्रदेश राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा मुद्दा उपस्थित केला. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी गदारोळात प्रश्नोत्तराचा तास पुकारला. मात्र विरोधकांचा गदारोळ वाढत गेल्यानं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं होतं. कामकाज पुन्हा सुरु होताच काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी, राफेल खरेदी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची मागणी करत घोषणाबाजी सुरु केली. सरकार चर्चा करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. तर राफेल प्रकरणी चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं गृहमंत्री राजनाथ सिंह आणि संसदीय कार्यमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी स्पष्ट केलं. गदारोळ सुरुच राहील्याचं अध्यक्षांनी लोकसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं.  



 राज्यसभेत सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी शून्य काळ पुकारताच, काँग्रेस, अण्णाद्रमुक तसंच तेलगु देसम पक्षाच्या सदस्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी सुरू केली. राफेल खरेदी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची मागणी करत काँग्रेसच्या सदस्यांनी हौद्यात उतरुन फलक झळकावले. काँग्रेस पक्ष कामकाजात व्यत्यय आणत असून, सरकार सर्व मुद्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचं संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय गोयल यांनी सांगितलं. सभापतींनी या गदारोळातच कामकाज सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानंतर त्यांनी, सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.

****



 काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे शेतकऱ्यांच्या मुद्यांचं राजकारण करत असल्याचा आरोप संसदीय कार्यमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केला आहे. ते आज संसद भवन परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. आधीच्या काँग्रेस सरकारच्या काळात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे शेतकऱ्यांच्या विविध समस्या उद्भवल्याचं ते म्हणाले.

****



 आगामी लोकसभा निवडणूक शिवसेना भारतीय जनता पक्षासोबतच लढवेल, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत आज एका कार्यक्रमात ते बोलत होते. विरोधकांचं महागठबंधन असं काहीही नसून, तो एक गैरसमज असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं गेल्या पाच वर्षात राष्ट्रीय सुरक्षेची हमी दिली, तसंच भ्रष्टाचाराच्या विरोधात लढ दिला, हेच आमचे निवडणुकीतले मुद्दे असतील, असंही शहा यांनी सांगितलं.

****



 भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रो ‘जी सॅट सेव्हन ए’ या उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी सज्ज असून, प्रक्षेपणाची उलट गणना श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अवकाश केंद्रात सुरळीत चालू आहे. जीएसएलव्ही एफ ११ द्वारे आज संध्याकाळी चार वाजता या उपग्रहाचं प्रक्षेपण होईल.

****



 ज्येष्ठ मराठी चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांचं आज पहाटे कोल्हापूर इथं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं, ते ६१ वर्षांचे होते. भालकर यांनी १३ हून अधिक मराठी चित्रपटांसाठी दिग्दर्शन केलं होतं. नाथा पुरे आता, राजमाता जिजाऊ, लेक लाडकी, हाय कमांड हे त्यांचे गाजलेले चित्रपट होत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे ते माजी अध्यक्ष होते, तसंच संस्कार भारती कोल्हापूरचे विद्यमान अध्यक्ष होते.

****



 सरकारची वित्तीय कामगिरी उत्तम असून यंदाही वित्तीय तूट नियंत्रित राहील, असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. ते काल दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. तरलता आणि निधी समस्येसारख्या प्रश्नांचा निपटारा करण्यासाठी सरकानं रिझर्व्ह बँकेकडे केलेल्या निधीच्या मागणीचं त्यांनी समर्थन केलं.

****



 मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल मुंबईत राज्यात दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यांमध्ये राबवायच्या योजनांचा आढावा घेतला. ज्या भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा होतो तिथे तात्पुरती पाणी पुरवठा योजना सुरु करुन नागरिकांना पाणी पुरवण्याचं नियोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. जालना, बुलढाणा, अकोला, सातारा या जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यासाठी तिथल्या जिल्हा प्रशासनानं अहवाल दोन दिवसांत सादर करावा, असे निर्देश देण्यात आल्याचं पाटील यांनी सांगितलं.  

****



 राज्यात तापमानात लक्षणीय घट झाली आहे. सर्वच ठिकाणी कडाक्याची थंडी जाणवत आहे. नाशिक इथं आज या हंगामातलं निचांकी सात पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जालना शहरातही कडाक्याची थंडी पडली असून, आज सकाळी सर्वत्र धुकं पसरलं होतं.

*****

***

No comments: