Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 31 December 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ डिसेंबर २०१८ दुपारी १.०० वा.
****
राज्यसभेचं कामकाज आज सुरू झाल्यावर काही वेळातच सदस्यांच्या गोंधळामुळे
स्थगित करण्यात आलं. अण्णाद्रमुक पक्षाच्या सदस्यांनी कावेरी नदीवरच्या प्रस्तावित
धरणाच्या विरोधात घोषणाबाजी करत गोंधळाला सुरुवात केली. विरोधी पक्षांची सदनाचं कामकाज
सुरू ठेवण्याची इच्छा असल्याचं विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद नमुद करत असतानाही
या सदस्यांनी गदारोळ सुरूच ठेवल्यामुळे उपसभापती हरिवंश सिंह यांना सभागृहाचं काम दुपारी
दोन वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं. मुस्लिम महिला वैवाहिक हक्क संरक्षण विधेयक, अर्थात
तिहेरी तलाक विधेयक आज राज्यसभेसमोर मांडण्यात येणार आहे. दरम्यान, लोकसभेचं कामकाज
सुरू होताच, काँग्रेसनं राफेल व्यवहाराच्या चौकशीच्या मागणीसाठी,तर अण्णाद्रमुक पक्षानं
कावेरी नदी प्रश्नासंदर्भात घोषणाबाजी सुरू केली. विरोधी पक्षांच्या गोंधळातही प्रश्नकाळाचं
कामकाज काही काळ सुरू राहिलं, मात्र हा गदारोळ सुरूच राहिल्यानं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा
महाजन यांना कामकाज बारा वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं होतं.बारा वाजता कामकाज सुरू
झालं असलं तरी विरोधीपक्ष सदस्यांची घोषणाबाजी सुरूच आहे.
****
खनिज तेलाच्या वाढत्या
किमती, अमेरिका चीन व्यापार युद्ध आणि अमेरिकेचा अर्थिक संकुचितपणा, अशा बाह्य कमजोर
घटकांच्या पार्श्वभूमीवर भारत पुढच्या आर्थिक वर्षात अधिक चांगला आर्थिक वृद्धी दर
नोंदवेल, असं सीआयआय, अर्थात भारतीय उद्योग महासंघानं म्हटलं आहे. सेवा आणि पायाभूत
सुविधा क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे हे शक्य होणार असल्याचं महासंघानं म्हटलं
आहे.
****
आगामी लोकसभा निवडणुकांसह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर
चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात
आली आहे. येत्या अकरा आणि बारा तारखेला नवी दिल्लीमध्ये ही बैठक होणार असून, या बैठकीला
पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री आणि पक्षातले पदाधिकारी,
यांच्यासह बारा हजारहून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहण्याची अपेक्षा असल्याचं भाजपचे
राष्ट्रीय महासचिव अनिल जैन यांनी म्हटलं आहे.
****
शासनाच्या विविध
योजना गरजू लोकांपर्यंत पोचल्यानंतर त्याचा
होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि त्यात आवश्यक वाटणाऱ्या सुधारणा, याबाबत मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस या लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत. येत्या बुधवारी म्हणजे
दोन जानेवारीला सकाळी अकरा वाजता होणाऱ्या ”लोकसंवाद” या कार्यक्रमातून मुख्यमंत्री
लाभार्थ्यांशी दूरदृष्य संवाद प्रणालीमार्फत बोलणार आहेत. समाजमाध्यमांवर हा कार्यक्रम
थेट पाहता येईल.
****
राज्यातल्या बहुचर्चित
तेलगी बनावट स्टँप घोटाळा खटल्यातल्या सर्व आरोपींची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली
आहे. नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पी. आर.देशमुख यांनी आज हा निकाल दिला.
****
राज्य परिवहन महामंडळ
–एस.टी.च्या कर्मचाऱ्यांनाही आता सहा महिन्यांची बालसंगोपन रजा मिळणार आहे. परिवहन
मंत्री आणि एस.टी.चे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी काल ही घोषणा केली. महिला कर्मचाऱ्यांसह
पत्नी हयात नसलेले पुरुष कर्मचारी, तसंच ज्याची पत्नी असाध्य आजारानं पीडित आहे, अशा
पुरुष कर्मचाऱ्यांना ही रजा मिळू शकेल. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना या रजेसाठी लागू
असलेल्या अटी आणि नियम एस.टी.च्या कर्मचाऱ्यांनाही लागू असणार आहेत.
****
पत्रकारितेच्या क्षेत्रात
राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांसाठीचा, लोकमान्य टिळक पत्रकारिता
राष्ट्रीय पुरस्कार, यावर्षी सिद्धार्थ वरदराजन यांना जाहीर झाला आहे. केसरी मराठा
संस्थेचे विश्वस्त डॉक्टर दीपक टिळक यांनी काल याबाबतची घोषणा केली. येत्या चार तारखेला
या पुरस्काराचं पुण्यात वितरण होणार आहे.
****
पुण्यात सुरू असलेल्या
प्रिमिअर बॅडमिंटन लीग स्पर्धेत काल किदांबी श्रीकांतच्या नेतृत्वाखालच्या बंगलुरू
रॅप्टर्स संघानं पुणे सेव्हन एसेस संघाला चार –तीन अशा गुणांनी पराभूत केलं. आज संध्याकाळी अवध वॉरियर्स संघाचा सामना मुंबई रॉकेट्स संघाशी
होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment