Monday, 24 December 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 24.12.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२४   नोव्हेंबर डिसेंबर २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ शंभर रुपयांच्या स्मारक नाण्याचं अनावरण केलं. अटलजी आपल्यामध्ये नाहीत ही गोष्ट मन मानत नसल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. लोकशाही टिकून रहावी हा त्यांचा उद्देश होता, असं सांगत पंतप्रधानांनी अटलजींच्या आठवणींना उजाळा दिला.

****



 दीनमित्रकार मुकुंदराव पाटील राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार मुंबई इथल्या पत्रकार संध्या नरे-पवार यांना काल समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यात मुकींदपूर इथं ज्येष्ठ साहित्यिक कुमार शिराळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. परभणीचे प्राध्यापक विट्ठल घुले, जालन्याचे डॉक्टर प्रभाकर शेळके यांच्यासह आठ मान्यवरांना यावेळी दीनमित्रकार मुकुंदराव पाटील साहित्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.

****



 औरंगाबाद इथं आयोजित सीएम चषक खोखो-कबड्डी स्पर्धेचं उदघाटन आमदार अतुल सावे यांच्या हस्ते काल करण्यात आलं. विभागीय क्रीडा संकुलात आयोजित या स्पर्धेत कबड्डी आणि खो-खोचे प्रत्येकी २८ संघ सहभागी झाले आहेत. युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे.

****



 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईनं बारावी आणि दहावी परीक्षेचं वेळापत्रक जारी केलं आहे. बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून तीन एप्रिलपर्यंत तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून २९ मार्चपर्यंत चालणार आहे. सकाळी साडे दहा ते दुपारी दीड या वेळेत या दोन्ही वर्गांच्या परीक्षा होणार आहेत. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हे वेळापत्रक उपलब्ध आहे.

****



 लातूर जिल्ह्यातील उदगीर इथं सुरू असलेल्या  मराठवाडा साहित्य संमेलनात आज आणि उद्या कथाकथन, कवीसंमेलन तसंच विविध विषयांवरील परिसंवाद होणार आहेत. काल ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उदघाटन झालं. डॉ. ऋषिकेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली हे साहित्यसंमेलन होत आहे.

*****

***

No comments: