Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 22
December 2018
Time 7.10 AM to
7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२
डिसेंबर २०१८ सकाळी ७.१० मि.
****
§
देशातल्या १० महत्त्वाच्या तपास यंत्रणांना कोणत्याही संगणकावर
नजर ठेवण्याचा अधिकार;
§
केंद्रीय
गृहमंत्रालयाच्या निर्णयावर विरोधकांची टीका
§
सोहराबुद्दीन
शेख एन्काउंटर प्रकरणी सर्व २२ आरोपींची निर्दोष मुक्तता
§ दुष्काळी तालुके आणि महसूल मंडळातल्या पाणीपुरवठा योजनांचं वीजेचं चालू देयक,
मदत आणि पुनवर्सन विभागाच्या टंचाई निधीतून भरलं जाणार
आणि
§ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अभिजित कटकेचा दुसऱ्या फेरीत
प्रवेश
****
केंद्रीय गृह मंत्रालयानं देशातल्या १० महत्त्वाच्या
तपास यंत्रणांना देशभरातल्या कोणत्याही संगणकातल्या माहितीवर नजर
ठेवण्याचा अधिकार दिला आहे. गृहमंत्रालयानं यासंदर्भातली
अधिसूचना जारी केली. दरम्यान, या मुद्यावरून राज्यसभेत काल विरोधकांनी सरकारवर टीका
केली. राष्ट्रीय
सुरक्षा आणि देशाच्या अखंडतेला असणारा धोका लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचं अर्थमंत्री
अरुण जेटली यांनी सांगितलं. विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी, यामुळे देशात आपत्कालिन
परिस्थिती निर्माण होईल, असं मत व्यक्त केलं. असे आदेश जारी करुन सरकार नागरिकांच्या
खासगी आयुष्यात ढवळाढवळ करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. माहिती तंत्रज्ञान मंत्री
रविशंकर प्रसाद यांनीही विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर दिलं, मात्र विरोधकांचा गदारोळ
वाढत गेल्यानं उपसभापतींनी कामकाज बुधवार २६ डिसेंबर पर्यंत स्थगित केलं.
त्यापूर्वी सकाळी सदनाचं
कामकाज राफेल खरेदी चौकशी, कावेरी खोऱ्यातले शेतकऱ्यांचे प्रश्न आणि आंध्रप्रदेशला
विशेष राज्य दर्जा, या मागण्यांवरून झालेल्या गदारोळामुळे बारावाजेपर्यंत तहकूब झालं
होतं. याच मुद्यांमुळे लोकसभेचं कामकाज कालही बाधित झालं. आता नाताळच्या सुटीनंतर गुरुवार
२७ डिसेंबर रोजी दोन्ही सदनांचं कामकाज सुरू होईल.
****
नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्र प्रकाशित करणाऱ्या
असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड या कंपनीला दिल्लीतली त्यांच्या
कार्यालयाची जागा रिकामी करण्याचे आदेश, दिल्ली उच्च न्यायालयानं
दिले आहेत. गेल्या
५६ वर्षांपासून भाडेपट्ट्यावर सुरू असलेलं हे कार्यालय रिकामं करण्याचे निर्देश, शहर विकास मंत्रालयानं दिले होते, या विरोधात कंपनीने न्यायालयात धाव घेत,
आदेशाला स्थगिती मिळवली होती, मात्र काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं, स्थगिती काढून
घेत, सरकारी आदेशानुसार कार्यालय रिकामं करण्याचे निर्देश दिले.
****
गुजरातमधल्या बहुचर्चित सोहराबुद्दीन शेख एन्काउंटर प्रकरणी केंद्रीय अन्वेषण
विभागाच्या मुंबईतल्या विशेष न्यायालयानं, सर्व २२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
गुजरातमध्ये १३ वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेत, मुंबईत सीबीआयच्या विशेष न्यायालयात
खटला चालवण्यात आला. सोहराबुद्दीनचा मृत्यू हा गोळी लागून झाला असला तरी, ती गोळी याच
आरोपींनी चालवल्याचा आरोप सिद्ध झाला नाही. बचाव पक्षाचा युक्तिवाद न्यायालयानं ग्राह्य
धरत, सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली
****
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आघाडीतल्या मित्रपक्षांची बैठक काल
मुंबईत झाली. या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य मित्रपक्षांचे प्रमुख
नेते उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप करताना स्वाभिमानी शेतकरी संघटना,
बहुजन विकास आघाडी आणि कम्युनिस्ट पक्षाला प्रत्येकी एक जागा देण्याबाबत या बैठकीत
सहमती झाल्याचं सूत्रांकडून समजतं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हातकणंगले, बहुजन विकास
आघाडीला पालघर तर कम्युनिस्ट पक्षाला दिंडोरी मतदार संघाची जागा सोडण्यात येईल अशी
माहिती सूत्रांनी दिली आहे.
****
सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यासह वेतन वाढीच्या मागणीसाठी
अखिल भारतीय बँक अधिकारी संघटनेनं काल पुकारलेल्या संपाचा अंशतः परिणाम बँकांच्या कामकाजावर
झाला. दरम्यान, युनायटेड बँक युनियन फोरमनं येत्या २६ तारखेला संपाचा इशारा दिला आहे.
****
राज्यातल्या दुष्काळ घोषित केलेल्या १५१ तालुके आणि २६८ महसूल मंडळातल्या
ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनांच्या थकित वीज देयकाच्या मुद्दल रकमेपैकी ५ टक्के रक्कम
शासन भरणार असून थकित देयकावरचं दंड -व्याज माफ करण्यात आलं असल्याची माहिती राज्याचे
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना दिली. ते काल नागपूर इथं बोलत होते.
दुष्काळी तालुक्यांतल्या आणि महसूल मंडळातल्या नोव्हेंबरपासूनचं पाणीपुरवठा योजनांचं
वीजेचं देयक, मदत आणि पुनवर्सन विभागाच्या टंचाई निधीतून भरण्यासही शासनानं मंजुरी
दिली असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.
****
दहावीच्या परीक्षेसाठी
आता मुक्त परीक्षा मंडळ केलं जाणार असून क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमात करिअर करू
इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास करतानाच आपले छंद जोपासता येणार आहेत, अशी माहिती
राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. ते काल रत्नागिरीत विद्यार्थ्यांशी
थेट संवाद कार्यक्रमात बोलत होते.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं
जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
जालना इथं सुरु असलेल्या ६२ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या कालच्या तिसऱ्या दिवशी
अभिजित कटकेनं शिवराज राक्षेचा पराभव करत, महाराष्ट्र केसरी किताबासाठीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. अन्य लढतीत, सोलापूरचा ज्ञानेश्वर जमदाडे याच्यावर
रत्नागिरीच्या संतोष दोरवड यानं विजय मिळवला. ६१ किलो गादी गटात कोल्हापूरच्या सौरभ पाटील याने कल्याणच्या
जयेश शेळके याचा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं, ८६ किलो गादी गटात अहमदनगरच्या अक्षय कावरे यानं पुण्याच्या
अनिकेत खोपडे याला चीतपट करत सुवर्णपदक जिंकलं. ८६ किलो माती गटात कोल्हापूरच्या शशिकांत बोंगार्डे याने जालन्याच्या बालाजी येलगुंडे
याला झोळी डावावर चीतपट करीत सुवर्णपदक मिळवलं. ७० किलो माती गटात कोल्हापूरच्या राम कांबळे यानं कोल्हापूरच्याच
मच्छिंद्र निउंगरे याचा ७-३ अशा गुणाने पराभव करत सुवर्णपदक जिंकलं.
****
औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातल्या ब्रह्मगव्हाण
उपसा सिंचन योजनेची प्रलंबित कामं प्राधान्यानं पूर्ण करा असे निर्देश जलसंधारण मंत्री
विजय शिवतारे यांनी दिले आहेत. या योजनेच्या कामांची काल त्यांनी पाहणी केली. या योजनेच्या
मूळ आराखड्यात जी गावं लाभक्षेत्रात नाहीत, त्यांना समाविष्ट करण्याची मागणी आमदार
संदिपान भुमरे यांनी केली आहे. त्यानुसार अशा गावांचं सर्वेक्षण करून संपूर्ण अहवाल
पंधरा दिवसात शासनाला सादर करण्याच्या सूचनाही शिवतारे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
****
चाळीसाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाला उद्यापासून लातूर जिल्ह्यातल्या उदगीर
इथं प्रारंभ होत आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष
कौतिकराव ठाले पाटील यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत या संमेलनातल्या नियोजित कार्यक्रमांची माहिती दिली. संमेलनाच्या पूर्वसंध्येला आज उदगीर शहरातून ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. उद्या तारखेला साहित्यिक डॉ.चंद्रकांत पाटील
यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होईल, २५ तारखेपर्यंत चालणाऱ्या या संमेलनात,
परिसंवाद, कथाकथन, कवि संमेलनं, आदी कार्यक्रम
होणार आहेत.
****
नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव कृषी उत्पन्नबाजार
समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या रविवारी मतदान होत आहे. १८ संचालक पदांसाठी
६०उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. १०८ मतदान केंद्रांवर ६० हजार हून अधिक मतदार मतदानाचा
हक्क बजावतील, असं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद या नवीन
रेल्वे मार्गाच्या कामासाठीची पुढील कार्यवाही तातडीनं करून केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीसाठी प्रस्ताव
सादर करण्याचे आदेश केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिले आहेत. भारतीय जनता
पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी काल उस्मानाबाद इथं ही माहिती दिली.
****
उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यामधून
पाणी उपसा करणाऱ्यांविरूद्ध फौजदारी कारवाई करण्याचा इशारा नांदेड उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे
कार्यकारी अभियंता व्ही. के. कुरूंदकर यांनी दिला आहे. कालव्यावरच्या बांधकामांचं नुकसान
करून विहीरी आणि शेत तळे विना परवानगी भरुन घेण्याचे प्रकार निदर्शनास येत असल्याच्या
पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे.
****
अहमदनगर
जिल्ह्यात कर्जत
शहरातल्या देवस्थान जमिनीवरचे
अनधिकृत बांधकामं काढण्याच्या मागणीसाठी आत्मदहन करणाऱ्या तौसिफ हमीम शेख यांचा काल सकाळी उपचारादरम्यान
मृत्यू झाला. या घटनेनंतर कर्जत तालुक्यात नागरिकांनी ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन
केलं.
*****
***
No comments:
Post a Comment