Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 24 December 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ डिसेंबर २०१८ दुपारी १.०० वा.
****
जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात
नियंत्रण रेषेजवळ आज पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. नियंत्रण रेषेजवळ
तैनात सेनेच्या जवानांनी या गोळीबाराला चोख प्रत्यूत्तर दिलं. यात कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशाच्या
एक दिवसीय दौऱ्यावर
आहेत. पूर्वोदय म्हणजेच नवीन भारताच्या उभारणीतला समृध्द पूर्वभारत या मोदींच्या कार्यक्रमानुसार
ते या दौऱ्यात महामार्ग, उच्च
शिक्षण आणि सांस्कृतिक उपक्रमाशी संबधित १५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन
करतील. भारतीय तंत्रज्ञान संस्था - आयआयटी
भुवनेश्वरच्या नवीन प्रांगणाचं राष्ट्रार्पणही
त्यांच्या हस्ते होईल. तसंच भुवनेश्वरजवळ साडे त्र्याहत्तर कोटी रुपये खर्च करुन उभारलेल्या
कामगार विमा रुग्णालयाचंही ते उद्घाटन करणार आहेत.
****
भारताएवढा
सहिष्णू देश जगाच्या पाठीवर नाही असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी
केलं आहे. उत्तर प्रदेशातल्या लखनौ इथं काल किंग जॉर्ज वैद्यकीय विद्यापीठातल्या समारंभानंतर
ते पत्रकारांशी बोलत होते. वेगवेगळे धर्म भारतात गुण्यागोविंदानं नांदत असून, अशी स्थिती
इतर कोणत्याही देशात नाही असं ते म्हणाले.
****
विद्यार्थ्यांना
प्रायोगिक शिक्षण, क्रीडा आणि इतर जीवनोपयोगी शिक्षणासाठी वेळ मिळावा म्हणून
वर्गशिक्षणाचा अभ्यासक्रम हा टप्प्यांमध्ये विभागण्याच्या दृष्टीनं सरकार पावलं टाकत
आहे. केंद्रीय मुनष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्याजवळ एका शाळेतल्या
समारंभादरम्यान ही माहिती दिली. सुरुवातील
दहा टक्के आणि नंतर २० टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात येईल. ‘समग्र शिक्षा’ या धोरणाअंतर्गत अकरा लाख
शाळांना पुस्तकं तसंच क्रीडा साहित्यासाठी पाच हजार ते २५ हजार रुपयांपर्यंत निधी
देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीनं आधुनिक विज्ञानाचा
परिचय करुन देण्यासाठी देशभरातल्या शाळांमधून ‘अटल प्रयोग शाळा’ स्थापन करण्यात येतील
असंही जावडेकर यावेळी म्हणाले.
****
आदीवासींसाठीच्या
शासकीय शाळांची अवस्था बिकट असून, त्यावर अधिक लक्ष देण्याची गरज असल्याची माहिती आदिवासी
जनजाती आयोगाचे केंद्रीय अध्यक्ष नंदकुमार सहाय यांनी म्हटलं आहे. ते
काल नंदूरबार इथं एका परिषदेत बोलत होते. आजही पोलीस आणि वनविभाग यांच्यात योग्य समन्वय नसल्यानं त्याचा फायदा नक्षलवादी
आपल्या चळवळी बळकट करण्यासाठी करत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. आदीवासींच्या
जमीनी बळकावून त्यांना देशोधडीला लावणाऱ्यांना जनजाती आयोगाच्या माध्यमातून धडा शिकवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
****
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पंढरपूरच्या दौऱ्यावर
असून, त्याठिकाणी ते सभेला संबोधित करणार आहेत. या सभेसाठी राज्यभरातून पाच लाख शिवसेना
कार्यकर्ते तसंच संत-महंत, शेतकरी, शिवसेना मंत्री, आमदार-खासदार उपस्थित असल्याची
माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
****
पालघर जिल्ह्यातल्या बोईसर इथल्या तारापूर औद्योगिक
वसाहतीत असलेल्या कॅम्लिन कंपनीत आज सकाळी भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचं सामान
जळून खाक झालं. आमच्या वार्ताहरानं दिलेल्या माहितीनुसार अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण
मिळवलं आहे.
****
महाराष्ट्रासह तीन राज्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या
नाशिक मर्चंट बँकेच्या निवडणुकीसाठी काल ३६ पूर्णांक २१ टक्के मतदान झालं. बँकेच्या
एकूण एक लाख शहात्तर हजार सभासद असून, त्यापैकी ६३ हजार ८३९ मतदारांनी मतदान केलं.
परवा २६ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
****
उत्तर भारताला थंडीच्या लाटेनं वेढलं असून अनेक ठिकाणी
धुक्यामुळे जनजीवन ठप्प झालं आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश राजस्थान, हरियाणा आणि
दिल्लीत थंडीचा कडाका वाढला आहे. दिल्लीत गेल्या १२ वर्षांतलं सर्वात कमी तापमान काल
नोंदवलं गेलं.
राज्यातही अनेक भागात तापमानात मोठ्या प्रमाणात घट
झाली आहे. गेल्या चोविस तासात विदर्भात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली असून, कोकण
आणि मध्य महाराष्ट्रातल्या तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. उद्या सकाळपर्यंतच्या
हवामानाच्या अंदाजानुसार विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता असून, उर्वरित
राज्यात हवामान कोरडं राहील, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
मुंबई
इथं सुरु असलेल्या बॅडमिंटन प्रिमीअर लिग स्पर्धेत आज पुणे सेव्हन एस आणि अवध वॉरीअर्स
या दोन संघामध्ये लढती होणार आहेत. काल या स्पर्धेत आपल्या सलामीच्या लढतीत अहमदाबाद
स्मॅश मास्टर्सच्या संघानं नॉर्थ इस्टर्न वॉरीअर्सचा चार - एक अशा फरकानं पराभव केला.
कर्णधार सायना नेहवालच्या जागी खेळायला आलेल्या रितुपर्णा दासनं स्कॉटलंडच्या कर्स्टी
ग्लीमौरला पराभूत करत नॉर्थ इस्टर्न वॉरीअर्सला एकमेव विजय मिळवून दिला. मुंबई रॉकेट्स
संघानंही स्पर्धेत विजयी सुरुवात केली.
*****
***
No comments:
Post a Comment