Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 24
December 2018
Time 7.10 AM to
7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४
डिसेंबर २०१८ सकाळी ७.१० मि.
****
v
रस्ते आणि सिंचनाचे हाती घेतलेले सर्व प्रकल्प पूर्ण करणार - मुख्यमंत्र्यांची ग्वाही
v
मुंबईचे माजी नगरपाल आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नाना चुडासामा यांचं काल निधन
v
समाजात प्रबोधन आणि परिवर्तनासाठी साहित्याशिवाय पर्याय नाही, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत
पाटील - ४० व्या मराठवाडा साहित्य संमेलनाला उदगीर इथं प्रारंभ
v
परभणी ते मुदखेड या मार्गाचं दुहेरीकरण येत्या मार्चपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित
आणि
v
बुलडाण्याचा बाला रफीक शेख यंदाचा महाराष्ट्र केसरी
*****
रस्ते आणि सिंचनाच्या
प्रश्नावर गेली चार वर्षे राज्य आणि केंद्र सरकार काम करत असून हाती घेतलेले सर्व प्रकल्प
पूर्ण करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सातारा जिल्ह्यात
सातारा पुणे रस्त्यावर खंबाटकी घाटात एस वळण परिसरात नियोजित बोगदा तसंच सुमारे एक
हजार कोटी खर्चाच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन मुख्यमंत्री आणि केंद्रीय परिवहन
मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. मुंबई ते बंगळुरु हा
इकोनॉमिक कॉरिडॉर असून, त्याच्या विकासाला चालना देणारा प्रकल्प हाती घेतला असल्याचं
मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलतांना सांगितलं.
****
मुंबईचे माजी नगरपाल
आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नाना चुडासामा यांचं काल निधन झालं, ते ८४ वर्षांचे
होते. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक अशा क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय
कार्य केलं होतं. भाजपच्या प्रवक्त्या शायना एन सी यांचे ते वडील होत. चुडामासा यांनी
केलेल्या समाजकार्यासाठी २००५ साली भारत सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित
केलं होतं. चुडासामा यांच्या निधनामुळे
सामाजिक - सांस्कृतिक विकासाचा ध्यास असणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व हरपल्याची
भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेशातून व्यक्त केली आहे.
****
मुंबईत
गोरेगाव इथल्या मोतीलाल नगर मध्ये काल
सकाळी निर्माणाधीन दोन
मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून, सहा
जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून, घटनास्थळावर
मदतकार्य सुरु आहे.
****
देशात सध्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आल्यासारखी
स्थिती निर्माण झाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं
आहे. गोंदिया इथं आयोजित आठव्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनात ते काल बोलत होते.
गोंदिया इथं उभारण्यात आलेल्या रिलायन्स कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटनही पवार यांच्या
हस्ते झालं.
****
समाजात प्रबोधन आणि परिवर्तन करायचं असेल, तर साहित्याशिवाय
पर्याय नाही, असं ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ४० व्या मराठवाडा
साहित्य संमेलनाला कालपासून लातूर जिल्ह्यात उदगीर इथं प्रारंभ झाला, त्यावेळी ते बोलत
होते. प्रमुख पाहूणे म्हणुन बोलताना दिलीप धारुरकर यांनी सध्याची पिढी सामाजिक माध्यमांवर
वाचन करते, त्यामुळे साहित्यिकांनी नवीन साधनाचा वापर करुन अभिव्यक्त होण्याचं आवाहन
केलं.
मावळते अध्यक्ष डॉ रंगनाथ तिवारी यांनी डॉ ऋषीकेश
कांबळे यांच्याकडे संमेलनाध्यक्षपदाची सुत्रं सोपवली. सीमावर्ती भागातल्या शहरात आयोजित
साहित्य संमेलनामुळे मराठी भाषेचा विकास होईल, असा विश्वास संमेलनाध्यक्ष कांबळे यांनी
व्यक्त केला.
खासदार डॉ सुनील गायकवाड, आमदार विक्रम काळे, उदगीरचे
नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांच्यासह मराठवाडा साहित्य परिषदेचे पदाधिकारी यावेळी
उपस्थित होते. उद्या २५ तारखेपर्यंत चालणाऱ्या या संमेलनात कथाकथन, कविसंमेलन, विविध
विषयांवरचे परिसंवाद होणार आहेत.
****
शिक्षण आणि संशोधनाला चालना देण्यासाठी औरंगाबाद
इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं चीनमधल्या दोन शैक्षणिक संस्थांसोबत
सामंजस्य करार केले आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू बी ए चोपडे आणि चीनचे परराष्ट्र व्यवहार
मंत्री वांग यी यांनी या करारांवर स्वाक्षरी केल्या.
****
औरंगाबाद महापालिकेच्या पाच स्मार्ट शहर वाहतुक बसचं,
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते काल लोकार्पण झालं. टप्याटप्यानं अशा
शंभर स्मार्ट बस, सेवेत आणण्यात येणार आहेत. या बसध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निसुरक्षा
यंत्रणा, कचरा पेटी, प्रवाशांना तातडीनं मदत हवी असल्यास प्रत्येक सीटजवळ हेल्प स्विच
अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईनं बारावी
आणि दहावी परीक्षेचं वेळापत्रक जारी केलं आहे. बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून
तीन एप्रिलपर्यंत तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून २९ मार्चपर्यंत चालणार आहे.
सकाळी साडे दहा ते दुपारी दीड या वेळेत या दोन्ही वर्गांच्या परीक्षा होणार आहेत. मंडळाच्या
अधिकृत संकेतस्थळावर हे वेळापत्रक उपलब्ध आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
परभणी ते मुदखेड या रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण येत्या
मार्चपर्यंत पूर्ण होणार असून, मराठवाड्यात माल वाहतूक आणि प्रवासी वाहतूक यामध्ये
आमूलाग्र बदल होणार असल्याचं, रेल्वेविभागाकडून सांगण्यात आलं आहे. परभणी ते मुदखेड
या ८१ किलोमीटर लांबीच्या मार्गापैकी ४० किलोमीटर रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण पूर्ण
झालं असून, उर्वरित ४१ किलोमीटर रेल्वे मार्गाचं
दुहेरीकरण येत्या मार्चपर्यंत पूर्ण होईल, असं रेल्वे विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
विभागात रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाचं कामही लवकरच सुरु होणार असून, येत्या तीन
वर्षात विद्युतीकरण पूर्ण करण्याचं उद्धिष्ट ठेवण्यात आलं आहे. या मार्गावर तीन छोटे
पूल आणि एका भुयारी मार्गाचं काम सुरू असून, काही छोटी कामं शिल्लक असल्याचं, आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बुलडाण्याचा बाला रफीक शेख महाराष्ट्र केसरी किताबाचा
मानकरी ठरला आहे. काल जालन्यात झालेल्या अंतिम लढतीत रफीकनं, गतविजेता महाराष्ट्र केसरी पुण्याचा अभिजित कटके याच्यावर ११ - ०३ असा विजय
मिळवला. राज्यमंत्री अर्जुन खोतकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या
हस्ते बाला रफीक शेख याला मानाची चांदीची गदा आणि दोन लाख रुपयाचा धनादेश प्रदान करण्यात
आला. उपविजेता अभिजीत कटके याला एक लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात आलं
****
नांदेड इथं काल सकाळी झालेल्या राज्य क्रॉसकंट्री
स्पर्धेत नागपूरच्या धावपटूंनी बाजी मारली. पहिल्या तिन्ही स्थानावर नागपूरच्या धावपटू
विजयी ठरल्या. प्राजक्ता गोडबोले प्रथम, शीतल भगत द्वितीय आणि निकिता राऊत तिसऱ्या
स्थानावर राहिली.
****
उस्मानाबाद इथं काल हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन
करण्यात आलं होतं. पाच, दहा आणि २१ किलोमीटर अशा तीन विभागातून ही स्पर्धा घेण्यात
आली. यात जिल्हा पोलिस अधीक्षक आर. राजा, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, माजी आमदार
ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह शेकडो धावपटू सहभागी झाले होते.
****
नांदेड जिल्ह्याच्या हदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची
निवडणूक शिवसेना भाजप पुरस्कृत पॅनलनं जिंकली आहे, आमदार नागेश पाटील आष्टणकर यांच्या
नेतृत्वात या पॅनलनं दहा जागा जिंकल्या. काँग्रेस पुरस्कृत माजी आमदार माधवराव पाटील
जवळगावकर यांच्या पॅनलला सात जागांवर समाधान मानावं लागलं, एका जागेवर अपक्ष उमेदवार
विजयी झाला.
****
जालना इथं काल १२ व्या महानुभाव साहित्य
संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक आ.ह.साळुंखे यांच्या हस्ते झालं. महानुभाव पंथाचे
उद्गाते चक्रधर स्वामी आणि त्यांच्या शिष्यांनी जीवनाचं तत्वज्ञान सोप्या-सरळ मराठी
भाषेत सांगण्याचा आग्रह केला, असं मत साळुंखे यांनी व्यक्त केलं. आज या संमेलनाचा समारोप होत आहे
****
नांदेड जिल्ह्याच्या ऊमरी तालुक्यात करकाळा इथं आयोजित
१३ व्या 'लोकसंवाद' राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी डॉक्टर केशव
सखाराम देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. येत्या २० जानेवारी रोजी हे संमेलन होणार
आहे.
*****
***
No comments:
Post a Comment