Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30
December 2018
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० डिसेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी आपल्या अंदमान निकोबार बेटांच्या भेटीदरम्यान आज कार निकोबारला
भेट दिली. या बेटावरच्या आदिवासी प्रमुखांशी आणि क्रीडापटूंशी पंतप्रधानांनी संवाद
साधला. अरोंग इथे पंतप्रधानांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसंच आधुनिक क्रीडा संकुलाचं
उद्घाटन केलं, जनतेला संबोधित केलं. विकासाच्या मार्गावर कोणतीही व्यक्ती किंवा कोणताही
भाग मागे राहता कामा नये, हा आपल्या सरकारचा निर्धार असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी
यावेळी केला.
****
संगणक
आणि मोबाईलमधील माहिती तपासण्याची परवानगी दिल्या गेलेल्या संस्थांना याबाबतचा सर्वाधिकार
दिलेला नसून, कोणत्याही संगणक किंवा मोबाईल मधील माहिती तपासण्यासाठी त्यांना यासाठीच्या
नियमांचं पालन करावंच लागेल, असं गृहमंत्रालयानं आज म्हटलं. याबाबतचे सगळे नियम पूर्वीप्रमाणेच
असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. या महिन्याच्या वीस तारखेला गृहमंत्रालयानं जारी
केलेल्या, दहा संस्थांना कोणत्याही संगणक आणि मोबाईलमधली माहिती तपासण्याचे अधिकार
दिल्याबाबतच्या सूचनेवर विरोधी पक्षांनी कठोर टीका केली होती.
****
प्रख्यात
चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांचं आज सकाळी कोलकत्यात निधन झालं. ते पंचाण्णव वर्षांचे
होते. सामाजिक तसंच राजकीय मुद्द्यांवर केंद्रित चित्रपट बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या
सेन यांनी, एक दिन अचानक, मृगया आणि भुवन शोम यासह अनेक गाजलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन
केलं होतं. त्यांना पद्मभूषण तसंच दादासाहेब फाळके पुरस्कारासह अन्य बारा आंतरराष्ट्रीय
चित्रपट पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान
नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मृणाल सेन यांच्या
निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
****
देशांतर्गत
१०० विमानतळांवर स्थानिक वस्तूंची दालनं थाटली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय वाणिज्य
आणि नागरी उड्डयनमंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे. ते काल सावंतवाडी इथं पर्यटन महोत्सवाला
भेट देण्यासाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते. गोवा इथं या अंतर्गत पहिलं दालन लवकरच
उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सिंधूदूर्गच्या चिपी विमानतळाचं उदघाटन
लवकरच करण्यात येईल, असंही सुरेश प्रभू यांनी यावेळी सांगितलं.
****
महाआघाडीतल्या
नेत्यांमध्ये पंतप्रधानपदावरून कोणताही वाद नसून, निवडणूक झाल्यावर सर्व पक्ष एकत्र
येऊन याबाबत निर्णय घेतील, असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
यांनी केलं आहे. ते आज अहमदनगर इथे पत्रकार परिषदेत बोलत होते. कॉंग्रेसनं मध्य प्रदेश
आणि छत्तीसगडमध्ये जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीबाबत पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्यावरून
त्यांना शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती नसल्याचं दिसून येतं, असा आरोप शरद पवार यांनी केला.
सरकार स्वायत्त संस्थांना लक्ष्य करून विरोधकांना नाउमेद करत असल्यानं देशात आणीबाणीसदृष्य
परिस्थिती असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. दरम्यान, अहमदनगर महानगरपालिकेच्या
महापौर-उपमहापौर निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना मतदान करऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या
नगरसेवकांवर आणि स्थानिक नेत्यांवर पक्षाकडून गंभीर कारवाई करण्यात येईल, असं पवार
यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र
स्वाभिमान पक्ष स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढणार आहे, मात्र राज्यात किती जागा लढवायच्या
याचा निर्णय निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर घेणार असल्याची माहिती या पक्षाचे
संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पडवे
इथं ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. दिलेली वचनं पूर्ण केली नाहीत तर, भारतीय जनता
पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत धक्का बसेल, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
****
परभणी
जिल्ह्यात काल रात्री एका जीपनं दुचाकीला दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात तीन जण
मरण पावले तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. हे सर्व ढेंगळी पिंपळगावचे रहिवासी आहेत.
गंभीर जखमीवर नांदेड इथं उपचार सुरू आहेत. सेलू-परभणी मार्गावर हा अपघात झाल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment