Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 December 2018
Time - 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ डिसेंबर २०१८ सायंकाळी ६.००
****
लोकसभेत
आज ‘सरोगसी नियमन विधेयक २०१६’ पारित करण्यात आलं. व्यावसायिक सरोगसी आणि तत्सम अनैतिक
व्यवहाराला प्रतिबंध घालणं, हा या विधेयकाचा उद्देश आहे. राष्ट्रीय आणि राज्य सरोगसी
मंडळाची स्थापना करणं आणि सरोगसीच्या नियमनासाठी योग्य प्राधिकरणांची नेमणूक करण्याची
तरतूद या विधेयकात आहे. गर्भधारणा करु न शकणाऱ्या जोडप्यांनाच सरोगसी देण्याची परवानगी
मिळणार असून, सरोगेट आई ही अशा जोडप्यांची जवळची नातेवाईक पाहिजे आणि तिला याआधी एक
मूल असणं आवश्यक असल्याचं बंधनकारक करण्यात आलं आहे. भारतीय स्त्रियांचं शोषण रोखण्याचा
महत्वाचा उद्देश या विधेयकाचा असल्याचं, केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी
विधेयक सादर करताना सांगितलं. तृणमूल काँग्रेसचे काकोली घोष, बिजू जनता दलाचे भर्तृहरी
मेहताब, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी या विधेयकावरच्या चर्चेत सहभाग
घेतला. कायद्याच्या आधारावर नियम तयार करताना सदस्यांच्या सूचनांचा विचार केला जाईल,
असं नड्डा यांनी सांगितलं.
****
भारतीय
अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं आज ‘जी सॅट सेव्हन ए’ या दळणवळण उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण
केलं. आंध्र प्रदेशातल्या श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून आज संध्याकाळी
चार वाजता जीएसएलव्ही एफ ११ या प्रक्षेपकातून हा उपग्रह अवकाशात झेपावला. केयू बँडच्या
ग्राहकांना हा उपग्रह अधिक चांगली दळणवळण क्षमता उपलब्ध करुन देईल, तो आठ वर्षे काम
करेल. भारतीय वायुसेनेची संवाद प्रणाली सुधारण्यासही या उपग्रहाची मदत होईल.
****
प्रधानमंत्री
कौशल्य विकास योजनेच्या अंमलबजावणीमुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना आधुनिक आणि प्रयोगशील
शेतीबाबत प्रशिक्षण मिळणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
मुंबईत आज प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत शेतकरी कुशल प्रशिक्षण कार्यक्रमाचं
उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. हा उपक्रम पथदर्शी प्रकल्प ठरणार असून, यामुळे शेती
क्षेत्रात परिवर्तन घडण्यास मदत होणार असल्याचं ते म्हणाले. प्रगत तंत्रज्ञान आधारित
शेती पध्दतीमुळे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणं शक्य होणार असल्याचंही
मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं.
****
राज्यात
प्लास्टिक बंदीला चांगला प्रतिसाद मिळत असून, लवकरच ३५ लाख कापडी पिशव्या बाजारात येतील,
असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितलं आहे. मुंबईत आज महाराष्ट्र प्रदूषण
नियंत्रण मंडळातर्फे आयोजित “वर्तमानातील प्रदूषण आव्हान आणि उपाययोजना” या विषयावरील
चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राज्यातल्या २५ नद्यांचं संवर्धन करण्यासाठीचा
प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यातले पर्यावरणाचे प्रश्न
सोडवण्यासाठी पर्यावरण विभाग कटिबद्ध असून, देशातल्या सर्व राज्यांना महाराष्ट्राचा
आदर्श घ्यावा लागेल, असं ते म्हणाले.
****
नाताळच्या
सुट्ट्या आणि नववर्ष निमित्त शिर्डी इथं जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेवून विजयवाडा
ते नगरसोल मार्गावर एक विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेनं घेतला आहे.
ही रेल्वे २४ डिसेंबर रोजी विजयवाडा इथून सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटांनी सुटणार आहे.
सिंकदराबाद, नांदेड, औरंगाबाद मार्गे ही रेल्वे नगरसोल इथं सकाळी पाच वाजून पन्नास
मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी नगरसोल इथून २५ डिसेंबर रोजी सायंकाळी
साडेपाच वाजता सुटेल आणि विजयवाडा इथं दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचेल.
****
दरम्यान,
उत्तर रेल्वे मध्ये फरीदाबाद जवळ होत असलेल्या तांत्रिक कामामुळे, सचखंड एक्सप्रेस
आणि नागलडैम एक्सप्रेस या रेल्वेगाड्यांच्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. नांदेड़
- अमृतसर सचखंड एक्सप्रेस उद्या आणि परवा २१ डिसेंबरला, तर ऊना हिमाचल ते नांदेड़ -
नागलडैम एक्सप्रेस उद्या आणि परतीच्या प्रवासात २२ डिसेंबरला रद्द करण्यात आली आहे.
****
औरंगाबाद
इथं भरधाव कंटेनर आणि मोटारीच्या भीषण अपघातात दोन तरूणांचा जागीच मृत्यू झाला. आज
सकाळी औरंगाबाद - नाशिक रस्त्यावर माळीवाडा जवळ हा अपघात झाला. अपघातानंतर कंटेनरचा
चालक पसार झाला असून त्याचा शोध घेत असल्याची माहिती दौलताबाद पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी
दिली.
****
जालना
जिल्ह्यातही शहागड - पैठण रस्त्यावर टेम्पो उलटून झालेल्या अपघातात २० भाविक जखमी झाले
असून, त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. एकादशीनिमित्त हे भाविक पंढरपूरला जात
असताना आज सकाळी हा अपघात झाला. जखमींना अंबड आणि गेवराई इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात
आलं आहे.
****
राज्यात
आज सर्वात कमी सात पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमान नाशिक इथं नोंदवलं गेलं. परभणी
इथं आज या हंगामातलं सर्वात निचांकी नऊ पूर्णांक सहा, उस्मानाबाद १२ पूर्णांक चार,
तर नांदेड इथं १५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
****
No comments:
Post a Comment